उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा यांच्यात कॉमन असलेला ‘तो’ आजार काय आहे ?

गेल्या काही दिवसात राज्याचं राजकारण ढवळून काढणारे राणा दाम्पत्य विशेष गाजले. देशद्रोहाच्या आरोपांखाली नवनीत राणा मुंबईतील भायखळा महिला कारागृहात आहेत. तर त्यांचे आमदार पती रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. मात्र युक्तीवाद पुर्ण होवू न शकल्याने दाखल जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

त्यामुळे राणा दांपत्याचा जेलमधील मुक्काम ४ मे पर्यन्त वाढला आहे. याच दरम्यान नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्याचे बातम्या होत्या. 

नवनीत राणांना स्पॉंडिलायसिस नावाचा आजार असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं,

राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी तुरुंग प्रशासनास पत्र लिहिलेय की,

“नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा त्रास होत असून त्यांची समस्या सातत्याने वाढत असल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला तुरुंग प्रशासन जबाबदार असेल”,

असं राणा यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

राणा यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याही तब्येती बिघडल्याच्या बातम्या येत आहेत. अनिल देशमुख यांना खांदेदुखी असून हृदयविकाराची समस्या असल्याचं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना मुत्राशयाचा आजार असून त्यावर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आहे

नेत्यांना झालेले खांदेदुखी, हृदयविकार, मुत्राशयाचे आजार आपल्याला माहितीच आहेत मात्र नवनीत राणा यांना असलेला ‘स्पॉंडिलायसिस’ या आजाराची चर्चा होतेय.

हाच स्पॉंडिलायसिस आजार उद्धव ठाकरेंना देखील होता. त्यांना स्पॉंडिलायसिसचा च प्रकार असणाऱ्या सर्व्हायकल स्पॉंडिलायसिसची शस्त्रक्रिया करावी लागली होती.

स्पॉंडिलायसिस म्हणजे काय ?

आपल्या मानेत एकूण ७ मणके असतात, ज्याच्या साहाय्याने आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी व्हायला लागले, की त्यांची झीज होत गेली तर मणके एकमेकांवर घासतात, उलटही होऊ शकते की या मणक्यांमधील अंतर कमी होते. किव्हा मग मणके जागेवरूनच घसरतात. आणि मग शरीरातील या जागेचं दुखणं वाढतं. हळहळू मान अवघडण्याचा प्रकार होतो, मणक्याच्या आजूबाजूला नवीन कॅल्शिअम साचायला लागते आणि त्याचं रूपांतर नवीन हाडात होतं. 

आणि याच प्रक्रियेला स्पॉंडिलायसिस म्हणतात. 

थोडक्यात हे सगळे मणक्यांशी, कंबरदुखी-संबंधितचे आजार आहेत. 

कंबरदुखी जरी किरकोळ वाटत असेल मात्र वाटतं तितकं ते साधारण दुखणं नसतंय तर मोठे जिकरीचे आजार आहेत. बदलत्या कळानुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार हे आजार बळावत चालले आहेत.  मणक्‍यांची ही झीज वयाच्या २५ वर्षांनंतर सुरू होते. 

यात ४ प्रकार आहेत…

स्पॉण्डयलोलायसिस, स्पॉण्डयलोलिस्थेसिस, स्पॉण्डयलायटिस, स्पॉंडिलायसिस. हे नावं तुम्हाला जवळपास सारखेच दिसत असणार पण त्यात बराच मोठा फरक आहे. 

या आजाराची कारणे म्हणजे,

जर तुम्ही बराच वेळ एकाच जागेवर बसून कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करत असाल तर भविष्यात स्पॉंडिलायसिस होण्याची शक्यता आहे. 

याशिवाय सततचा वाहनांवरूनचा प्रवास, किंव्हा अति कष्टाचे कामे, ओझे उचलणे, व्यायामाचा अभाव, काही अपघातामुळे मानेवर, मणक्याला मुक्का मार लागणे. आणखी एक कारण म्हणजे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असणे ही स्पॉंडिलायसिसची कारणे ठरू शकतात.

समजा हा आजार आपल्याला झालाच तर ओळखायचा कसा ?

त्याची लक्षणे काय आहेत ?

