या आर्किटेक्टनी जिद्द धरली म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली.

नवी मुंबई. मुंबईच जुळं शहर. सोबतच देशातील एक नियोजन करून वसलेलं सुंदर शहर. ठाण्यापासून सुरु होत दक्षिणेत उरण पर्यंत येऊन संपते. मुंबईच्या गर्दीला वैतागलेल्या माणसाला हे शहर आपलं आणि जवळच वाटत. त्यामुळेच वेगाने वाढणार आणि विस्तारणार शहर म्हणून देखील नवी मुंबईला ओळखलं जात.

१ कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असून देखील अलीकडेच देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून याला तिसरा क्रमांक मिळाला आहे. केवळ आणि केवळ नियोजनबद्धतेमुळेच हे शक्य होऊ शकलं. 

नवी मुंबईचे हे सुंदर रुपडं आपल्याला आज बघायला मिळत असलं तरी याची सुरुवात झाली होती १९६० च्या दशकात. आणि ती सुरुवात केली होती,

चार्ल्स कोरिया, प्रवीण मेहता आणि शिरीष पटेल या तीन सुप्रसिद्ध आर्किटेक्टनी म्हणजेच वास्तुविशारदांनी. या तिघांच्याच प्रयत्नांमधून हे शहर साकार होऊ शकलं. 

मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी. पूर्वीपासूनच म्हणजे अगदी स्वातंत्र्यापूर्वी देखील या शहराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. मायानगरी, स्वप्ननगरी म्हणवणाऱ्या मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळतच अशी या शहराची ओळख. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आजही येतात.

याच स्थलांतरामुळे वाढलेली लोकवस्ती व वाढते उदयोगधंदे व कारखाने यामुळे मुंबईतील गर्दी वाढत गेली. त्यातून झोपडपट्टी, बकाल वस्ती असे प्रकार वाढले होते. आणि आता मुंबई शहराच्या सीमा वाढविण्यात अर्थ नाही. त्यामुळे या शहरातील गर्दी कमी करण्यासाठी येथील उदयोगधंदे, कारखाने यासाठी आणखी एक शहर वसवावे व ते मुंबईपासून जास्त अंतरावर नसावे अशी मागणी होतं होती. 

त्यासाठी विविध विकास योजना राबविण्याचे ठरले. त्यापैकी एक म्हणजे १९६४ ची विकास योजना. याच योजनेतून नवी मुंबई शहर वसविण्याची कल्पना पुढे आली. या योजनेचे मुख्य शिल्पकार होते चार्ल्स कोरिया, प्रवीण मेहता आणि शिरीष पटेल हे वास्तुविशारद. 

अहमदाबादच्या गांधी स्मारक संग्रहालयासारख्या डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या चार्ल्स यांचा १९६० च्या दशकात शहरी योजनांमध्ये आवड निर्माण होऊ लागली. त्यांचं म्हणणं होत की, लोक शहरात कायमच राहण्यासाठी येत नाहीत, तर इथं त्यांना काम मिळत म्हणून येतात.

पण त्यांना राहण्याची सोय उपलब्ध करून देणं आणि आपलं शहर सुंदर दिसलं पाहिजे वास्तुकार म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि ती पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी.

याच विचाराने त्यांनी त्यांचा दुसरा मित्र शिरीष पटेल यांना हाताशी घेतलं. त्यांचं देखील आर्किटेक्ट क्षेत्रात चांगलं नाव होत. मुंबईतील केम्प्स कॉर्नर, नरिमन पॉईंट याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं होत. या दोघांनी मिळवून प्रवीण मेहता यांना सोबतीला घेतलं.

नव्या मुंबईची कल्पना महाराष्ट्र सरकारला पटवून देण्यात या तिघांना यश आले. चंदीगड या पहिल्या नियोजित शहराचं उदाहरण पुढे ठेवण्यात आलं. 

