या फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं ?

असा प्रश्न जेव्हा प्रेक्षकांकडून येतो तेव्हा काय उत्तर द्यायचं ते क्षणभर कळत नाही. खरंतर एखाद्या चांगल्या लोकेशनला फोटो काढायला ठरवून जाणं काही माझ्याकडून होत नाही. पण नेहमीचीच आजूबाजूची ठिकाणं वेगळ्या नजरेतून टिपणं मला फार चॅलेंजींग वाटतं.

हा फोटो मी काढलाय गगनबावडा कोल्हापूर रस्त्यावर. या फोटोवरही सोशल मिडीयावर लोकशन विचारणारे कित्येक प्रश्न आले. आणि जेव्हा मी हा गगनबावडा रस्ता आहे असं सागितलं तेव्हा कित्येकांना त्यावर विश्वास बसला नसेल. कारण या रस्त्यावरून कित्येकांचं येणंजाणं होत असतच. मग नेमकं हे दृष्य़ आपल्याला का दिसत नाही? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तेव्हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारून पहायला हरकत नाही. रस्त्यावरून जाताना सुर्यफूलांचं शेत आपण कित्येकदा पाहिलय. पण कधी थांबून थोडा वेळ काढून सुर्यफूलांच्या शेतातून रस्ता कसा दिसत असेल हे कधी आपण पाहिलय का?

एक चांगलं छायाचित्र काढण्याचा एक गोल्डन स्पॉट असतो. म्हणजे त्याच स्पॉटवरून तेच ठिकाण नेहमीपेक्षा वेगळं वाटू शकतं. हे छायाचित्र काढताना मी प्रथम गाडी थांबवून त्या शेतात घूसलो. मग वेगवेगळ्या ठिकाणांवरून ते शेत कसं दिसतय याची चाचपणी केली. मग अशी जागा निवडली कि जिथून मला सर्व फुलांचे चेहरे दिसतील. मग अशा उंचीवर मोबाईल कॅमेरा पकडला की ज्यामुळे फुलं एकमेकांवर ओव्हरलॅप होणार नाही. आता माझी फ्रेम सेट झाली होती. समोर फुलं व त्यापाठीमागे एक भव्य रेन ट्री. आता मला अजून काहितरी त्यात हवं होतं. म्हणजे पिवळ्या फुलांसोबत, निळ्या आकाशासोबत आणि हिरव्या झाडांसोबत लाल रंग आला तर किती मजा येईल असा विचार करून मी योग्य वेळेची वाट पाहू लागलो. व साधारण दहा मिनीटांनी ती वेळ आली. एक लाल रंगाची एस.टी. बस तिथून जात होती. व क्षणाचाही विलंब न लावता मी ती गाडी योग्य़ ठिकाणी आल्यावर फोटो काढला.

तर प्रत्येक जागेवर अशी एक सिक्रेट जागा असतेच असते जिथून जग वेगळं भासतं. ती जागा शोधायला पाहिजे मात्र. मग सर्वसामान्य वाटणारी नेहमीचाच परिसर विलक्षण सुंदर भासू लागते. त्या परिसरातील नेहमीच्याच गोष्टी फोटोच्या सौदर्यात भर घालू लागतात. यानिमीत्तानं स्टीफन शोर या महान छायाचित्रकाराचं एक कोट आठवतं.

“ To see something spectacular and recognize it as a photographic possibility is not making a very big leap. But to see something ordinary, something you’d see every day, and recognize it as a photographic possibility – that is what I am interested in.”

स्टीफन शोर म्हणतो ते अगदी सहज सोप्प आहे. निसर्गात किंवा आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात घडणारी नेत्रदिपक घटनेचे फोटो काढण्यापेक्षा नेहमीच्याच आयुष्यातील रोज दिसणाऱ्या सर्वसामान्य गोष्टीतलं सौंदर्य शोधण्यात मला जास्त रस आहे. भारतात घडणाऱ्या असंख्य उत्सवांमध्ये जाऊन त्याच त्याच प्रकारचे फोटो काढणार्या फोटोग्राफर्सनी याचा अर्थ समजून घ्यायची गरज आहे.

  • इंद्रजीत खांबे

४) कोळीणीची गोष्ट

३) वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार

२) गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान

१) फोटोचे पदर

 

Leave A Reply

Your email address will not be published.