पवारांची राष्ट्रवादी केरळमध्ये दोन आमदार निवडून आणते, हे कस काय ?
काल पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी, तामिळनाडू द्रमुक, आसाम आणि पुदुच्चेरी भाजपने जिंकला. तर केरळ वर पुन्हा डाव्यांचं वर्चस्व राहिलं. पिनराई विजयनच पुन्हा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
गेली काही वर्ष देशभरात भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. अगदी नॉर्थ ईस्टच्या राज्यांना देखील त्यांनी आपल्या खिशात टाकलं. पण दक्षिणेत त्यांचा प्रवेश होत नाहीय.
यावर्षीच्या केरळ निवडणुकीसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बरीच मेहनत घेतली. सभा झाल्या, मेट्रो मॅन ई श्रीधरन सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाला पक्षात आणलं. पण काही उपयोग झाला नाही. श्रीधरन स्वतः पडलेच पण केरळ मध्ये भाजपला यंदा खातं देखील उघडता आलं नाही.
केरळचा निकाल बारकाईने बघताना महाराष्ट्राच्या वीरांना एक गोष्ट नजरेत आली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले.
पंढरपूरच्या पराभवामुळे धक्क्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केरळचा निकाल बघून जल्लोष केला. ममता दीदींच्या विजयात बेगानी कि शादी में दिवाना होण्यापेक्षा आपले विजय साजरे करण्यासाठी केर्ळवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं. मोठमोठ्या नेत्यांनी अभिनंदनाचे ट्विट केले.
राष्ट्रवादीच्या गोटात हा विजय साजरा होत असताना बाकीच्यांना एक प्रश्न पडला, भाजप जिथं एक पण आमदार निवडून आणत नाही तिथं राष्ट्रवादीचे दोन आमदार कसे?
याच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल.
गोष्ट आहे नव्वदीच्या दशकातली. शरद पवार तेव्हा काँग्रेसचे केंद्रीय नेते होते. १९९१ साली सत्ता आली तेव्हा त्यांनी पंतप्रधानपदासाठी फिल्डिंग लावलेली. युथ काँग्रेस मध्ये असल्यापासून त्यांचा देशभरच्या नेत्यांमध्ये संपर्क होता. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने ते उत्तरप्रदेश, पंजाब हरियाणा या भागात फिरले होते.
पण त्यावेळी दक्षिणेतल्या खासदारांनी नरसिंह राव यांच्या बाजूने आपलं मत टाकलं आणि पवारांचं पंतप्रधान पद हुकलं. शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री झाले पण भविष्यासाठी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घ्यावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं होतं. केरळ, तामिळनाडू, आंध्र येथील खासदारांशी नेत्यांशी त्यांनी संपर्क वाढवण्याचं धोरण राबवल.
पुढे मुंबई दंगलीमुळे त्यांची केंद्रीय संरक्षण मंत्रिपदाची कारकीर्द अल्पकालीन ठरली. शरद पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद परतले. गोपीनाथ मुंडे, खैरनार यांच्या आरोपांमुळे राज्यातच बिझी झाले. पण जेव्हा १९९५ साली महाराष्ट्रातील सत्ता गेली तेव्हा त्यांनी दिल्लीकडे आपलं लक्ष वळवलं.
सीताराम केसरी यांना काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवण्याच्या निर्णयात आणि सोनिया गांधींना राजकारणात सक्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या काळात ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या लोकसभेत विरोधी पक्ष नेते देखील होते. पुढे मागे पंतप्रधानपद मिळणार म्हणून तयारी देखील चालली होती. इतक्यात केसरीना हटवून काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या सोनिया गांधींशी त्यांचे वाद सुरु झाले.
शरद पवारांनी देखील सोनियांजींच्या विदेशी जन्माचा मुद्दा लावून धरला.
काँग्रेस विरुद्ध कटकारस्थान करत आहेत असं म्हणून पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. या तिन्ही नेत्यांनी मिळून एका नवीन पक्षाची स्थापना केली,
याला नाव दिलं, राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार सर्वात जेष्ठ म्हणून त्यांना पक्षाचा अध्यक्ष बनवण्यात आलं. संगमा आणि तारिक अन्वर या संस्थापकांनी आपआपल्या राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवणे टार्गेट ठेवले होते. महाराष्ट्रापासून केंद्रापर्यंत पक्ष रुजावा म्हणून पवारांनी प्रयत्न केले. ठिकठिकाणी त्यांना कार्यकर्ते जोडले जाऊ लागले.
