‘त्या’ एका फोन नंतर नवाब मलिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

गेले काही महिने म्हणजे त्यातल्या त्यात जेव्हापासून आर्यन खान ड्रग्स प्रकरण आणि समीर वानखेडे हा वादग्रस्त विषय सुरु झाला तेंव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवाब मलिक हे वादळ सगळ्यांनाच कळून गेलं…रोज पत्रकार परिषद, त्यात काहींना काही गौप्यस्फोट…रोज काहींना काही वेगळं सत्य तेही पुराव्यानिशी…तेंव्हाची ही पत्रकार परिषदेचे सिरीज कुणीही विसरू शकणार नाहीत.

होय मी भंगारवाला आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे, असं एक वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं होतं…ज्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर अनेकांना हा प्रश्न पडलेला कि, नेमकं नवाब मलिक हे कोण आहेत आणि त्यांनी राजकारणात कसा काय प्रवेश घेतला…

भंगारवाला म्हणून जेंव्हा सोशल मिडीयावर नवाब मलिक यांना ट्रोल केलं गेलं, यावरून माध्यमांनी त्यांना प्रश्न देखील विचारला होता. तेंव्हा नवाब मलिक म्हणाले होते की, होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. मी सुद्धा वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे. आत्तापर्यन्त ५ वेळा आमदार राहिलेल्या नवाब मलिक खरंच भंगारवाले होते काय ? हे तर जाणून घेऊच या शिवाय… ते राजकारणात कसं काय आले तेही जाणून घेऊया..

ते एकदा त्यांच्या मुलाखतीत म्हणाले होते कि, “मी राष्ट्रवादीत प्रवेश केला ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याचमुळे”…

हा किस्सा काय होता हे जाणून घ्यायच्या आधी त्यांची पार्श्वभूमी समजून घेऊया…

नवाब मलिक हे मुळचे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्रौला तहसील भागातील धुसवा गावातले. तिथेच त्यांचा जन्म झाला. नवाब मलिक यांचे संपूर्ण कुटुंब १९७० दशकामध्ये यूपीमधून मुंबईत स्थलांतरित झाले. आणि नवाब मलिक याचं पुढील शिक्षण मुंबईमध्ये झालं. मलिक यांच्या कुटुंबाचा भंगार विकण्याचा व्यवसाय होता, मलिक देखील याच व्यवसायात गुंतले. पण याचदरम्यान ते राजकारणाकडे ओढले गेले.

हा काळ म्हणजे नव्वदच्या दशकातला. तेंव्हा देशात राम मंदिराची चळवळ सुरू झाली होती.

अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अल्पसंख्याक समाजात झपाट्याने वाढत होती. १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी विध्वंस झाला तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. या घटनेमुळे देशभरातला अल्पसंख्याक वर्ग काँग्रेसवर प्रचंड नाराज झाला आणि पर्याय म्हणून मुस्लिमांनी समाजवादी पक्षाची निवड केली. मुस्लिमांमध्ये मुलायम सिंह यांची वाढती लोकप्रियता पाहून नवाब मलिक यांनीही सपामध्ये प्रवेश केला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

नवाब मलिक यांनी १९९६ मध्ये महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल नेहरू नगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सपाच्या तिकिटावर पहिल्यांदा आपलं नशीब आजमावलं आणि विजय मिळवून विधानसभेत पोहोचले. नवाब मलिक हे मुलायम यांच्या जवळचे नेते मानले जायचे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत नेहरू नगर या जागेवरून पुन्हा सपाच्या तिकिटावर ते निवडून आले…..

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर नवाब मलिक यांनी सपा सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जेंव्हा म्हणलं जातं कि, राष्ट्रवादी काँग्रेसला उभारणी देत पक्षाचा विस्तार करण्यासाठी ज्या नेत्यांना हाताशी धरून पवारांनी पक्षाचा विस्तार केला त्या नेत्यांच्या यादीत नवाब मलिक यांचे देखील समोर येते. 

अशाच एका मुलाखतीत नवाब मलिक यांनी आपण राष्ट्रवादीत कसा आलो याचबद्दलचा एक किस्सा सांगितला तो असा कि, नवाब मलिक समाजवादी पक्ष सोडून कॉग्रेस मध्ये जाण्याचा विचार करत होते आणि ते बीकेसी परिसरात असताना अचानक त्यांना फोन आला..पलीकडून आवाज आला “हॅल्लो, मी शरद पवार बोलतोय”

हा आवाज ऐकुन मलिक यांना क्षणभर सुचेनाच काय बोलावं, त्यांचे हातपाय गळुन गेले….

तेवढ्यात तिकडूनच आवाज आला,“तुम्ही कॉग्रेस मध्ये नाही तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करा, दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बोलुन घ्या अन निर्णय घ्या”, असं म्हणत पवारांनी फोन कट केला.

झालं ठरलं…मलिक यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि तसा औपचारिक प्रवेश देखील झाला. आणि आजतागायत नवाब मलिक हे राष्ट्रवादी पक्षासोबत एकनिष्ट आहेत.

असं स्वतः नवाब मलिक यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. 

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी नेहरू नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले आणि जिंकून आले. त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले…

२०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी अणुशक्तीनगर विधानसभेतून पुन्हा लढवली, पण शिवसेनेकडून थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा येथून लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. २०२० मध्ये मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही करण्यात आले होतं. समाजवादी पक्षाचे आमदार पुढे राष्ट्रवादीचे आमदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे.

आणि आज ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात…!

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.