पाकिस्तानी पंतप्रधान भारतीय गर्लफ्रेंडसाठी फोनवर गाणी गायचा आणि हे सिक्रेट पवारांनां कळालं

डिसेंबर १९९१. संडे ऑब्झर्व्हर नावाच्या एका मासिकात कव्हर स्टोरी छापून आली होती. भारतातल्या या मासिकामुळे अख्खा पाकिस्तान हादरला. बातमीच तशी होती.

“पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं भारतीय सुपरस्टारच्या बहिणीबरोबर अफेअर !!”

या लेखामध्ये लिहिलं होतं की सुप्रसिद्ध अभिनेता फिरोज खान यांची धाकटी बहीण दिलशाद बानू बेगम उर्फ दिलशाद बीबी हीच अफेअर सुरु आहे.

दोघांचे रोज सिक्रेट फोन सुरु असतात. तिथ नवाझ शरीफ आपल्या या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलतात.एवढच काय पाकिस्तानी पंतप्रधान कधीकधी तिच्यासाठी मोहम्मद रफीच्या आवाजात छान रोमांटिक गाणे देखील गातात आणि

हे सगळ भारतीय गुप्तचर संघटना रॉ ने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये सापडलं आहे.

संडे ऑब्झर्व्हर हे धीरुभाई अंबानी यांच्या मालकीचे मासिक होते. सुप्रसिद्ध लेखक पत्रकार प्रीतीश नंदी या मासिकाचे संपादक होते. संडे ऑब्झर्व्हरला जगात प्रतिष्ठीत मासिक म्हणून समजलं जातं होत. त्यात छापून येणारी बातमी खरी असण्याची जास्त शक्यता होती.

ही बातमी आल्यापासून नवाझ शरीफ यांच्या वर प्रचंड टीकेचा भडीमार सुरु झाला. त्यांची पाकिस्तानी संसदेमधली स्थिती नाजूक झाली.

विरोधी पक्ष तर नांवे ठेवू लागलेच पण जनता देखील तोंडात शेण घालू लागली. पाकिस्तानी मिडियामध्ये नवाज शरीफ यांना देशद्रोही ठरवण्या इतपत काही जणांची मजल गेली. नवाझ शरीफ तर मी अशा कोणत्याही महिलेला ओळखतही नाही या आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

पाकिस्तानमध्ये एक नवीनच चर्चेने जोर धरला की भारताच्या गुप्तचर संघटनेचा हा हनी ट्रॅप आहे आणि रॉने या कामगिरी साठी ५० सुंदर आणि आकर्षक मुलींची नेमणूक केली आहे. पाकिस्तान सरकारने आयएसआयच्या एजंटनां सूचना दिली की

“कोणत्याही सुंदर महिलेबरोबर बोलायचे देखील नाही आणि यापूर्वी अशा एखाद्या महिलेशी संबंध आला असेल तर त्याची माहिती लष्कराला येऊन द्यायची.”

इकडे भारतात दिलशाद खान हिने संडे ऑब्झर्व्हरवर खोटी बातमी छापल्याचा आळ घेऊन 1 कोटीचा मानहानीचा दावा ठोकला.

संपादक प्रीतीश नंदी यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की आम्ही विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानुसार ही बातमी छापली आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच कुठे येतो. हा लेख ज्या पत्रकाराने लिहिला होता तिला प्रश्न विचारण्यात आला की तुमचे विश्वसनीय सूत्र कोण तर तेव्हा तिने नाव सांगितले,

शरद पवार.

तेव्हा भारताचे पंतप्रधान होते पीव्ही नरसिंहराव आणि त्यांच्या मंत्रीमंडळात शरद पवार हे संरक्षणमंत्री होते. त्यांनी एका मुलाखती वेळी त्या पत्रकार महिलेला ही माहिती दिली होती अस तिचं म्हणण होतं. मात्र जेव्हा अब्रुनुकसानीच्या दाव्यात सादर करायला पुरावा हवा म्हणून ती पवारांच्या कडे लेखी पत्र मागायला गेली तेव्हा मात्र त्यांनी या गोष्टीस सरळ इन्कार केला.

रॉ ने सुद्धा ही गोपनीय माहिती देण्यास नकार दिला.

आज अनेक वर्षे उलटून गेली. या घटनेनंतर नवाझ शरीफ दोन वेळा पंतप्रधानपदी येऊन गेले. मात्र पवारांनी त्यांचं फोडलेल गुपित आजही त्यांना सतावत असते. जेव्हा जेव्हा नवाझ शरीफ विरोधकांवर जड जाऊ लागतात तेव्हा विरोधक हमखास दिलशाद बेगमच नाव घेतात आणि नवाझ शरीफ यांचा आवाज मोहम्मद रफी यांच्यापेक्षा नाजूक होऊन जातो.

हा किस्सा रॉचे माजी गुप्तहेर बी रामन यांनी लिहिलेल्या The Kaoboys of RA&W या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.