यातच होते उझवूर विजयन.
महाविद्यालयीन आयुष्यातच राजकारणात प्रवेश करणारे विजयन केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील उझवूर इथले होते. सुरुवातीला ते काँग्रेसच्या केरळ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. पदवीधारक असलेले विजयन यांनी काँग्रेस सोडल्यानंतर १९७५ च्या आणीबाणी विरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला.
पुढे ते अर्स काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्याकाळात दक्षिणेतील अनेक नेते या पक्षात सहभागी झाले होते. यात केरळच्या ओमान चंडी यांच्या पासून पीसी चाको, उन्नीकृष्णन, कुरियन अशा अनेक नेत्यांचा समावेश होता. उझवूर विजयन देखील या पक्षात आले. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या सह याच पक्षात होते. त्यांचा विजयन यांच्याशी त्याच काळात संबंध आला. दोघांच्यात चांगली मैत्री झाली.
पुढे शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. विजयन देखील या पक्षात सामील झाले. १९८६ साली पवारांच्या बरोबरच केरळचे नेते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ साली जेव्हा पवारांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांमध्ये विजयन यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
शरद पवारांचा दक्षिणेतला माणूस अशी त्यांची ओळख होती. विनोदी भाषणे, स्वच्छ चारित्र्य यामुळे विजयन यांना केरळमध्ये चांगलीच लोकप्रियता लाभली होती. त्यांना केरळ राष्ट्रीवादी काँग्रेसचा पहिला प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं.
शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याकाळात देशभरात वाढण्यासाठी आपले प्रयत्न सुरु केले होते. बिहार अरुणाचल प्रदेश गुजरात अशा राज्यांमध्ये त्यांचे उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील मिळाला.
२००१ साली केरळमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने ९ जागी आपले उमेदवार उभे केले. तेव्हा त्यांचे षण्मुखादास आणि व्ही.सी.कबीर हे दोन उमेदवार निवडून आले. विजयन यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला मात्र पक्ष बांधणीसाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले.
तेव्हा पासून आजपर्यंत केरळमध्ये साधारण २ ते ४ आमदार निवडून येतात. केंद्रात काँग्रेस बरोबर असणारी राष्ट्रवादी केरळमध्ये मात्र सुरवातीपासून डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट च्या युतीमध्ये आहे. दर निवडणुकीवेळी त्यांना ४ जागा देण्यात येतात. त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान असते.
काही वर्षांपूर्वी उजवूर विजयन यांचं निधन झालं. तेव्हा त्यांच्या जागी टी पी पीताम्बरण मास्टर या जेष्ठ नेत्याला राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं.
या वर्षी निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पाहावयास मिळालं. पाला इथंले आमदार मनी कप्पेन यांनी तिकटी वाटपावेळी त्यांची जागा डाव्या आघाडीसाठी सोडल्यामुळे शरद पवारांच्याकडे तक्रार केली. या बंडाचा प्रश्न सोडवण्यासाठी खुद्द पवारांना केरळला जावे लागले. सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे असे सांगणारे मनी कप्पेन यांनी अखेर पक्ष फोडला आणि आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस केरळ नावाचा नवीन पक्ष स्थापन केला.
आपलाच पक्ष खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा त्यांचा दावा निवडणुकीत बघायला मिळाला. त्यांच्या पक्षाने दोन जागी निवडणूक लढवली. स्वतः मनी कप्पेन यात निवडून आले.
इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही काँग्रेसच्या पी सी चाको यांना फोडलं आणि आपल्या पक्षात घेतलं. राष्ट्रवादीच्या ३ पैकी २ जागांवर आमदार निवडून आले असून, पिनराई विजयन यांच्या डाव्या आघाडीत ते असल्यामुळे नवीन सरकार मध्ये ते सामील होतील. युतीच्या वाटणीनुसार त्यांना एक मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता आहे.
हे ही वाच भिडू.
- केरळातल्या दोन चर्चचा वाद मोदींना ख्रिश्चनांचं गठ्ठा मतदान मिळवून देण्यास उपयोगी ठरतोय..
- त्यांचा केरळमध्ये उदय एका राजकीय खुनाच्या आरोपातून झाला..
- एकेकाळी या नेत्याच्या जोरावर राष्ट्रवादीने बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघितलं होतं.