राजकारणाचा कंटाळा आला असेल तर नवनीत राणांचे हे ७ पिक्चर पाहू शकता..

माणसाला जिंदगीत कायम प्रश्न पडले पाहिजेत, ज्याला प्रश्न पडत नाहीत तो माणूस कसला? प्रत्येक गोष्टीला का? कसं? हे विचारता आलं पाहिजे यावर आमचा लय विश्वास होता. मग हळूहळू आमच्यापेक्षा जास्त प्रश्न भिडू लोकांना पडायला लागले आणि आम्ही फक्त उत्तरं शोधण्यापुरते उरलो.

एका भिडूनं आम्हाला प्रश्न विचारला, नवनीत राणा अभिनेत्री होत्या का? आम्ही म्हणलं हो. पिक्चरमध्ये काम करायच्या का? आम्ही म्हणलं हो. लगेच प्रश्न आला, कुठले पिक्चर नावं सांगा .. झालं, आम्ही लागलो कामाला.

सध्याचं राजकारण गाजवणाऱ्या नवनीत राणा यांनी अभिनय केलेले चित्रपट कुठले, हेच सांगायचा खटाटोप.

नवनीत या पंजाबी कुटूंबातल्या. वडिल सैन्यात मोठ्ठे अधिकारी. १२ वी झाल्यानंतर नवनीत यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि कॉलेज सोडून संपुर्ण वेळ मॉडेलिंग करु लागल्या. या काळात त्यांनी एकूण सहा म्यूझिक अल्बम्समध्ये काम केलं. मुंबईत संधी मिळत नाही म्हणल्यानंतर, त्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न करु लागल्या. कन्नड, तमिळ, तेलुगु, पंजाबी सिनेमात त्यांना ओळख मिळाली. त्यांच्या फिल्मी करिअरमधले गाजलेले पिक्चर कोणते ते बघू.

२००१ मध्ये त्यांनी सिकंदरा नावाच्या पंजाबी पिक्चरमध्ये काम केलं.

विशेष म्हणजे या पिक्चरमध्ये त्यांच्यासोबत पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान सुद्धा होते. पंजाबमध्ये या पिक्चरच्या सिड्या लय खपल्या.

पुढचा गाजलेला पिक्चर म्हणजे २००५ मधला, चेतना दी एक्सआईटमेन्ट.

यात पायल रोहतगीनं चेतनाचं काम केलंय. चेतना मोठी बिझनेसवुमन असते, तर समीर हा तिच्या कंपनीतला एम्प्लॉयी. तिला समीर आवडतो, मग ती त्याच्या आयुष्यात कांड करायला बघते. पण समीरची बायको असते आस्था. हा सगळा लव्ह ट्रँगल पिक्चरमध्ये आहे, यात आस्थाचं काम नवनीत राणांचं आहे.

तिसरं नाव येतं, लव्ह इन सिंगापूर.

यात नवनीत राणा मेन रोलमध्ये होत्या. त्यांचा को-स्टार कोण होता माहिती का? मामुट्टी. मल्याळम पिक्चरचा बच्चन. ही स्टोरी एका भंगार विकणाऱ्याची होती, असा भंगारवाला जो भंगार विकून श्रीमंत होतो. यात फुल टिपिकल ऍक्शन आहे आणि ड्रामाही.

चौथा गाजलेला पिक्चर म्हणजे, जगपती.

या तेलुगू पिक्चरची थीम होती, पैसा, पॉवर आणि पॉलिटिक्स. एक आमदार, एक पोलिस ऑफिसर आणि एक पत्रकार यांच्याभोवती पिक्चरची स्टोरी फिरत राहते. समजा तुम्हाला हा पिक्चर बघायचा झालाच, तर इरॉस नाऊवर बघू शकताय.

पिक्चर क्रमांक पाच, फ्लॅश न्यूज.

ज्या फ्लॅश न्यूजमध्ये सध्या नवनीत राणा असतात, त्याच नावाच्या पिक्चरमध्ये त्यांनी २००९ मध्ये काम केलेलं. हा तेलुगू पिक्चर एका पत्रकाराची गोष्ट मांडतो, असा पत्रकार जो सरकारचे गैरव्यवहार जगापुढं आणण्यासाठी धडपड करतोय.

या पिक्चरमध्ये मोहम्मद अली, नागेंद्र बाबू यांच्यासारखे गाजलेले कॉमेडी स्टार्सही आहेत. नवनीत राणांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणून या पिक्चरमधल्या त्यांच्या कामाकडं पाहीलं जातं.

सहावा पिक्चर आहे पंजाबी. नाव लढ गया पेंच.

टिपिकल पंजाबी कॉमेडी आणि ड्रामा. या पिक्चरमध्ये एक भूत दाखवलंय. एक पोरगं दाखवलंय आणि त्याची प्रेयसीही. हे पोरगं भुताच्या प्रेमात पडतं आणि स्वतःला संपवायचा प्रयत्न करतं. मग ते त्याच्या प्रेयसीच्याही प्रेमात पडतं. शेवटी लग्न कुणाशी करायचं, हा प्रश्न त्याला पडतो.

शेवटी लग्न कुणाशी करतो, हे पाहायला पिक्चर बघावा लागेल. पण आम्हाला तरी तो कुठल्याच ओटीटीवर सापडला नाही.

सातवा पिक्चर, लिटिल टेरर्स.

२०१४ मध्ये आलेला हा पिक्चर नवनीत राणांच्या फिल्मी करिअरमधला शेवटचा पिक्चर असू शकतोय. कारण यानंतर त्या राजकारणात आल्या, या पिक्चरमध्ये त्यांनी ओम पुरीसोबत काम केलं.

या व्यतिरिक्तही त्या अनेक पिक्चरमध्ये झळकल्या. प्रभुदेवाचा मेन रोल असलेल्या स्टाईलमध्ये नवनीत राणांचा गेस्ट अपियरन्स होता. त्या पिक्चरमधले इतर गेस्ट अपियरन्स होते, नागार्जुना, चिरंजीवी, अभिनेता सुमन यांचे. या लिस्टीत नवनीत राणांचं नाव होतं… हाय का तोड?

आम्ही सात पिक्चरची नावं सांगितली, आयएमडीबीला जाऊन पाहिलंत तर ते २१ पिक्चरची लिस्ट देतात. तुम्ही नवनीत राणांचे चाहते असाल, तर जाऊन डिटेल माहिती घ्या. पिक्चर बघितले की रिव्ह्यू तेवढा सांगा.

 बाकी राजकारण काय होत राहतं, कुणीतरी सांगितलंय ‘कला माणसाला जगवते.’ त्यामुळं कला जपली पाहिजे, वाढवली पाहिजे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.