NDRF आता कोकणात कायमस्वरूपी तैनात ठेवण्याची वेळ आली आहे…

मागच्या ३ दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर २ दिवसांपासून चिपळूण, महाड हा सगळा परिसर महापुराच्या विळख्यात सापडला आहे. सोबतच सातारा, रत्नागिरी, रायगड अशा ठिकठिकाणी दरड कोसळून मोठी जीवित हानी झाली आहे. यात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या या सगळ्या ठिकाणी मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अर्थात NDRF ला पाचारण करण्यात आले आहे. NDRF कडून नागरिकांना सुखरूप वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र पाऊस आणि महापूर यामुळे या टीमला इथं पोहोचण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

चिपळूणमध्ये काल संध्याकाळपर्यंत NDRF ची टीम पोहोचू शकली नसल्याचं स्थानिकांकडून सांगितले जाते. सोबतच रायगडमधील तळीये मधील घटना तर काल संध्याकाळी ७ च्या दरम्यान घडली होती, मात्र या टीमला तिथं मदतीसाठी पोहोचायला आजची सकाळ उजाडावी लागली होती. सध्या इथला मृतांचा आकडा ३६ झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की NDRF ची टीम अनेक अडचणींचा सामना करत, वाट काढत मदतकार्यासाठी पोहोचली आहे.

याच सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या कोकणात एक वाक्य सातत्यानं ऐकायला मिळतं आहे ती म्हणजे,

NDRF आता कोकणात कायमस्वरूपी तैनात ठेवण्याची वेळ आली आहे…

तस बघितले तर कोकणकर कायमच, समुद्रातील छोटी वादळ किंवा मुसळधार पाऊस अशा संकटांचा सामना करत असतो. अशी नैसर्गिक संकट त्याच्यासाठी नवीन नाहीत. त्यामुळेच तो कोणीतरी येईल आणि आपली मदत करेल या आशेवर राहत नाही.

मात्र मागच्या काही काळात कोकणकरांवर आणि एकूणच कोकणावर संकटांची मालिकाचं सुरु आहे. आधी २०१९ मधील तुफान पाऊस आणि त्यातून आलेला महापूर, पुढे २०२० मध्ये आलेलं निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतर २०२१ मध्ये आलेलं तौक्ते चक्रीवादळ आणि आता पुन्हा एकदा पडलेला महापुराचा घट्ट विळखा.

या सगळ्या वेळी मदतकार्यात कोकणात मोठे अडथळे आल्याचं बघायला मिळालं होतं. २०१९ च्या महापुरानंतरचं कोकणात NDRF ची एक टीम कायम तैनात ठेवावी अशी मागणी पुढे आली होती. त्याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मकता देखील दर्शवण्यात आली होती. पुढे निसर्ग आणि तौक्ते वादळादरम्यान तर हि गोष्ट कोकणात प्रकर्षांनं जाणवली होती. 

तौक्ते वादळानंतर विरोधी पक्षात असेलेले देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते कि, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफला तैनात केलं असतं तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते.

NDRF ची रचना कशी आहे?

NDRF च काम हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असते. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्यासाठी राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा करून NDRF ची मदत घेत असते.

२००६ ला स्थापनेच्या वेळी NDRF चे देशभरात ८ बटालियन होते. मात्र सध्या या बटालियन्सची संख्या वाढवून ती १२ करण्यात आली आहे. या प्रत्येक बटालियनमध्ये १ हजार १४९ अधिकारी आणि जवान कार्यरत असतात.

या प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत ४५ जवान असतात. यात इंजिनिअर्स, इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन्स, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.

महाराष्ट्रात १८ तुकड्या 

महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य ५ व्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. या बटालियनचे मुख्यालय NDRF च्या वेबसाईटनुसार सुदुंबरे, तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. तर या बटालियनमध्ये एकूण १८ तुकड्या आहेत. यातील ३ तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत. तर पुण्यातील मुख्यालयात १४ तुकड्या तैनात असतात. विदर्भातील नागपूरमध्ये १ तुकडी तैनात आहे. 

यातीलच पुण्यातील १ किंवा २ तुकड्या कोकणात तैनात ठेवण्यात याव्यात अशी मागणी सातत्यानं होतं असते. आज देखील अशीच मागणी होतं आहे.

त्याला कारण देखील तसेच आहे. कारण प्रत्येकवेळी कोकणात पोहोचायचे म्हंटल्यास टीमला अनेक नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. यात पावसाळी वातावरणामुळे हवाईमार्गे जाणं देखील बहुतांश वेळा शक्य होणार नसतं. सोबतच कोकणात जाणारे बहुतांश रस्ते हे घाट आणि अवघड वळणाचे आहेत. 

सोबतच नद्यांवरील पूल जर महापुरामुळे बंद झाले तर रस्त्यानं पोहोचायला देखील अडचण येतं असते. वादळात झाड पडली तर मदतकार्यात पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळेच आज मुख्यमंत्री म्हंटले तसं NDRF ला वाट काढत पोहोचावे लागते.

याच सगळ्या कारणांमुळे आज आलेली वेळ जर पुन्हा येऊन द्यायची नसेल तर NDRF आता कोकणात कायमस्वरूपी तैनात ठेवण्याची वेळ आली आहे. मागच्या महिन्यात यासाठी महाडमध्ये राज्य सरकारकडून दुग्ध विकास मंत्रालयाची ५ एकर जागा देण्यात आली आहे. मात्र सध्या याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.