साऊथमध्ये अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर अशा झाल्या महाराष्ट्राच्या सुनबाई….

भोंगा प्रकरण, मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण यामुळे सातत्याने राणा दाम्पत्य चर्चेत येत असतात. राज्याचं राजकारण तापवलं जातं.

असो..राणा दाम्पत्य चर्चेत येत जात असतात पण राणा दाम्पत्याची लव्ह स्टोरीही इंटरेस्टिंग आहे.

तसं पाहिलं तर रवी राणा म्हणजे तस नाकासमोर चालणारा माणूस. पहिल्यापासून राजकारण. त्यात यशस्वी. पण नवनीत कौर या पंजाबी घरात वाढलेल्या मात्र पुर्णपणे वेगळ्या. नवऱ्याच्या पुर्णपणे विरुद्ध टोकावर असणाऱ्या. नवनीत कौर यांचे वडिल सैन्यात मोठ्ठे अधिकारी होते. त्यांच कुटूंब मुंबईतच रहायला होतं. त्यामुळे शाळेय शिक्षण मुंबईत. पुढे फिल्म लाईनमध्ये करियर करायचं म्हणून साऊथ गाठलं. आणि लग्नानंतर अमरावती हे घर झालं.

इतकं टोकाचं पाहिलं की साहजिक प्रश्न असतो तो म्हणजे कस जमलं? 

तसही माणूस कोणताही असो, जोडी दिसली की कस जमलं हे आपल्याकडे विचारणं क्रमप्राप्त असतं. तर आत्ता सुरवातीपासून सांगतो. नवनीत कौर या पंजाबी कुटूंबातल्या. टिपीकल पंजाबी कुटूंबासारखं त्यांच्या घरात एकदम मोकळं वातावरण. मुलांना हव ते करण्यास मोकळीत. त्यातही नवनीत कौर यांचे वडिल सैन्यात मोठ्ठे अधिकारी. कौर कुटूंब पंजाबचे असले तरी रहायला मुंबईतच. मोठ्या अधिकाऱ्यांच्या चौकटीत नवनीत कौर वाढलेल्या. आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्यासारख मोकळं वातावरण घरी असल्याने १२ वी झाल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. 

१२ वी झाल्यानंतर कॉलेज सोडून संपुर्ण वेळ मॉडेलिंगची तयारी करु लागल्या.

या काळात त्यांनी एकूण सहा म्यूझिक अल्बममध्ये काम केलं. काम छोटच होतं. मुंबईत संधी मिळत नाही म्हणल्यानंतर ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न करु लागल्या. अखेर त्यांना एक फिल्म मिळाली. त्या फिल्मच नाव होतं, दर्शन. नवनीत कौर यांची हि पहिली संधी. फिल्म बऱ्यापैकी चालला, मात्र नवनीत कौर यांच्याकडे बऱ्याच निर्मात्यांच लक्ष गेलं.

त्यानंतर कन्नड, तमिळ,तेलगु सिनेमात त्यांना ओळख मिळू लागली. सीनू, वसंथी, लक्ष्मी या तेलगु सिनेमात तर चेतना, जग्पतथी, गुड बॉय आणि भूमा या सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केल. याच दरम्यान जेमिनी टिव्हीवर झालेल्या हुम्मा हुम्मा या रिएलिटी शो मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.

थोडक्यात साऊथ इंडस्ट्रीमधल्या पहिल्या फळीतल्या अभिनेत्रींच्या यादीत त्या पोहचल्या होत्या. 

याच दरम्यान त्या रामदेवबाबांच्या आश्रमात योग शिकण्यासाठी येत असत. रामदेव बाबांनी योगासाठी मोठ्या शिबीराचं आयोजन पतंजली आश्रमात केलं होतं. या शिबिरास नवनीत कौर आल्या होत्या. याच शिबीरामध्ये रवी राणा देखील आले होते. नवनीत कौर आणि रवी राणा यांची पहिली भेट याच ठिकाणी झाली. त्यांच्यात जुजबी ओळख झाल्यानंतर दोघेही आपआपल्या कामात मश्गुल राहिले. 

पुढे त्यांच्यात कधीकधी जुजबी बोलणं होत होतं. याच ओळखीतून अमरावती येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला नवनीत कौर यांनी आमंत्रित करण्याचा निर्णय रवी राणा यांनी घेतला. तोपर्यन्त रवी राणा आणि नवनीत कौर यांची चांगली मैत्री देखील झाली होती. याच विश्वासातून नवनीत कौर अमरावतीत आल्या. 

रवी राणा यांनी स्वाभिमानी महोत्सव कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाला त्या दिवसभर हजर राहिल्या. उंची हॉटेलमध्ये राहणं, प्रवासाचं उत्तम नियोजन करणं, कार्यक्रम ठिकाणी नुसतं उपस्थित राहून जाणं अस एखाद्या सेलिब्रिटीसारखं वागण्याऐवजी त्या पहिल्याच भेटीत लोकांत मिसळल्या. रवी राणा यांना नवनीत कौर यांच सेलब्रिटी असताना देखील सर्वसामान्यांच्यात मिसळणं अधिक आवडलं तर इकडे रवी राणां यांनी केलेल्या सामाजिक कामांमुळे नवनीत कौर प्रभावित झाल्या. 

त्यानंतर दोघेही भेटत गेले. अखेर एक दिवस रवी राणा यांनी धाडस दाखवून नवनीत कौर यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नवनीत कौर देखील रवी राणांच्या मैत्री आणि सामाजिक कामांमुळे प्रभावित झालेल्या. त्यांनी देखील तात्काळ होकार दिला. 

आत्ता प्रश्न होता दोन्ही कुटूंबांचा.

नवनीत कौर यांच्या कुटूंबियांना रवी राणा यांच्या कामाबद्दल माहिती समजल्यानंतर त्यांनी देखील होकार दर्शवला. नवनीत कौर सांगतात आम्ही दोघे अमरावतीच्या भेटीत अंबादेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तिथेच माझ्या मनात देखील लग्नाला विचार चालू झाला होता. दोघांच्या कुटूबांकडून होकार येताच. रवी राणा आणि नवनीत कौर यांनी रामदेव बाबांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी पुढे जाण्याचा आशिर्वाद दिल्यानंतर दोघांनी सामुदायिक विवाह करण्याचा निर्णय घेतला. 

अमरावती येथे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी लग्न केले. या ठिकाणी एकाच दिवशी ३,००० जोडप्याच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. ४ लाख स्वेअर फुटांवर आयोजित करण्यात आलेल्या या लग्नात मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांसोबतच सुमारे पाच लाख लोक उपस्थित होते.

तीन हजार जोडप्याचा सामुदायिक विवाह हि गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करण्यासाठी गोष्ट असल्याने गिनीज बुकचे अधिकारी देखील या लग्नास उपस्थित होते. दूसऱ्या बाजूला सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या ३,००० जोडप्यांपैकी ३५० जोडपी अंध तर ४७० जोडपी दिव्यांग होती. आपला संसार थाटण्यासोबत या जोडप्याने सुमारे ३,००० जोडप्यांचे लग्न लावले होते. त्यांच्यासोबतीनेच हा विवाह सोहळा पार पडला होता. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.