नक्षलग्रस्त भागात आदिवासी लस घेण्याची हिंमत करतात ते एका महिला सरपंचमुळे ..

आम्ही गावाकडची लोकं,माळरानात काम करतो आम्हाला काही कोरोना-बिरोना होत नसतोय म्हणत म्हणत यांना कोरोनाने गाठले तरीही समोर अजून एक संकट म्हणजे लसीकरण.

जी लोकं कोरोनालाही घाबरली नसतील ती लसीकरणाला घाबरत आहेत.

सध्या गावाकडे अशी परिस्थिती आहे कि,  कोरोना लस घेतली कि, माणसाला हार्ट अटॅक येतो, तो आजारी पडतो आणि मग मरतो अशा अनेक अफवा आपल्या गावाकडे ऐकायला मिळाल्या असतील. आणि याचा वाईट परिणाम म्हणजे अशा अफवांना बळी पडून ग्रामीण भागातील लोकं लसच घेत नाहीत. 

या कोरोना संकटात एक गोष्ट मात्र नक्कीच सकारात्मक घडतेय ती म्हणजे नव्याने निवडून आलेले तरुण सरपंच, सदस्य हे आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत. 

मात्र लसीकरणाला घाबरानारयांचे मन कसे वळवायचे हा प्रश्न या तरुणपीढीला पडला. याच समस्येला समोर करून छत्तीसगडच्या एका सरपंच युवतीने स्वतःच्या बाइकवरून आदिवासींच्या पाड्यापाड्यांवर फिरत लसीकरणाचे जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे .

छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलग्रस्त भागातले एक गाव, जिथे २००६ पर्यंत सरपंचच नव्हता.

नक्षलवाद्यांच्या दबावामुळे इथे राजकारणी आणि प्रशानाने ही फारसे लक्ष कधी घातलेच नव्हते.  न कोणती योजना कोणती आरोग्याच्या जनजागृतीबद्दल कार्यक्रम न कसली धोरणं. अशा गावातली भाग्यश्री !

भाग्यश्रीचे वडील शिक्षक तर आई अंगणवाडी सेविका त्यामुळे तिला शिक्षणाची ओढ लागली. शिकलेली भाग्यश्री आरोग्याच्या बाबतीत जागरूक होती. तिच्या समाजकार्यामुळे ती गावची सरपंच म्हणून निवडूनही आली. कोरोनाकाळात तिने गावच्या आणि आजूबाजूंच्या आदिवासी पाड्यांवर कोरोना  विषाणू विषयी माहिती आणि काळजीविषयक सूचना इत्यादी मोहीम पूर्णत्वास नेली.

या आदिवासी भागात वीज नाही, पण लस पोहचली.

ग्रामीण भागात लसीबद्दल असलेली भीती तिच्याही गावाकडे होतीच.  अतिशय दुर्गम अशा भागात  अजूनही काही पाड्यांवर वीज नाही पोहचली मात्र कोरोना ची लस मात्र पोहचली. परंतु  मागासलेले हे आदिवासी कोरोनाची लस घेण्याची हिंमत करीत नव्हते.

“लस घेतली की माणूस आजारी पडतो आणि दवाखान्यात नेलं की तिथे आपली किडनी काढून घेतात”  अशी अफवा इकडे पसरली आणि सगळी मंडळी घाबरून गेली.

मुळात या अफवांना दूर करून लोकांना लस घेण्यासाठी कसे राजी करायचे याचा विचार भाग्यश्रीने केला. माझ्या गावात १००% लसीकरण झालेच पाहिजे असा निर्धार तिने मनाशी केला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तिने एकना-एक आदिवासी पाडे पिंजून काढले.

तसेच सोबत प्रकाश आमटे यांनी स्थापन केलेल्या लोकबिरादरी रुग्णालयाचे  ४० कार्यकर्तेही भाग्यश्रीला या मोहिमेत युद्धपातळीवर मदत करत होते त्यामुळे भाग्यश्रीची मोहीम यशस्वी झाली आहे.

आदिवासी भागात प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी यांच्यबाबतीतला विश्वास त्यामुळे आदिवासींना भाग्यश्रीच्या लसीबाबत संदेश आणि सूचनांवर विश्वास बसला.

तसेच दोघांच्या समन्वयामुळे जनजागृतीसाठी येथील आदिवासी भाषेत व्हिडिओ तयार करण्यात आले. यामुळे हि मोहीम आणखीनच सोपी गेली.

ह्या मोहिमेबद्दल भाग्यश्रीने बोल भिडूशी बोलतांना सांगितले कि, ” आमचा नक्षलग्रस्त भाग, त्यात मागासलेले आदिवासी जमात त्यांना शिक्षणाचा गंध ना आरोग्याचा, त्यात लसीकरणाविषयी कसलीही माहिती नसल्यामुळे हि लोकं लस घ्यायला नाही म्हणत होती. तेंव्हा मी काही गावकर्यांना आणि लोकबिरादरीच्या काही स्वयंसेवकाना सोबत घेऊन गावात आणि आदिवासी पाड्यांवर फिरून त्यांना समजावलं कि, लस आत्ताच्या घडीला का महत्वाची आहे वेगरे. गावातली लोकं मला बहिण मानतात. त्यामुळे माझ्यावर त्यांचा असलेल्या विश्वासामुळे हे सगळ शक्य झालं आहे.” 

भाग्यश्री लेखामी, सरपंच, कोठी ग्रामपंचायत

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.