असं मार्केट जे शेतकऱ्याला शेती मालाचे भविष्यातले भाव सांगून आजच्या घडीला नफा मिळवून देतं

युद्धाचा संपूर्ण जगावरंच परिणाम झाल्याचं आपण बघतोय, अनुभवतोय. आता भारतात ज्या घटकांवर याचा परिणाम झाला त्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्टॉक मार्केट. युद्ध सुरू झालं भलत्याच देशांत आणि झोप उडाली भारतातील लोकांची. ज्यांनी ज्यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलंय अशा सगळ्यांचं लक्ष फक्त आकड्यांवर होतं. यात थोडा अनुभव असल्यांचं तेवढं ठीक पण नवशिख्यांच्या डोक्याचा पार टाकाच उडाला.

यावरून आठवलं, तुम्हाला माहितीये का, स्टॉक मार्केट सारखं कृषी मालामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं देखील मार्केट असतं, जे भविष्यातील रेट कळवतं.

याला वायदेबाजार असं म्हणतात. भरीस भर आता केंद्र सरकारने या मार्केटलाही झटका दिलाय. म्हणजेच एनसीडीइएक्सला. एनसीडीइएक्स वरील सात कमोडिटीजच्या वायद्यांवर केंद्राने बंदी घातलीय. ज्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. 

शेतकऱ्यांवर आता कोणतं नवीन संकट येऊ शकतं? असा प्रश्न पडला असेल. आणि त्यातही हे काय नवीन आहे ज्यामुळे असं होऊ शकतं? असे प्रश्न पडले असतील तर जरा टप्प्याटप्प्याने गोष्टी सोप्या पद्धतीने समजून घेऊया.

वायजेबाजार म्हणजे काय?

वायदेबाजार म्हणजे भविष्यातील रेट सांगणारं मार्केट. सोपं करून सांगतो. खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणजे धान्य वगैरे घ्यायचे असेल तरी तुम्ही मंडीमध्ये जातात. आता मंडीमध्ये सगळा व्यवहार रोखठोक आणि समोरासमोर होत असतो. खरेदीदार आणि विक्रेता दोघं तिथे हजर असतात. म्हणून मंडीला ‘हजर बाजार’ असं म्हणतात. त्याला स्पॉट मार्केट असं देखील एक नाव आहे. हजर बाजारात प्रत्यक्ष आणि वर्तमान काळातले व्यवहार चालतात. तर वायदेबाजार याच्या एक पाऊल पुढे असतो. 

वायदेबाजारात भविष्यातील रेट ठरवले जातात. भविष्यात कोणता माल किती रुपयांना विकता येईल, याचा अंदाज यावरून बांधता येतो. तर आजच्या मालाला भविष्यातील किमतीनुसार खरेदीदार आणि विक्रेता दर देऊ शकतात. कोणत्याही मालाचे व्यवहार करताना त्याची रेट फिक्स करणारी बाजारसमिती म्हणजे वायदेबाजार असं आपण म्हणू शकतो. 

म्हणजे बघा, मार्च महिन्यात जर तुम्हाला तूर विकायची असेल आणि कुणाला खरेदी करायची असेल तर  तुम्ही एप्रिलमध्ये त्याला काय भाव असतील? याचं अवलोकन करून त्या दरानुसार व्यवहार लॉक करू शकतात. एकंदरीतच एप्रिलचे व्यवहार फिक्स करू शकतात. आता याचा फायदा असा की, जर कोणत्याही कारणाने भविष्यात तुरीचे रेट शेतकऱ्याने केलेल्या व्यवहारापेक्षा कमी झाले तर याचा शेतकऱ्याला फायदा होत असतो.

कुठे असतो हा बाजार? असं विचारण्याआधी सांगतो, हा बाजार पूर्णपणे ऑनलाईन असतो. ऑनलाईन तुम्हाला कृषी मालांची आकडेवारी दिसत असते. ती देखील येत्या २-३ महिन्यांची. त्यात सतत चढ-उतार कसे होताय, याचा ग्राफ समजतो. अशाप्रकारे शेतीमालाच्या भविष्यातील रेटनुसार वर्तमानात व्यवहार केले जातात. 

आता ऑनलाईन म्हटलं तर कोणत्या प्लॅटफॉर्मवर हे फ्युचर कमोडिटी एक्सचेंजचे व्यवहार चालतात? हा मुद्दा येतो. 

त्याचं नाव आहे एनसीडीइएक्स (NCDEX). एनसीडीइएक्सचा फुलफॉर्म आहे नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्स एक्सचेंज. हे देशातील सर्वात मोठं कृषी वायदे एक्सचेंज आहे. २००४ साली याची सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही प्रॉपर कंपनी आहे. खाजगी सार्वजनिक भागीदारीने सुरु झालेली कंपनी. यात अपेडा, नाबार्ड, एलआईसी, एनएसई  यांसारख्या सरकारी, सेमी-सरकारी आणि खाजगी उपक्रमांनी गुंतवणूक केलेली आहे. 

