कधीकाळी हातात बंदुका असणाऱ्या नक्षलवादी महिलांनी स्वतःचा ब्रँड उभा केलाय

गडचिरोली. हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर येतं ते घनदाट जंगल, नक्षलवाद्यांशी होणाऱ्या चकमकी आणि मनात दाटते भीती. बऱ्याच पिक्चरमध्ये प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याला त्याचे भ्रष्ट सिनिअर्स किंवा नेते धमकी देतात, ‘म्हणतोय तसं वाग, नायतर गडचिरोलीला पाठवीन.’ याच कारणामुळं गडचिरोलीची इमेज म्हणजे नक्षलवाद आणि मृत्यूचं भय अशीच अनेकांच्या डोक्यात फिट्ट बसलीये.

पण सत्यस्थिती पाहिली तर, पोलिसांच्या प्रयत्नांमुळं तिथली परिस्थिती काही प्रमाणात बदलत आहे, तेही तितकंच खरं.

तुम्ही पिक्चरमध्ये आणखी एक गोष्ट पाहिली असेल, ती म्हणजे पहिल्या हाफमध्ये हिरो एकदम मवाली असतो. भाईगिरी, व्यसनं, मारामाऱ्या असल्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढं. मग इंटरव्हलच्या जस्ट आधी त्याच्या आयुष्यात हिरॉइन येते, नायतर त्याला आपल्या पुनर्जन्माचा साक्षात्कार होतो. त्यामुळं तो एकदम सुधारतो, फॉर्मल कपडे-बिपडे घालून, बॅग अडकवून ऑफिसला जातो. स्वतःचा बिझनेस सुरू करतो. आता पिक्चरमधल्या गोष्टी खऱ्या होतातच असं नाही.

पण भिडू लोक नक्षलवादाशी कनेक्शन जोडलं जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये असा एक किस्सा घडलाय… त्यात हिरो ठरल्यात शरण आलेल्या नक्षलवादी महिला आणि त्यांचं जीवनध्येय बदलण्याचं काम केलंय, गडचिरोली पोलिस आणि एका स्वयंसेवी संस्थेनं.

आता जरा डिटेलमध्ये सांगतो-

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये काही नक्षलवादी शरण आले. त्यांच्या पुनर्वसनासाठी पोलिसांनी त्यांना वर्ध्यातल्या ‘महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेत’ तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं. या प्रशिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट शरण आलेल्या नक्षलवाद्यांना रोजगार देणं आणि त्यांना स्वयंपूर्ण करणं हे होतं. प्रशिक्षणा दरम्यान त्यांनी स्वच्छतेसाठी लागणारं फिनाईल बनवणं शिकून घेतलं.

या शरण आलेल्या पुर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांसाठी पोलिसांनी ‘नवजीवन उत्पादक संघ’ या नावानं स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे. त्याच्या अंतर्गतच हे काम सुरू झालं. या गटात १० महिला आणि २ पुरुषांचा समावेश होता. त्यांनी बनवलेल्या फिनाईलला ‘क्लिन १०१’ असं नाव देण्यात आलं आहे.

या महिलांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारे गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल सांगतात, ‘या महिलांना स्वयंसेवी संस्थेनं एकत्र आणलं. त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ‘क्लिन १०१’ चा पहिला लॉट बाजारात आला. या फिनाईलची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या इतर फिनाईल्सपेक्षा अत्यंत कमी आहे. विशेष म्हणजे किंमत कमी असली, तरी या फिनाईलची गुणवत्ता मात्र उत्कृष्ट आहे. गडचिरोली पोलिस या महिलांची आणि स्वयंसेवी संस्थांची पूर्ण मदत करत आहेत. आताही अनेक सरकारी संस्था या फिनाईलची ऑर्डर नोंदवत आहेत. त्यामुळं, येणाऱ्या महिन्यांमध्ये आम्ही आणखी वेगानं यावर काम करू आणि आणखी संस्थाही या फिनाईलची ऑर्डर देतील अशी आशा आहे,’ असं मत व्यक्त केलं आहे.

यामुळं शरण आलेले नक्षलवादी मुख्य प्रवाहात येण्यात मदत होईल आणि त्यांचं सक्षमीकरण होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांनीही याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

थोडक्यात या उपक्रमाला आणखी प्रतिसाद मिळाला, तर हा फिनाईलचा ब्रँड आपल्या आजूबाजूच्या सुपरमार्केटमध्येही दिसू शकतो आणि जेवायला बसल्यावर हमखास लागणाऱ्या फिनाईलच्या जाहिरातीऐवजी याची जाहिरातही दिसू शकते.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.