९०४ कोटी खर्चून वॅक्सीन कॉम्प्लेक्स उभं केलयं, पण ३ वर्षांपासून एक डोस बनवलेला नाही…
लसींचा तुटवडा. मागच्या काही दिवसांपासूनचा प्रचंड चर्चेतील विषय. यावरुनचं अनेकदा विविध राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद झालेले पण बघायला मिळाले. एवढचं काय तर १८ वर्षावरील नागरिकांना लसीची परवानगी दिली असली तरी अद्याप तेवढ्या प्रमाणात लसी उपलब्ध नाहीत. परिणामी महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यांमध्ये केवळ ४५ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरु आहे.
हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारनं रशियन लस बाजारात आणली आहे, सोबतचं सध्या इतर परदेशी लसी देखील आयात करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
मात्र देशात सध्या अशी एक वास्तू अक्षरशः धूळ खात पडून आहे, जिथं लस उत्पादन सुरु झालं तर लस कमी पडायचं सोडा उलट आपण पुन्हा लस निर्यातदार देशांच्या यादीत जावू शकतो.
चेन्नईमधील चेंगलपट्टू इथं केंद्र सरकारनं तब्बल ९०४ कोटी रुपये खर्च करून देशातील सर्वात मोठं वैक्सीन कॉम्प्लेक्स उभं केलं आहे. इतकचं नाही तर इथली लस निर्मिती क्षमता आहे तब्बल ६० कोटी डोस. पण मागच्या ३ वर्षांपासून इथं लसीचा एक डोस देखील तयार झालेला नाही.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
साधारण जानेवारी-फेब्रुवारी २०१२ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील युपीए २ सरकारने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत तामिळनाडूमध्ये एक भव्य लसीकरण संकुल उभं करण्याची योजना आखली.
यामध्ये लस संशोधन, निर्मिती आणि स्वस्तामध्ये पुरवठा असे उद्देश ठेवण्यात आले. सोबतच रेबीज, हेपिटायटस बी सारख्या आजरांवरील लस निर्मिती करण्याची देखील या योजनेत ठरवण्यात आले.
या सगळ्या साठी केंद्राकडून तात्काळ पाऊलं उचलण्यात आली. फेब्रुवारी २०१२ मध्ये चेन्नईपासून अवघ्या १ तासाच्या अंतरावर असलेल्या चेंगलपट्टू इथं १०० एकर जमीन देण्यात आली, सोबतच ५०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सर्व परवानग्यानंतर मार्च २०१३ मध्ये या संकुलाचं प्रत्यक्ष काम सुरु देखील झालं.
पुढे जवळपास २०१८ पर्यंत हे काम चाललं. या दरम्यान दोन वेळा या संकुलाचा खर्च वाढला. २०१७ मध्ये ५९४ कोटींवरून हा खर्च ७१० कोटींवर गेला तर, २०१९ मध्ये ९०४ कोटींवर गेला.
माजी केंद्रीय आरोग्य मंत्री अंबुमणि रामदास यांनी सांगितलेल्या माहितीनुसार केंद्राने २०१७ साली वाढलेला खर्च मंजूर केला. मात्र त्यानंतर २०१९ मध्ये ‘नॉन प्रोफीटेबल’ म्हणतं यासाठीच वाढलेला खर्च मंजूर केला नाही, परिणामी जवळपास १०० कोटी रुपयांची बिल पेंडिंग आहेत.
आता सध्या काय आहे अवस्था?
या महामारीच्या दरम्यान ज्या प्रकल्पाला ‘राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा प्रकल्प’ असा दर्जा मिळणं गरजेचं होतं, तो प्रकल्प निष्क्रिय आहे. त्यातही जर काही या लढाईमध्ये मदत होतं असेल तर ती म्हणजे फक्त सॅनिटायझर बनवण्यासाठी सध्या या प्रकल्पाचा वापर केला जात आहे.
काही माध्यम समूहाच्या पत्रकारांनी जेव्हा या जागेवर भेटी दिल्या तेव्हा त्यांना या ठिकाणी केवळ एक सुरक्षा रक्षक दिसून आला. जो वृत्तपत्र वाचत बसला होता. तर एका शेजारच्या गावातील महिलेला या संकुलाबाबत विचारलं तेव्हा त्यांना देखील या बद्द्दल माहित नव्हतं. संबंधित महिला म्हणाल्या हि इमारत बऱ्याच दिवसांपासून आहे, पण कशाची आहे हेच माहित नाही.
