असं बनलं महाराष्ट्राला वेड लावणारं “नवीन पोपट हा” हे गाणं !!

ऐंशीच्या दशकातील गोष्ट. ठाण्याजवळील मुरबाड येथे एक कव्वालीचा कार्यक्रम सुरु होता.

जेष्ठ लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे आपली पार्टी घेऊन गाण्यासाठी आले होते. तिथेच अजून एक गायकाची पार्टी देखील हजर होती. प्रल्हाद शिंदे चा मुलगा मिलिंद शिंदे आणि समोरच्या पार्टी मधून रंजना शिंदे दोघांच्यात गाण्याचा मुकाबला सुरु होता. गाण्यामधून एकमेकाला उत्तरं दिली जात होती.

समोरच्या पार्टीने पोपटावर एक गाण गायलं. आता त्याला उत्तर तर द्याव लागणार. प्रल्हाद शिंदे यांच्या पार्टी मध्ये मानवील गायकवाड नावाचे एक कवी होते. त्यांनी बसल्या बैठकीमध्ये एक गाण लिहिलं. विठ्ठल शिंदेनी चाल दिली आणि गाण्यासाठी प्रल्हाद शिंदेच्या दुसऱ्या मुलाला उभ करण्यात आलं. गाण्याचे बोल होते,

“जवा नवीन पोपट हा लागला मिठूमिठू बोलायला”

या गाण्याने त्या सवालजवाबात बाजी मारली. प्रल्हाद शिंदेनी पोराला मिठी मारली. पोराच नाव आनंद.

आनंद शिंदे यांच्या रक्तातच गायकीची परंपरा होती. त्यांचे आजोबा आज्जी काका हे सगळे शास्त्रीय संगीत शिकलेले गायक. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातल हे कुटुंब.  इथल्या मातीचे संस्कार, वारीला जाणारे लाखो वारकरी यांना बघत वाढलेल्या प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या भक्तीगीताना एक वेगळीच उंची प्राप्त झालेली होती. त्यांची पाऊले चालती पंढरीची वाट, चल ग सखे चल ग सखे पंढरीला या गाण्यांची कसेट फेमस होती.

त्याच काळात नुकताच रतन जैन यांनी व्हीनस म्युजिक या कसेट कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी हमखास हिट गाणी मिळतील म्हणून प्रल्हाद शिंदे यांना गाण्यासाठी बोलावलं. तेव्हा संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी विनंती करून आंनद शिंदेलाही त्या कसेटमध्ये दोन गाणी मिळवून दिली. रतन जैन यांनी ट्रायल म्हणून त्यांना गाऊ दिल. खड्या आवाजात ललकारी देत गाणार्या तरुण आनंद शिंदेच्या आवाजातलं पाणी त्यांनी ओळखलं होत. पुढची कसेट आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे या भावाभावांच्या आवाजातली काढायचा निर्णय व्हीनस कंपनीने घेतला.

आनंद शिंदेला मात्र अजून स्वतःमधलं टॅलेंटचं माहित नव्हतं.

व्हीनस कसेटतर्फे चंपक जैन त्याला गाण्याच्या रेकोर्डिंग साठी चल म्हणून बोलवायला आले होते. तेव्हा हा पठ्ठ्या विटीदांडू खेळण्यात मग्न होता. चंपक जैन मागे मागे आणि आनंद शिंदे विटी दांडू घेऊन पुढे असा बराच वेळ खेळ चालला. अखेर कसं तरी करून त्यांना स्टुडियोमध्ये आणण्यात आलं. या कॅसेट चं नाव होतं, ” पाहुनी आली कशी लाडाला”

याचं कॅसेट मध्ये आनंद शिंदे यांच्या नवीन पोपट गाण्याचाही समावेश होता. बघता बघता हे गाण पूर्ण महाराष्ट्रभर हिट झालं. कॅसेटची रेकॉर्डब्रेक विक्री झाली. याची नोंद गिनीज बुकात सुद्धा करण्यात आली आहे.

गाण्याच्या दुकानांत जाऊन पब्लिक पोपट वाली कॅसेट द्या अशी मागणी करू लागले. यामुळे जेव्हा नवीन कॅसेट आली तेव्हा त्याच नाव बदललं गेलं.

या गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा फक्त आनंद शिंदे यांना झाला असे नाही. तर याच गाण्यामुळे व्हीनस कंपनी उभी राहिली. पुढे लक्ष्मीकांत बेर्डेच्या चल रे लक्ष्य मुंबईला या सिनेमात देखील नवीन पोपट गाण्याचा समावेश करण्यात आला.  

आज या गोष्टीला जवळ पास तीन दशके उलटून गेली आहेत. आनंद शिंदे यांची हाताला धरलया पासून ते शिट्टी वाजली पर्यंत अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. भीमगीते गाण्यात त्यांचा कोणीच हात धरु शकत नाही. पण आजही आनंद शिंदे या नावापुढ ‘जवा नवीन पोपट हा फेम’ हे बिरूद चिकटलेल आहे. त्यांच आयुष्यच या गाण्यान बदलून टाकलं. कोणतीही मिरवणूक असो अथवा लोकगीतांची मैफिल, आनंद शिंदे यांच्या बुलंद आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला बेभान होऊन नाचायला भाग पाडलंय

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. महेश says

    भाई, तु येडा हायस????????????????????????

Leave A Reply

Your email address will not be published.