वर सांगितल्याप्रमाणे अधून-मधून मान अवघडते, मानेची हालचाल सहज होत नाही. तेथील नसांवर दाब येतो. काहींना असंही होतं की त्यांच्या मणक्‍यातील कॅनॉलमधून म्हणजेच ज्यातून मज्जारज्जू व नसा जातात. आता स्पॉंडिलायसिस मध्ये वाढलेल्या हाडांचा दाब हा मज्जारज्जूवर आहे की नसांवर आहे हे यावर उद्भवणारी लक्षणे वेगवेगळी असतात.

नसेवर जर का हाडांचा दाब असेल तर पुढील लक्षणे दिसून येतात. 

 • मान किंव्हा खांदा एकाच बाजूने दुखणे.
 • खांद्याला कळ येते, मुंग्या येतात. हळूहळू त्या मुंग्या हातभार पसरतात. आणि ही वेदना हळूहळू असह्य व्हायला लागते.
 • कधी कधी कळा येत नाहीत मात्र वेदनारहित नसेवर दाब येऊ शकतो.
 • परिणामी दंड, हात किंवा तळहातातील स्नायूंची शक्ती कमी होत जाते..

मज्जारज्जूवर हा दाब असेल तर पुढील लक्षणे दिसून येतील. 

 • चालतांना विशेष म्हणजे अंधारात चालताना तोल सांभाळता न येणे.
 • चालतांना पायात जडपणा येणे, पायात ताकद कमी वाटणे.
 • पायात बधिरपणा येणे, पायातील चप्पल निसटणे.
 • आजाराची तीव्रता वाढली कि हाताची बोटे वाकडी होतात.
 • परिणामी माणूस अंथरून धरतो, हातापायांमधली ताकद कमी होते.
 • नैसर्गिक क्रिया करण्याचं भान राहत नाही, लघवी वैगेरे नकळत व्हायला लागते.

यासाठी कुठल्या टेस्ट उपलब्ध आहेत ?

हाडांशी संबंधित आजार म्हणलं की साधारणपणे आपण एक्‍स-रे काढतो. एक्‍स-रे मध्ये हाडे दिसतात. मात्र स्पॉंडिलायसिसमध्ये मणके आणि त्याची हाडे एकमेंकावर घसरलेली दिसतात. मात्र या प्रक्रियेतील मज्जारज्जू व नसा मात्र एक्‍स-रेमध्ये दिसत नाहीत. एक्‍स-रे नॉर्मल असला, तरीसुद्धा मज्जारज्जूवर काय दाब पडला असेल हे एक्स रे मध्ये दिसून येत नाही. त्यामुळे यात एम.आर.आय टेस्ट महत्वाची ठरते.

त्यावर उपाय काय आहेत ?

सर्वात महत्वाचं म्हणजे सगळं त्रास आणि लक्षणे जर का हाडांची झीज होण्यापुरतं मर्यादित असेल तर त्यावर व्यायाम हा एकमेव उपाय आहे…

मात्र जर का हा त्रास मज्जारज्जू आणि नसेवर दाब येण्यापर्यंत बळावला असेल तर मग मात्र त्यावर उपाय करावेच लागतात नाही कायमस्वरूपी अंथरून धरायची वेळ येऊ शकते.

उपाय… 

 • बेसिक उपायांमध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे, काम करताना आणि गाडी चालवतांना कणा ताठ राहावा अशाच पद्धतीत बसावं.
 • डोक्याखाली भली मोठी उशी घेऊ नये, आणि अती ओझे उचलणे टाळावे.
 • बैठं काम करत असाल तर अधून-मधून मानेची हालचाल करत राहावी, पाय मोकळे करत राहावेत.
 • आहारात कॅल्शियम व फॉलकि अ‍ॅसिडयुक्त पदार्थ समाविष्ट करावेत.

तसेच यावर आयुर्वेदिक उपचार देखील आहेत. पेशंटची हिस्ट्री चेक करून आयुर्वेदिक तज्ञ् आयुर्वेदिक उपचार करतात जे बरेच गुणकारी ठरतात. त्यात पंचकर्म, नस्य म्हणजेच नाकात विशिष्ट औषधी सोडली जाते, मन्याबस्ती म्हणजेच मानेवर औषधी तेल सोडले जाते. या सारख्या आयुर्वेदिक उपचारांचा देखील समावेश आहे. 

बाकी शस्त्रक्रिया, औषधी उपचार हे त्या – त्या रुग्णांवर अवलंबून आहे त्यामुळे घरघुती उपाय टाळावेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.