एनसीडीइएक्सवर कापूस, तूर, चणा, मोहरी, हळद, जिरा, पामतेल, कोथिंबीर, मूग डाळ अशा अनेक कृषी मालाच्या भविष्यातील किमती दिलेल्या असतात. याच्या शाखा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत जसं की, अहमदाबाद, इंदूर, हैदराबाद, जयपूर आणि कोलकाता. देशभरातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना सेवा पुरवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. आपण असे म्हणू शकतो की, एनसीडीइएक्सच्या स्थापनेमुळे भारतातील कृषी वस्तू व्यापार क्षेत्राने परिपक्वतेच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं आहे.

एनसीडीइएक्सच्या स्थापनेची गरज का भासली?

कृषी मालाच्या उत्पादनात भारत हा जागतिक महासत्ता आहे. गहू, तांदूळ, दूध, कडधान्ये, विविध फळे आणि भाजीपाला यासारख्या वस्तूंच्या प्रमुख उत्पादकांपैकी भारत एक आहे. मात्र भारतीय बाजारपेठा बहुतेक विखुरलेल्या होत्या, स्थानिक पातळीवर कार्यरत होत्या. राष्ट्रीय स्तरावर कृषी उत्पादनांचा व्यापार करण्यासाठी कोणतंही व्यासपीठ नव्हतं. राष्ट्रीय स्थरावर शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आणलं तर कृषी क्षेत्र अजून मजबूत होईल, या उद्देशाने एनसीडीइएक्सची संकल्पना मांडण्यात आली.

NCDEX भारताच्या वाढत्या कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे. गुंतवणूकदारांना कृषी मालाच्या विस्तृत श्रेणीमध्ये थेट गुंतवणूक करण्याची संधी यामुळे मिळाली आहे. शिवाय वर्षभर ठराविक आणि फिक्स मूल्याने व्यवहार तर होतातच पण विक्रेत्याची देखील सुविधा होते. 

एनसीडीइएक्सचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतो?

NCDEX बाजारपेठेत पारदर्शकता प्रदान करते. भारतीय शेतकऱ्यांना वर्षभराच्या सुविधेसह पिकांच्या किंमती शोधण्यात मदत होते. ज्याने शेतकऱ्यांना जोखीम टाळण्यास आणि नुकसानीचा अंदाज लावता येतो. माल विकावा की होल्ड करून ठेवावा याचा अंदाज आल्याने फायद्याचे चान्सेस वाढतात. उदाहरण घ्यायचं झालं तर सोयाबीनचं घेऊया. 

गेल्यावर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळाले होते. यामागचं कारण होतं शेतकऱ्यांनी उत्कृष्ट शैलीने केलेले व्यवहार. भविष्यातील भावाचं अवलोकन करूनच शेतकऱ्यांनी माल विकायचे निर्णय घेतले होते. तज्ज्ञांनी एनसीडीइएक्सच्या वायद्यांवरूनच शेतकऱ्यांना सल्ले दिले होते. म्हणून सोयाबीनमध्ये क्रांती घडून आली होती, असं सांगितल्या जातं. एनसीडीइएक्सचं हे यश असल्याचं मानलं जातं.

NCDEX ने विविध करारांद्वारे उत्पादनाची गुणवत्ता प्रमाणित करून भारताच्या कृषी पद्धती सुधारण्यास मदत केली आहे. मात्र आता केंद्राच्या एका निर्णयाने मोठा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसण्याचा धोका निर्माण झालाय. 

नेमकं काय झालंय?

केंद्र सरकारने सात कमोडिटीजच्या वायद्यांवर बंदी घातलीये. एनसीडीइएक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलेल्या कमोडिटीजमध्ये बिगर बासमती, गहू, तांदूळ, चना, मोहरी, मोहरी तेल आणि सोयापेंड तसंच इतर घटक, मूग आणि कच्चा पाम तेल यांचा समावेश आहे. याचा वायदेबाजारावर मोठा परिणाम झाला असून एनसीडेक्सची डिसेंबरमधील उलाढाल १२ टक्क्याने घटलीये.

एकदा गुंतवणूकदारांनी एखाद्या कमोडिटीजमधील गुंतवणुकीकडे पाठ फिरवली की त्यांना पुन्हा गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यास वेळ लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची संधी जाते शिवाय भविष्यातील रेट बांधण्यासही अडचणी येतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हजर बाजार मंदावला तर जसा शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर परिणाम होतो, तसाच परिणाम वायदेबाजारामुळे देखील होतो. सरकारच्या या निर्णयाचा फटका बसल्याने एनसीडेक्सच्या व्यापाराचे प्रमाण ३७ टक्क्यांनी मंदावले आहे, जो व्यापार फेब्रुवारीत ३६.५७ लाख होता. त्यामुळे सरकारने वायदे बंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी केली जातेय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.