नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यामागे आता बाबा राम रहीम कनेक्शन समोर येतयं…

सध्या पंजाबच राजकारण देशाचं लक्ष वेधून घेत आहे. कारण इथं सध्या सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत वादामुळे राजकारणात ट्विस्ट आला आहे. जो समजून घेणं भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना पण अवघड जात आहे. सिद्धू यांनी आधी कॅप्टन अमरिंदर सिंगांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं आणि आता स्वतः प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे.

त्यामुळेच सध्या पक्षात तीन गट पडल्याचं वातावरण तयार झालं आहे.

पण या सगळ्या दरम्यान आता सिद्धू यांच्या राजीनाम्यामागे डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीम कनेक्शन देखील समोर आलं आहे. सिद्धू यांनी मंगळवारी अचानक राजीनामा दिल्यानंतर बुधवार सकाळी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून यात त्यांनी आपली नाराजी जगजाहीर केली.

यात बोलताना त्यांनी पंजाबचे पोलीस महासंचालक आणि राज्याचे महाधिवक्ता यांच्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित केले. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी मात्र या नियुक्यांच समर्थन केलं आहे. चन्नी मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात काही महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत, वीज बिल माफी सारखे काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

तर याच सगळ्या प्रशासकीय आणि कॅबिनेटच्या नियुक्त्या करताना सिद्धू यांचा सल्ला घेतला नसल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून आली.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी इकबाल प्रीतसिंग सहोता यांना पोलीस महासंचालक बनवण्यात आलं आहे. तर माजी पोलीस महासंचालक सुमेध सैनी यांचे वकील म्हणून काम बघितलेले अमरप्रीत सिंग देओल यांना महाधिवक्ता बनवण्यात आलं आहे.

२०१५ सालच्या प्रकरणाचा उल्लेख

पंजाबमध्ये याआधी सत्तेत असलेल्या अकाली सरकारच्या काळात गुरुग्रंथ साहिबच्या अवमानाच एक प्रकरण समोर आलं होतं. या घटनेच्या तपासासाठी तत्कालीन बादल सरकारकडून २०१५ मध्ये एक विशेष तपासणी पथक गठीत करण्यात आलं होतं.

साहोत यांचा स्पष्टपणे उल्लेख करत सिद्धू म्हणाले कि, ज्यांनी ६ वर्षांपूर्वी बादल यांना क्लीन चिट दिली होती त्यांनाच आता लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

तसेच महाधिवक्ता देओल यांच्या नियुक्तीवर देखील सिद्धू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तत्व आणि नैतिकता या गोष्टींचा उल्लेख करत सिद्धू म्हणाले, ज्या लोकांनी जामीन मिळवून दिला आहे त्यांना महाधिवक्ता बनवण्यात आलं आहे. देओल माजी महासंचालक सैनी यांचे वकील तर होतेच शिवाय अनेक माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्यांमध्ये ते वकील म्हणून काम बघत होते.

राम रहीम यांचं नाव FIR हटवलं?

यावर्षीच्या जुलैमध्ये अकाल तख्तचे कार्यवाहक जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी २०१५ च्या अवमान प्रकरणाचा तपास करत असलेल्या पथकावर आरोप केला केले.

यात ते म्हणाले कि अवमान प्रकरणाच्या FIR मधून राम रहीमचं नाव हटवण्यात आलं आहे. त्यांनी FIR नंबर १२८ चा देखील उल्लेख केला आणि यात कोणतेही राजकारण नसल्याचं सांगितले. तर विशेष तपास पथकाने मात्र या आरोपांना फेटाळून लावलं आहे, आणि यात राम रहीमचे नाव नसल्याचा दावा केला आहे.

सिद्धू यांचा तिळपापड का?

खरंतर अवमान प्रकरणात राम रहीम आणि त्यांच्या अनुयायांवर बरेच गंभीर आरोप लावण्यात आले होते. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान भागामध्ये राम रहीमचे आजही मोठ्या संख्येने भक्त आहेत. विशेषतः पंजाबमधील दलित शीख समुदायात डेरा सच्चा सौदा आणि गुरमीत राम रहीम यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

अशातच चन्नी स्वतः दलित शीख आहेत. नवनियुक्त पोलीस महासंचालक देखील दलित आहेत. त्यामुळे कुठेतरी दलित वोट बँकेसाठी राम रहीमला वाचवण्यात येत असल्याची चर्चा सुरु झालीय.

आता सिद्धू यांची नाराजी आहे कारण त्यांनी पहिल्यापासूनच गुरुग्रंथ साहिब अवमान प्रकरणात अकाली दल आणि कॅप्टन यांना लक्ष केलं होतं. आणि आता अकाली दल आणि बादल यांच्याच फेव्हरेट अधिकाऱ्यांना आणि राम रहीम यांना वाचवल्याचे आरोप असलेल्यांना नियुक्ती देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.