साधेपणानं जगणाऱ्या प्रा. एनडी पाटलांना एकदा पाचशे रुपयांचं टेबलही प्रचंड महाग वाटलेलं…

सध्याच्या काळात राजकारण आणि साधेपणा हे दोन शब्द हातात हात घालून चालतील, हे चित्र अगदी अभावानंच दिसतं. पण आपल्या देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावून पाहिलं, तर कितीही मोठं पद किंवा जबाबदारी मिळाली तरी साधेपणामुळं ओळखली जाणारी कित्येक नावं आपल्या डोळ्यांसमोर येतात. यातलंच एक अग्रगण्य नाव म्हणजे प्राध्यापक एन. डी. पाटील.

स्वतः अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्माला आले असले, तरी एनडी सरांनी आधी एमए आणि नंतर एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. ते पुढे प्राध्यापक झाले आणि कित्येक मुलांना शिकवण्यात, त्यांच्या भविष्याला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्राच्या मंत्रीपदी निवड झाल्यावरही त्यांनी आपले कपडे आपल्याच हातानं धुवायचा शिरस्ता मोडला नाही. एका आंदोलनावेळी झालेल्या गोळीबारात एनडी सरांच्या पुतण्याला आपला जीव गमवावा लागला, मात्र त्यांनी आंदोलन थांबवलं नाही.

महाराष्ट्राच्या मंत्री पदावर असतानाही आपल्या पदाचा अहंकार न बाळगता सामान्य माणसांसारखेच  एनडी सरही एसटीनेच फिरायचे. आपल्या पायाचं दुखणं बळावल्यावरही त्यांना कार्यकर्त्यांच्या गाडीत बसणं फारसं रुचायचं नाही. अशा या वागण्यानं साध्या पण विचारांनी आणि कामानं प्रबळ असणाऱ्या महाराष्ट्राच्या या झुंजार नेत्याची प्राणज्योत नुकतीच मालवली. त्यांच्या दुर्दैवी निधनानं सारा महाराष्ट्र हळहळला.

एनडी सरांनी हा साधेपणा फक्त राजकीय जीवनातच नाही, तर कौटुंबिक जीवनातही जपला. त्यांच्या पत्नी सरोजमाई या शरद पवारांच्या सख्ख्या भगिनी. सरोजमाईंच्या घरी तशी आर्थिक सुबत्ता. पण एनडी सरांनी विवाहाच्या वेळीच माईंच्या घरी सांगितलं, की ‘पुढचा काय विचार आहे माहीत नाही, पण मदत मागायला तुमच्या दारात येणार नाही हे नक्की.’

कित्येकदा ते सकाळी घरातून बाहेर पडायचे आणि थेट रात्रीच घरी यायचे. यावेळी कित्येकदा सरोजमाईंना घरी एकटं राहावं लागलं. मात्र त्यांनी कधी तक्रार केली नाही. मुलांच्या गळ्यात चावी अडकवून त्या घराबाहेर पडू लागल्या. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईतल्या एका छोट्याश्या शाळेत शिक्षिका म्हणून रूजूही झाल्या. या दोघांचीही जोडी समाजकार्यानं भारावलेली होती.

एनडी सर आपल्याला मिळणारे पैसे कार्यकर्त्यांचा एसटीचा खर्च, रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी लागणारा खर्च या सगळ्यासाठी खर्च करायचे. त्यामुळे घरातल्या खर्चाची जबाबदारी सरोजमाईंनी घेतली होती. सरोजमाई चुलीवर स्वयंपाक करतात हे पाहून, त्यांच्या माहेरुन त्यांना गॅससाठी पैसे देण्यात आले. यावर एनडीसर चांगलेच चिडले. ते म्हणाले, ‘उद्या त्यांनी आपल्या दारात गाडी आणून लावली, तरी आपल्याकडे पेट्रोल टाकायला पैसे नको का?’

सरोजमाईंना नीटनेटकं राहण्याची, घरात नवनव्या गोष्टी घेण्याची सवय होती. एकदा त्यांनी आपल्या मुंबईच्या घरात फर्निचर करायचं ठरवलं, तेही अनेक वर्षांनी. कित्येक वर्ष बचत करुन सरोजमाईंनी घर सजवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी पाच हजाराचा एक टेबल घेण्याचं ठरवलं, पण एनडी सरांना त्यांनी किंमत सांगितली ५०० रुपये.

यावर एनडी सरांचं उत्तर होतं, ‘एवढ्याश्या टेबलसाठी पाचशे रुपये कशाला खर्च करायचे? यापेक्षा स्वस्तात काही मिळत असेल तर पाहा…’

खरंतर, एनडी सरांनी ठरवलं असतं तर त्यांना प्रचंड पैसे कमवता आले असते, ऐशोआरामात जगता आलं असतं, पण अखेरपर्यंत एनडी सर समाजासाठी जगले आणि समाजाचं, विद्यार्थ्यांचं भलं करण्यात त्यांनी धन्यता मानली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.