कोळीणीची गोष्ट…

 

“बहुतांशी पुरुष मंडळी इतरत्र स्थलांतरित झाल्याने, कोकणात स्त्रियांमध्ये आलेले नेतृत्वगुण, धाडसीपणा आणि पुरुषीपणा या फोटातून जास्त स्पष्ट होतोय”.

चिपळूण येथील महाविद्यालयात भूगोल व त्या अनुषंगाने येणारा स्थलांतरासारखा विषय शिकवणारा मित्र राहूल पवार याचे हे शब्द या छायाचित्राला चपलख बसतात. गेल्या काही वर्षांत दिवसेंदिवस मासेमारी कमी होत चाललीय. अत्याधुनिक असे ट्रॉलर्स आणि पर्सिनेट जाळ्यांमुळे लहान मोठे सर्वच मासे ओरबाडून घेण्याचा कल वाढतोय. त्याची परिणती मत्स्य दुष्काळात होतेय. मग स्थानिक पारंपारिक मच्छिमारांकडे पर्याय काय रहातो? मुंबईत जाऊन कोणत्याही ट्रॉलरवर नोकरी करायची! त्यामुळे बरेचसे पुरुष मच्छिमार मुंबईत स्थलांतरित झालेत. त्यामुळे गावातला जो शिल्लक मासेमारी व्यवसाय होता तो महिलांच्या हातात आला व त्यातून त्यांच्याकडे नेतृत्वगुण आले.

फेब्रुवारीत गुहागरमध्ये आम्ही पहिलं सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफी वर्कशॉप घ्यायचं ठरवलं. वर्कशॉपमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना फोटो वॉकसाठी कुठे घेऊन जायचं याची चाचपणी करण्यासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओळवे, हेलेना आणि मी असे तिघं वेगवेगळ्या गावांना भेट देत होतो. प्रत्येक गावातील स्थानिकांशी बोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या भागात स्थलांतराचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे मायग्रेशन हा विषय घ्यावा असं हेलेनानं सुचवलं. असंच एका गावात फिरत असताना समुद्राच्या किनारी मी या कोळीणीचा फोटो काढला. तिला पहाताच सर्वात प्रथम माझ्या डोळ्यात भरली ती म्हणजे तिची देहबोली म्हणजेच बॉडीलँग्वेज. तिच्या देहबोलीतला रांगडेपणा तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाबद्दल भाष्य करत होता. क्षणाचाही विलंब न करता मी तिचं छायाचित्र टिपलं. सर्व मिळून मी तिचे ४ फोटो काढले.

आता बरेचदा प्रश्न उपस्थित होतो की फोटो काढताना मला हा आशय दिसला होता का? की फोटो काढून झाल्यावर हा प्रेक्षक त्याचे अर्थ लावतो? तर फोटोच्या बाबतीत या दोन्ही शक्यता असू शकतात. मला वाटतं की आशय हा आपल्या आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक वातावरणात उपलब्धच असतो. गरज असते ती फोटोग्राफरने सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने तो आशय चित्रबद्ध करण्याची. उदाहरणार्थ या फोटोवरून असं वाटतं की ती या भव्य समुद्रावर एकटी उभी आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिच्या डाव्या बाजूला अगदी जवळ एक पुरुष तिच्याशी गप्पा मारत होता व तिच्या उजव्या बाजूला 20 ते 25 कोळींणींचा घोळका होता जो बोटी समुद्रातून येण्याची वाट पहात बसला होता. मग मी फक्त कोळीणीचाच फोटो का काढला?

कोणतंही छायाचित्र हे वस्तुस्थिती दाखवतं. प्रत्येकवेळी ते सत्य दाखवेलच असं नाही किंवा सत्य दाखवलंच पाहिजे असा अट्टाहासही नाही. छायाचित्रात काय दाखवायचं याबरोबरच किती दाखवायचं हे ठरवणंही महत्वाचं असतं. खूप साऱ्या गोष्टी एकत्र चित्रित केल्या तर ते छायाचित्र फक्त इन्फॉर्मेटिव्ह होऊन जाईल. गरज असते ती थोडं गूढ चित्रित करण्याची की ज्यामुळे प्रेक्षक त्या छायाचित्राजवळ थांबेल, विचार करेल, अर्थ शोधेल. एका छायाचित्रात तर तिचा चेहराही स्पष्ट दिसतोय. पण मी त्यापेक्षा हे चेहरा न दिसणारं छायाचित्र निवडलं कारण यात प्रेक्षक स्वतःच्या कल्पणाशक्तीने चेहरा पाहतो. जेवढे प्रेक्षक हे छायाचित्र पाहतील तेवढे चेहरे या कोळीणीला आहेत. जर तिच्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी मी पकडल्या असत्या तर प्रेक्षकाचं लक्ष सर्व गोष्टींमध्ये विभागलं गेलं असतं. मला तसं करायचं नव्हतं. मला सर्वात महत्वाची गोष्ट वाटत होती ती म्हणजे तिची शरिरभाषा! तिचं समुद्राकडे खंबीरपणे पहाणं!! प्रेक्षकांना समुद्राची गाजही ऐकवायची होती. मला वाटतं या फोटोला बॅकग्राऊंड म्युझिकही आहे व हे सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात मी बऱ्याच अंशी सफल झालोय अशी आशा आहे.

नजरिया –

फोटोचे पदर …!!!

गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान.