काश्मिरमधील एक मुस्लीम दहशतवादी संघटना जी भारताच्या बाजूने लढली होती..!

मोहम्मद युसुफ पारे उर्फ कुका पारे.

नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ बनलेला हा माणूस. जवळपास सर्वच दहशतवाद्यांनी त्याच्या  नावाचा धसका घेतला होता, कारण हा माणूस पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांच्या कँम्पमध्ये प्रशिक्षण घेऊन आला होता आणि त्यानंतर या दहशतवादी संघटनांना संपवण्याचा विडा त्याने उचलला होता.

त्याने स्वतःची एक दहशतवादी संघटना देखील बनवली होती संघटनेचं नांव होतं ‘इखवान-उल-मुसलमीन’.

प्रशिक्षणानंतर सुरुवातीचे काही दिवस दहशतवादी म्हणून काम केल्यानंतर कुकाने आत्मसमर्पण केलं होतं. भारतीय सैन्याच्या बाजूने तो आणि त्याची संघटना काम करायला लागले होते. कुका स्थानिक असल्याने काश्मीर खोऱ्यातील खडानखडा माहिती त्याला होती. विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या कळपात राहून तिथेच प्रशिक्षण घेऊन आलेला असल्याने त्याला त्यांचे ठावठिकाणे आणि कार्यपद्धती याची देखील कल्पना होती.

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांशी लढताना त्याच्या या सगळ्याच माहितीचा भारतीय सैन्याला मोठाच फायदा होत होता. शिवाय कुकाच्या संघटनेचे सदस्य थेटपणे दहशतवाद्यांशी लढत होते.

kuka
कुका पारे

१९९६ साली काश्मिरात निवडणुका होऊ शकल्या याचं बरचसं श्रेय कुका पारेला देखील जातं. काश्मिरात निवडणुका घेऊन दाखवणं हे त्यावेळी प्रतिष्ठेचं झालं होतं. काश्मीरमधील महत्वाचे पक्ष निवडणुकांना सामोरे जायला तयार नव्हते. कारण स्पष्टच होतं की, निवडणुकांमध्ये सहभागी होणं म्हणजे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर येणं. सर्वच राजकीय पक्षांना याची भीती वाटत होती. शिवाय राजकीय पक्षांची इतरही कारणं होतीच.

हे आव्हान कुका पारेनं स्वीकारलं आणि स्वतःच राजकीय पक्ष स्थापन केला. पक्षाचं नांव होतं ‘जम्मू अँड काश्मीर आवामी लीग’

काश्मिरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. कुका पारेच्या पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. ही निवडणूक कुकाने लढवली नव्हती. विधानसभा निवडणुकीत मात्र तो स्वतः मैदानात उतरला. पक्षाची पुन्हा तीच अवस्था. सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत. कुका स्वतः मात्र निवडून आला आणि आमदार झाला. कुका निवडून येणार होताच कारण खोऱ्यातील दहशतवाद्याइतकीच त्याची देखील जनमानसात दहशत होती.

निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा विजय झाला आणि शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले.

एवढ्या कालावधीत पुलाखालून  बरंच पाणी गेलं होतं. ‘इखवान-उल-मुसलमीन’ आणि सैन्यामध्ये बेबनाव व्हायला लागला होता. शेख अब्दुल्ला सरकारसोबत देखील संघटनेचे संबंध बिघडत चालले होते. संघटनेत सहभागी असणाऱ्या अनेकांवर वेगवेगळे आरोप झाले होते, संघटना दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे, असं सरकारला वाटायला लागलं होतं. नॅशनल कॉन्फरन्सच्या सरकारने त्यांच्यावर  वचक बसविण्यासाठी संघटनेतील अनेकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटले भरले होते.

या सर्व परिस्थितीत ‘इखवान-उल-मुसलमीन’ वेगळी पडायला लागली होती. सेनची मदत नव्हती आणि सरकारशी देखील संबंध बिघडलेले. दहशतवाद्यांशी तर आधीपासूनच वैर होतच.

आपले जुने हिशेब चुकते करण्यासाठी दहशतवाद्यांना हीच योग्य संधी वाटली आणि एक एक करून इखवानच्या सदस्यांना लक्ष केलं जाऊ लागलं. त्यांच्या हत्या केल्या जाऊ लागल्या. सप्टेंबर २००३ मध्ये कुका पारेची देखील २ दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेने हत्येची जबाबदारी घेतली. आपला कमांडर गाजीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपण ही हत्या घडवली, असं ‘जैश-ए-मोहम्मद’कडून सांगण्यात आलं.

माध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांनुसार कुका दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होता. या गोष्टीची कल्पना कुकासहित सर्वांनाच होती. कुकाने सुरक्षेची मागणी देखील केली होती, पण जी सुरक्षा त्याला पुरवण्यात आली ती अपुरी होती. त्याने ‘बुलेट प्रुफ’  कारची मागणी केली होती, ती सुद्धा मान्य करण्यात आली नव्हती.

कुकाच्या हत्येनंतर ‘इखवान’च्या अनेक सदस्यांना दहशतवाद्यांनी लक्ष केलं. अनेकांच्या हत्या घडवून आणण्यात आल्या. हे हत्यासत्र आजपर्यंत चालू आहे. कधी-काळी इखवानसाठी काम केलेल्या तरुणांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोक्यावर आजदेखील दहशतवादी संघटनांच्या भीतीची टांगती तलवार आहे. सरकारकडून पुरेशी मदत आणि संरक्षण मिळत नसल्याने भारत सरकार आणि सैन्याने आपला वापर करून आपल्याला सोडून दिलं अशी भावना इखावनीमध्ये रुजली आहे.

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.