त्यांनी असा युक्तिवाद केला की रोजगाराच्या शोधात येणारे असंख्य लोक जुन्या मुंबई शहरात किंवा उपनगरात स्थायिक होण्यापेक्षा नव्या मुंबईत रोजगार मिळून स्थायिक होणे पसंत करतील. मुंबईतील घनदाट वस्ती कमी करण्याचा हा उपाय परिणामकारक ठरेल असे महाराष्ट्र सरकारलाही वाटले.

त्यावर अभ्यास करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या प्रादेशिक नियोजन मंडळाने देखील नवी मुंबई उभारण्याची शिफारस केली. या शिफारशींला त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोरिया, पटेल आणि मेहता यांच्यावर या शहराच्या नियोजनाची जबाबदारी सोपवली. 

त्यांच्या मदतीसाठी १७ मार्च १९७० रोजी ‘सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (सिडको) या सरकारी कंपनीची स्थापना करण्यात आली.

यातून सुरु झाला नवी मुंबई या सुनियोजित शहराचा प्रवास.

पण त्यावेळी बेलापूरपट्टी ही औद्योगिक वसाहत व त्यात ही पेट्रोकेमिकल कारखाने जास्त. एमआयडीसीने वसाहतीपासून दहा किलोमीटर परिसरात शहर वसवू नये, असा करार महाराष्ट्र सरकारशी केला, असे सांगितले जात होते व म्हणूनच सिडकोने पहिले नगर वसविले ते वाशी.

शहर वसवताना सिडकोद्वारे इमारती तयार होत असतानाच सिडकोचे अनेक अधिकारी बेलापूर पट्टीतील कारखान्यात जात व आपल्या घरापासून आपले कारखाने जवळ आहेत व त्यामुळे आपला अमूल्य वेळ वाचतो, हे सांगत. 

या नव्या शहरात तुम्हाला सर्व सुखसोयी मिळतील, अशी ग्वाही देत होते. असं करत करत नवी मुंबई शहर उभं राहिलं.

पुढे डिसेंबर १९९१ मध्ये शासनाने ठाणे जिल्ह्य़ातील २९ गावे आणि सात नोड असा भाग वेगळा करून नवी मुंबई पालिकेची स्थापना केली. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली.

पालिकेचे पहिले आयुक्त व प्रशासक म्हणून रमेशकुमार यांनी जानेवारी १९९२ मध्ये पदभार स्वीकारला होता. अतिशय कडक शिस्तीचे आणि प्रशासनावर जरब असलेले अधिकारी म्हणून ते ओळखले जात. पालिकेच्या कारभाराची घडी बसवण्याचे आणि शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले.

पुढे मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण विकत घेणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील एकमेव पालिका ठरली. त्यामुळे शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची गरज भागू शकली. चार एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बांधण्यात आली आहेत. पुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय पाणी गटारातही सोडता येणार नाही, असं नियोजन करण्यात आलं.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी ही राज्यातील पहिली पालिका ठरली. विविध उद्यान उभारण्यात आली. नवी मुंबई सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स सारख्या विविध सुविधा उभारण्यात आल्या.

ज्या उद्योगांच्या दृष्टीने नवी मुंबई हे शहर वसवण्यात आलं तिथं सीमेंस, मैकडॉनल्ड्स, ब्यूरो Veritas, Bizerba, लार्सन टुब्रो अशा बहुराष्ट्रीय कंपन्या काम करत आहेत. त्यातून लाखो जणांच्या हाताला काम मिळालं. असं हे देखणं नियोजित वसवण्याच संपूर्ण क्रेडिट चार्ल्स कोरिया, शिरीष पटेल, प्रवीण मेहता आणि सिडको यांना द्यायलाच हवं.

हे हि वाच भिडू. 

2 Comments
  1. vighnesh says

    aaj chakka tumhi ravivari lekh post kelat

  2. Nayanish Rane says

    तिसरी स्त्री होती प्रविणा मेहता.

Leave A Reply

Your email address will not be published.