धोनीच्या आधीचा खतरनाक विकेटकीपर असणारा नयन मोंगिया फिक्सिंगमध्ये अडकला तो कायमचाच….

विकेटकिपर जर चांगला हुशार असेल तर तो पूर्ण टीमचा विश्वास वाढवतो. चाणाक्ष विकेटकिपर म्हणल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो महेंद्रसिंग धोनीचा चेहरा. म्हणजे आजच्या क्रिकेटमध्ये DRS प्रकरण आल्यापासून विकेटकिपर किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण धोनी आधी सुद्धा एक अव्वल दर्जाचा विकेटकिपर भारताकडे होता.

नयन मोंगिया

आता नयन मोंगियाबद्दल बोलताना त्याच्या करियरमध्ये तो व्हिलन होता कि हिरो हा प्रश्न पडतो. एकदा तर टीमचा जोश वाढवण्यासाठी मोंगियाने इतक्या अपील केल्या होत्या कि त्याला त्याबद्दल दंड भरावा लागला होता. नंतर मात्र मॅच फिक्सिंगच प्रकरण त्याच्या नावाला चिकटलं ते थेट त्याला संघातून बाहेर फेकणारं ठरलं.

१९८९-९० सालापासून नयन मोंगियाच्या क्रिकेट करियरची सुरवात झाली.  भारतीय संघाचे विकेटकिपर किरण मोरे होते. किरण मोरे आणि नयन मोंगिया रणजी संघामध्ये विकेटकिपर होते. जेव्हा किरण मोरे भारतीय संघाकडून खेळायला जायचे तेव्हा नयन मोंगिया रणजी संघात विकेटकिपर म्हणून उपलब्ध असायचा.

नयन मोंगिया हा चांगला विकेटकिपर तर होताच त्याशिवाय तो बॅट्समन म्हणूनही उत्तम होता. किरण मोरे जोवर भारतीय संघात होते नयन मोंगियाला संघात जागा मिळाली नाही. पण जेव्हा किरण मोरे यांनी क्रिकेटला रामराम ठोकला तेव्हा नयन मोंगियाची धडाक्यात एंट्री झाली. १९९४ साली नयन मोंगियाचं भारतीय संघात पदार्पण झालं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नयन मोंगियाला नॅचरल विकेटकिपर म्हणून ओळखलं जायचं. एका टेस्ट मॅचमध्ये त्याने तब्बल ८ कॅच पकडले होते. हा रेकॉर्ड बराच काळ त्याच्या नावावर होता.

भारतीय संघात त्याकाळी स्पिनर लोकांची तगडी फौज उपलब्ध होती. हरभजन  सिंग,अनिल कुंबळे या फिरकीपटू लोकांसाठी नयन मोंगिया विश्वासाचा खेळाडू होता. कारण स्पिनरच्या बॉलचा टप्पा कुठे पडून कुठे वळणार हे मोंगियाला अचूक माहिती असायचं त्यामुळे स्पिनर लोकांचा तो खास खेळाडू होता.

अनिल कुंबळेने पटकावलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या दहा विकेटमध्ये जितकं योगदान बॉलिंगच होतं तितकंच महत्वाचं योगदान नयन मोंगियाचं होतं. त्याने पकडलेला एक अप्रतिम झेल पुढे त्याला हिरो बनवून गेलं. पण नंतर कळलं कि तो झेल घेताना त्याचं बोट मोडलं होतं.

धोनीच्या चपळाईचं जितकं कौतुक आज होतं तितकंच कौतुक नयन मोंगियाच्या स्टंपमागे व्हायचं. खेळाडूंचा जोश वाढवणं असू किंवा अवघड झेल घेणं असू नयन मोंगिया कधी चुकायचा नाही. त्याकाळचा भारताला लाभलेला बेस्ट विकेटकिपर म्हणून मोंगियाचा नावलौकिक होता.

आता संघात जर जागा टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला विकेट किपींग बरोबरच बॅटिंग सुद्धा चांगली करावी लागते. रणजी क्रिकेट खेळताना नयन मोंगिया खोऱ्याने धावा काढायचा त्याबळावरचं त्याच संघात सिलेक्शन झालं होत. ५ मॅचेसमध्ये त्याने ५५५ धावा ठोकून आपली योग्यता दाखवून दिली होती.

मात्र भारतीय संघात आल्यावर मोंगियाची बॅटिंग ढेपाळली. महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना हाताला घेऊन धावा करणे मोंगियाला जमायचे नाही. आणि त्याला जास्त बॅटिंगसुद्धा मिळत नव्हती. संपूर्णच क्रिकेट करियरमध्ये १५२ धावांची खेळी सोडली तर नयन मोंगियाला बॅटिंगमध्ये विशेष चमक दाखवता आली नाही.

सगळं ठीक चालू असताना मॅच फिक्सिंग प्रकरणात मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा या लोकांसोबत नयन मोंगियाचं नाव आलं आणि तिथून त्याच्या क्रिकेट करियरला कायमचाच ब्रेक लागला.

कानपूरमध्ये खेळवल्या गेलेल्या वेस्ट विरुद्धच्या एका मॅचमध्ये नयन मोंगियाचा खेळ हा संशयास्पद असल्याचं बोललं गेलं. एक सोपा रनआउट मोंगियाने सोडला त्यामुळे त्याला बऱ्याच शिव्या पडल्या होत्या. आता फिल्डिंगमध्ये त्याने केलेली चूक कमी होती कि काय म्हणून त्याने मनोज प्रभाकर सोबत बॅटिंग करतेवेळी अशी बॅटिंग केली कि असं वाटत होत कि हे दोघे मॅच हरवण्यासाठी खेळत आहेत. त्यात नयन मोंगियाने २१ चेंडूत केवळ ४ धावा केल्या होत्या.

या मॅचमध्ये खराब खेळामुळे मोंगियाला संघाच्या बाहेर जावं लागलं. पण जेव्हा मॅच फिक्सिंगचा फेरा आला त्यात मोंगियाचं नाव आलं आणि परत नयन मोंगियाला कधीच संघात परतता आलं नाही. त्याच्या वरचे आरोप सिद्ध देखील झाले नाहीत. तो खरंच दोषी होता का हे कोणाला माहित नाही. अझर आणि जडेजा यांच्या पेक्षा मोंगियाच करियर अजून लांबलं असत, धोनी येईपर्यंत भारताकडे चांगला किपर देखील नव्हता.

पण बीसीसीआयचे माजी सदस्य जयवंत लेले म्हणतात की राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन्ही खेळाडूंनी आग्रह धरला होता कि फिक्सिंगचे आरोप झालेल्या मोंगियाला टीम मध्ये स्थान द्यायचं नाही.

चांगला विकेटकिपर असूनही फिक्सिंग मध्ये गोवल्यामुळे नयन मोंगियाला संघाबाहेर बसावं लागलं ते मात्र कायमचंच….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.