एका हिंदी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार,
इथं सध्या ६ प्रोडक्शन लाईन्स आहेत. ज्याची क्षमता ६० कोटी लस निर्मितीची आहे. पण त्यातील एक हि लाईन अद्याप सुरु नाही. हे सगळे पूर्ण ताकदीने सुरु होण्यासाठी अजून कमीत कमी १५० कोटी रुपये गुंतवणूक करण्याची गरज आहे.
इथं सध्या सॅनिटायझर निर्मितीचे काम सुरु आहे
सीआयटीयूचे चेंगलपट्टू जिल्हा समितीचे उपाध्यक्ष के. पलानीस्वामी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इथं काही स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सुरुवातीला २५० असलेला स्टाफ सध्या ९० वर आणला आहे, यात अगदी शास्त्रज्ञांपासून ते शिपाई पदांचा समावेश आहे.
सध्यस्थितीमध्ये इथं सॅनिटायझर निर्मिती आणि इथली देखरेख इतपतच काम केलं जातं.
२०१९ पासून या सगळ्यांचे पगार देखील कपात करण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांचे पगार ४५ हजार रुपये प्रति महिना होता तो २५ हजार रुपयांवर आणला. तर इतर स्टाफचा पगार अगदी १० हजार रुपयांवर आणला आहे. आधी तो १५ हजार होता.
इथल्या एका कर्मचाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले होते कि, हा पगार देखील कधी आम्हाला वेळेवर मिळत नाही. या महिन्यात मिळाला तर पुढच्या महिन्यात मिळत नाही.
सरकारकडून काही प्रयत्न झाले आहेत का?
या संकुलाला चालवण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड अर्थात एचएलएल लाईफ केअर या कंपनीची सहयोगी कंपनी असलेल्या एचएलएल बायोटेक लिमिटेड या कंपनीकडे आहे. म्हणजेच एक प्रत्यक्षरित्या केंद्र सरकारकडे या संस्थेची मालकी आहे.
जानेवारी २०२१ एचएलएल बायोटेक लिमिटेडने लस निर्मितीला चालना देण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट मागवण्यात आले. ज्या कंपन्यांना अप्लाय करायचे असेल त्यांच्यासाठी अट होती ५०० कोटी रुपये वार्षिक उलाढाल असावी किंवा मागच्या सलग ३ वर्षांपासून कमीत कमी ३०० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असावे.
मात्र त्यानंतर यामध्ये जास्त प्रगती झालेली नाही. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये भारत बायोटेक आणि बायकॉन या कंपन्यांनी इंट्रेस्ट दाखवला होता, मात्र त्या दृष्टीने अजून काहीच अंतिम निर्णय झालेला नाही.
या दरम्यान ९ जानेवारी २०२१ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, तामिळनाडूचे तत्कालीन आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर आणि आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी भेट दिली होती. या सगळ्यांनी इथल्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून पुढच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर १६ जानेवारी रोजी देशात लसीकरण मोहीम सुरु झाली, त्याच दिवशी वर सांगितल्या प्रमाणे एचएलएलने एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट मागवले होते.
राजकारण्यांनी अनेकदा याबद्दल मागणी केली आहे…
ऑक्टोबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान तामिळनाडूच्या ६ राज्यकर्त्यांनी या प्रकल्पाकडे लक्ष देण्यासाठी मागणी केली होती. यात द्रमुकच्या खासदार दयानिधी मारन, एस. सेंथिल कुमार, जी. सेल्वम, पीएमकेच्या अनबुमनी रामदोस, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. आर. नटराजन, माजी खासदार, टी. के. रंगराजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह केंद्राला पत्र लिहून या प्रकल्पाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हंटलं होतं.
यात जी. सेल्वम यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील पत्र लिहिलं होतं. तर रंगराजन यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये या मुद्दावर मद्रास उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र ती अद्याप प्रलंबित आहे.
जवळपास सगळ्यांची सगळीकडे मागणी एकच होती. ती म्हणजे या संकुलाला पैसे देऊन तो पूर्ण ताकदीनं कार्यन्वित करण्याची. कमीत कमी या महामारीच्या काळात. त्यामुळे सरकारकडून लवकरात लवकर या प्रकल्पात लक्ष घालणं गरजेचं आहे. यामुळे केवळ देशालाच फायदा होणार नाही तर कोरोनाशी लढण्यात देखील आपण एक पाऊल पुढं जाऊ हे निश्चित.
हे हि वाच भिडू
राष्ट्रीय दृष्ट्या जो प्रकल्प अती महत्वाचा आहे तो नॉन profitable म्हणून बंद.
आणि मन की बात वर करोड ची उधळपट्टी
कसलं सरकार आहे हे
ह्यांचे priorities नक्की आहेत काय
अदानी अंबानी profit मध्ये आले म्हणजे झाले का ह्यांचे काम