नेहरूंनी पुण्यात NDA ची स्थापना केली पण द्रोणाचार्यांचा पुतळा काढायला लावला.
१९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण देशाच्या गौरवशाली इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात केली होती. एकएक करत देशाच्या विकासाचा पाया रचला जात होता. त्यातला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे पुण्यात उभारलेलं राष्ट्रीय संरक्षण अकादमी होय. आणि हे इतकी महत्वाची अकादमी पुण्याजवळ खडकवासला येथे आहे.
हि अकादमी भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त सेवा अकादमी आहे, जिथे लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांतील कॅडेट्स त्यांच्या संबंधित सेवा अकादमीमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षण घेण्यापूर्वी या अकादमीत एकत्र प्रशिक्षण घेतात…
पण अलीकडेच या अकादमीत महिलांना देखील प्रवेश मिळाला आहे.
याबद्दल सर्वोच्च न्यायालायात एक याचिका दाखल गेली होती. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की हा महिलांसोबत दुजाभाव आहे. संविधानाने पुरुष आणि महिलांना समानतेचा हक्क दिला आहे त्यामुळे दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांना देखील प्रवेश मिळायला हवा. सैन्य दलात तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत केवळ पुरुषांनाच प्रवेश मिळतो, ही सैन्यात दाखल होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या महिलांच्या अधिकारांवर गदा आहे. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एनडीएतील महिलांच्या प्रवेशाला मंजुरी देत इतिहास रचला आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचा इतिहास काय ?
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी, भारतीय लष्कराचे तत्कालीन कमांडर-इन-चीफ, फील्ड मार्शल क्लॉड आचिनलेक, युद्धाच्या वेळी लष्कराच्या अनुभवांवर आधारित, जगभरातील समितीचे नेतृत्व केले आणि भारत सरकारला डिसेंबर १९४६ मध्ये अहवाल सादर केला . या समितीने संयुक्त सेवा सैन्य अकादमी स्थापन करण्याची शिफारस केली, ज्याची कल्पना वेस्ट पॉइंट येथील युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकॅडमीवर आधारित होती.
मात्र त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि या अहवालाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी आली.
स्थायी संरक्षण अकादमी सुरू करण्यासाठी समितीने १९४७ च्या अखेरीस एक कृती योजना सुरू केली आणि योग्य जागेचा शोध सुरू केला. अकादमीची पायाभरणी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६ ऑक्टोबर १९४९ रोजी केली होती. त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्यात बांधकाम सुरू झाले. संपूर्ण प्रकल्पासाठी तेंव्हा अंदाजे खर्च ६.४५ कोटी रुपये आला होता.
नेहरूंच्या पुढाकाराने स्थापन झालेली खडकवासला येथील ही जगातील पहिली ट्राय सर्व्हिस अकादमी आहे.
या अकादमीतला नेहरूंचा आणि तेथील द्रोणाचार्यच्या पुतळ्याचा एक किस्सा खूप महत्वाचा मानला जातो, तो म्हणजे…हा प्रसंग सांगितला तो म्हणजे वजाहत हबीबुल्लाह यांनी. वजाहत यांचे वडील या अकादमीचे संस्थापक कमांडंट होते. मेजर जनरल एनीथ हबीबुल्लाह असं त्यांचं नाव. या कमांडंटला नेहरूंनी अकादमीमधील एक पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते.
वजाहत यांच्या सांगण्यानुसार, नेहरू आणि त्यांचे कुटुंब तेंव्हापासून परिचित आहेत जेंव्हा मोतीलाल नेहरू अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील होते आणि वजाहत यांचे आजोबा शेख मोहम्मद हबीबुल्लाह अलाहाबादचे जिल्हाधिकारी होते.
हि अकादमी म्हणजे, जवाहरलाल नेहरू सरकारचा एक प्रमुख प्रकल्प होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पामध्ये विशेष लक्ष घातले होते. अकादमी पूर्ण झाल्याच्या नंतर नेहरू जेंव्हा या अकादमीच्या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते.
त्यावेळेस अकादमीचे डेकोरेशन करण्यात आले होते. त्यात विदेशी झाडे आणि भव्य पुतळे उभारले गेले होते. त्यात एक पुतळा होता तो म्हणजे, अर्जुनचे गुरु द्रोणाचार्य यांचा.
पंतप्रधानांनी विचारले. “तो कुणाचा पुतळा आहे ?”
“अर्थातच द्रोणाचार्य,” असं उत्तर आलं.
“काय?” पंतप्रधान ओरडले, “तुम्हाला एकलव्य आठवत नाही का? याच गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्य कडून गुरुदक्षिणा म्हणून एकलव्यचा अंगठा मागितला होता. त्यांचा पुतळा सैनिकांच्या अकादमीत नको. माझ्यासमोरून हा पुतळा लगेचच हटवा. ” आणि तो पुतळा हटवण्यात आला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासलाच्या या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली होती. त्यांच्या याच पुढाकाराने देशाला एक खंबीर राष्ट्रीय संरक्षण अकादमी मिळाली जिथे तिन्ही दलाचे ट्रेनिंग दिले जाते.
हे हि वाच भिडू :
- ज्या पंतप्रधानांनी अपमान करून जेआरडींना एअर इंडियामधून बाहेर काढलं ते नेहरू नव्हते..
- टाटांना विचारलं देखील नाही आणि नेहरूंनी एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं होतं
- इंदिरा गांधींना आपला राजकीय वारसदार बनवण्याबद्दल नेहरूंचं काय म्हणणं होतं ?