जगातला पहिला कपल सेल्फी भारतातल्या एका राजाने घेतला होता
सेल्फीचं प्रस्थ तसं काय नवं नाही. एखाद्या फोटोप्रेमीने करपट ढेकर द्यावा इतकं सेल्फ्यांनी अजीर्ण झालंय माणसांना. कधी इथं तर कधी तिथं..हे म्हणजे उठता, बसता, हगता, मुतता नुसतं सेल्फ्या घेत सुटायचं बघा. संडासात बसून फोन संडासाच्या बेळकांडात पाडण्यापासून ते दरीजवळ सेल्फी घ्यायला जाऊन आपला लाखमोलाचा जीव गमावणारे महाभाग सुद्धा आहेत या जगात.
आता तर काय म्हणे, २१ जूनला सेल्फी डे पण साजरा झाला. मग भिडूला प्रश्न पडला, जगातला पहिला सेल्फी कुणी बरं घेतला असेल आणि हे सेल्फ्यांच फॅड नक्की कधीपासून चालू झालंय ??
मोबाईल आणि सेल्फी असं समीकरण आता रूढ झालंय. पण सेल्फीचा इतिहास हा मोबाईलपेक्षा ही जुना आहे. मोबाईलचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःचा फोटो काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता.
जगातला पहिला कॅमेरा फोटो घेतला गेला १८२६-२७ साली. म्हणजेच साधारण नव्वद वर्षं झाली असतील याला. मग पहिला सेल्फी घेतला गेला १८३९ मध्ये. आता त्याला सेल्फी म्हणायचं की नाही हा प्रश्नच आहे. कारण तेव्हाचा कॅमेरा एवढा फास्ट होता, की रॉबर्ट कॉर्नेलिअस या माणसानं कॅमेऱ्याची फोटो घेण्याची लेन्स काढली, पळत पळत फोटो काढायच्या जागेवर जाऊन उभा राहिला आणि तसाच पुन्हा पळत पळत येऊन त्यानं कॅमेऱ्याची लेन्स बंद केली.
फिलाडेल्फिया इथं एका दिव्यांच्या दुकानाबाहेर त्यानं ही सेल्फी घेतली आहे.
जगात असे बरेच सेल्फी निघाले. पण आपला मुद्दा केवळ सेल्फीचा नाही तर कपल सेल्फीचा आहे. कारण तो घेतला गेलाय भारतात. जगातला सगळ्यात पहिला कपल सेल्फी. कारण भारत आणि भारतातले राजे महाराजे ग्रेट आहेत. त्यांचा विषय काय नादच खुळाय.
हे कपल सेल्फी घेणारे राजे म्हणजे महाराजा बीर चंद्र. एक उत्कृष्ट फोटोग्राफर.
या त्रिपुराच्या राजांनी फोटोंचं पहिलं एक्झिबिशन आपल्या राजवाड्यात भरवलं होत. त्यांच्या राणीचं नाव खुमान चानू मनमोहिनी देवी असं. या दोघांना स्वतःचा सेल्फी घ्यायचा मोह त्याकाळात देखील आवरला नाही. आणि साधा सुधा नाही तर अगदी इंटिमेट होऊन काढलेला हा सेल्फी.
आता हा फोटो काढलाय खुद्द महाराजांनीच. १८८० मध्ये. आणि ते पण शटर कंट्रोलचा वापर करून. फोटोत जर तुम्हाला दिसत असेल तर महाराजांच्या एका हातात शटर कंट्रोल आहे बघा.
अशाप्रकारे गुगल जरी दाखवत असलं नसलं, तरी पहिला कपल सेल्फी भारतातल्या एका राजानेच घेतलाय.
आता जाता जाता सेल्फीचा अर्थ सांगून जाऊया म्हणलं.
असं म्हणतात की, ऑस्ट्रेलियातल्या एका इंटरनेट फोरमवर नेथन होप या माणसानं १३ सप्टेंबर २००२ या दिवशी सेल्फी या शब्दाचा पहिल्यांदा लिखित स्वरुपात उल्लेख केला. पण हा होप म्हणतो की या शब्दाचं श्रेय त्याचं नाही, तेव्हा बोलीभाषेत वापरला जाणारा शब्द मी लिखित स्वरुपात वापरला, इतकंच.
या होपची गोष्ट अशी होती की एकविसाव्या वाढदिवसा दिवशी हा भिडू पिऊन टाईट झाला आणि पायऱ्यांवरुन पडला. दात खालच्या ओठांत चांगला एक सेंटिमीटर रुतला आणि त्या जखमी ओठांचा त्यानं फोटो काढला. “फोकसबद्दल सॉरी, तो सेल्फी आहे” असं त्यानं म्हटलं होतं.
असो आता निदान याच्या ओठांकड बघून तरी आदर्श घ्या आणि सेल्फ्या काढणं बंद करा. नाहीतरी सेल्फी काढल्यावर लोक कसे दिसतात माहिताय का तुम्हाला ??
हे असे….
हे ही वाच भिडू
- आर.आर.पाटील आणि यशवंतराव चव्हाणांचा एक अफलातून किस्सा
- व्हाय शुड बॉईज हॅव्ह ऑल द फन ? बायकांच्या लघुशंकेसाठी पण नवी सोय आलीय.
- सनातन्यांनी बंद पाडलेलं गाढवाचं लग्न बाळासाहेबांच्या मदतीने पुन्हा उभं राहिलं