महाराष्ट्राचे सहकार मंत्री असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुणारे प्रा. एनडी होते.

प्रा. डॉ.एन.डी.पाटील….इतका साधा, सरळ, आक्रमक नेता पुन्हा होणे नाही!

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि विचारवंत प्रा. एन. डी. पाटील आज आपल्यात नाहीत…. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज त्यांचे निधन झाले. प्रा. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खास वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. प्रा. पाटील गेल्या दोन वर्षांपासून घरीच होते….

त्यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. जन्म १५ जुलै १९२९ सांगलीतल्या ढवळी येथे एका अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षण अर्थशास्त्रमधील एम.ए. पुणे विद्यापीठमध्ये झालं तर तिथेच त्यांनी   एल.एल.बी देखील पूर्ण केलं..

ते प्राध्यापक असले तरी प्राध्यापकी नावालाच केली होती

महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या विचाराचे वाहक, महाराष्ट्रातल्या कितीतरी आंदोलनांचे नेतृत्व एन.डीं. यांनी केलेलं आहे.  अन्नधान्याची टंचाई असताना इस्लामपूरला निघालेल्या मोर्चावर गोळीबार झाला. त्या गोळीबारात एन.डी पाटील यांचा सख्खा पुतण्या धारातीर्थी पडला. पण त्याचे दुःख बाजूला ठेवून ते मामलेदार कचेरीवर धडकले होते.  

सीमाप्रश्न असो, नाहीतर महागाई विरोधातला लढा असो, लढाऊ बाणा हा एन.डीं.चा स्वभाव. त्यात त्यांनी कधी तडजोड केली नव्हती.

सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन डी पाटील यांची प्रचंड आस्था, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात शेवटपर्यंत आवाज उठवीत होते आणि म्हणूनच सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांचा आधार वाटत असत असायचा. 

त्यांचे आणखी एक आंदोलन जे महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहील ते म्हणजे रायगड मधील सेझ विरोधातील आंदोलन. 

त्यावेळी केंद्र सरकारने एक धोरण जाहीर केले होते. रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि पनवेल या तालुक्यातल्या ४५ गावातली तीस हजार एकर जमीन रिलायन्सने ताब्यात घ्यायची अन ती सर्व जागेचा विकास करून तिथे उद्योग उभे करायचे. पण या सेझ प्रकल्पाला रायगडातल्या शेतक-यांनी जोरदार विरोध केला….आणि या लढ्याचे नेतृत्व एन.डी. पाटील यांनी केले होते… एन.डीं.ची हि सर्वात मोठी लढाई होती.  अंबानींच्या विरोधातली म्हणजेच सेझच्या विरोधातली लढाई.  या लढाईतून एन.डी. पाटलांच्या आक्रमक नेतृत्वामुळेच सरकारला आणि रिलायन्सला माघार घ्यावी लागली. त्याचे नायक एन.डी.च होते…

तसेच त्यांनी बेळगाव-कारवार सीमाप्रश्नासाठी चारा बंदीच्या काळातही मोठं अंदोलन उभारलं होतं. यात बेळगावात बीडी जत्ती सरकारच्या विरोधात दत्ता पाटील, दि.बा.पाटील हे देखील होते मात्र त्यात एन.डी. अग्रेसर होते. चारा बंदीच्या चळवळीत दहा-दहा महिन्यांची शिक्षा झाली होती. तसेच कोल्हापूरच्या वरूणतीर्थावर सीमाप्रश्नासाठी फार मोठी परिषद झाली होती. त्या परिषदेत एन.डी. पाटील यांच्या भाषणांनी सीमा लढ्याला मोठी शक्ती मिळाली होती. 

त्यांच्या कारकीर्दवर एक नजर मारली तर कळून जाईल त्यांचे अफाट कार्य …

त्यांचे शैक्षणिक कार्य :

  • १९५४- १९५७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख होते.
  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य होते.
  • शिवाजी विद्यापीठमध्ये १९६२ मध्ये पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते तर १९६५ मध्ये सिनेट सदस्य होते.
  • १९६२-१९७८ दरम्यान शिवाजी विद्यापीठमध्ये कार्यकारिणी सदस्य होते. १९७६-१९७८ च्या दरम्यान सामाजिकशास्त्र विभागाचे डीन होते. 

  • १९९१ च्या दरम्यान ते महाराष्ट्र राज्य शासनात प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य होते. 

  • १९५९ पासून रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य होते…तर १९९० पासून ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. 

  •  १९८५ पासून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष होते. 

त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्य पाहता १९४८ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. 

१९५७ मध्ये त्यांनी मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस पदाची जबाबदारी घेतली. 

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिलेत.

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस होते.

१९७८-१९८० या दरम्यान ते महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये सहकारमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.

राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते.

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पाहिली.  १९९९-२००२ या दरम्यान त्यांनी लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक राहिलेत. 

तसेच ते रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीचे  उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष, सातारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष, जागतिकीकरण विरोधी कृतिसमितीचे मुख्य निमंत्रक, इस्लामपूर म.फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगावचे अध्यक्ष, तसेच त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले, विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद भूषवले. 

तसेच ते महाराष्ट्र सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते होते. 

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

त्यांना मिळालेल्या प्रमुख सन्मान आणि पुरस्कारांपैकी, भाई माधवराव बागल पुरस्कार, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार इत्यादी महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेत. तसेच त्यांनी स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठातून आणि शिवाजी विद्यापीठातून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डी.लीट.पदवी मिळवली.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे एन.डी.सरांच्याबाबत तंतोतंत खरे होते. त्यामुळेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुताना एनडी दिसले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून आलेले मानधन आपल्याबरोबर वाटचाल करणाऱ्या गोरगरीब कार्यकर्त्यात त्यांनी वाटून टाकले.

१६ फेब्रुवारी १९८० रोजी शरद पवारांचे सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली. महाराष्ट्रात आलेली ही पहिली राष्ट्रपती राजवट. सरकार बरखास्त झाल्याबरोबर एक तासात एन.डीं.नी बंगला सोडला. मंत्र्यासाठी असलेली गाडी परत पाठवून दिली आणि मुंबई सेंट्रलच्या एसटी स्टॅण्डवरून ‘मुंबई-कोल्हापूर’ ही लाल डब्याची गाडी पकडून रात्रभर प्रवास करून ते कोल्हापूरला गेले. अखेरच्या श्वासापर्यंत ते एस्टीनेचं प्रवास करत राहिले. संघर्षाची धार कधी कमी झाली नाही. वयाच्या नव्वदीतही त्यांनी आंदोलनाची मशाल खाली ठेवली नाही.

असा हा महान विचारवंत पुरोगामी चळवळीने गमावला.
 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.