बस्स आत्ता राहूल गांधी आणि मोदींची अशी भेट झाली तर जगात शांतीच शांती नांदेल.
भांडण करण ही मानव जातीची मुळ प्रेरणा आहे. माणसं एकमेकांशी भांडतात. आपण माकडं होतो तेव्हा चिंपाझी आणि गोरिला सोबत भांडलो त्यातूनच आपण माणूस झालो यावर आमचा विश्वास आहे.
थोडक्यात काय तर भांडल पाहीजे.
लहानपणी आपल्या आईनं आपल्याला कितीही मारलं तरी आपण भांडण काढायचो. शेजारच्या दारातलं पाणी आपल्या दारात आलं, बांधाला बांध लागला, घरासमोरुन एखादा आपल्याकडे लूक टाकत गेला, शेताचा बांध आत सरकवला, पाण्याची पाळी चुकवली, शर्टाला टाईच लावली नव्हती प्रत्येक गोष्टींवर एकच रामबाण उपाय तो म्हणजे भांडण.
कधी या भांडणात गुडघे फुटायची. ठोपरं सोलून निघायची. शर्ट फाटायची बस इथपर्यन्तच भांडण ठरलेली. घरी आलो की, टिव्ही चालू करायचं. टिव्हीवर लादेननं विमान घुसवली असायची तर अमेरिकेनं निम्मं अमेरिका अफगाणिस्तानात घुसवलेलं असायचं. कारगीलमध्ये पाकिस्तान भांडण करत असायचा. राणे आणि शिवसेना भांडायचे, उद्धव आणि राज भांडायचे, सौरव गांगुली आणि चॅपेल भांडायचे, पवार आणि बाळासाहेब भांडायचे.
हि भांडण भारी वाटायची पण गेल्या दोन चार वर्षात मोठ्ठी वाटणारी हि भांडण काळाच्या पडद्यात गायब झाली. त्याच महत्वाच कारण होतं ते म्हणजे, जगाच्या आणि भारताच्या पाठीवर दोन जोड्यांचा असा काही जन्म झाला की भांडण हि शाब्दिक असतात आणि त्यातून खरा आनंद मिळतो हे आपणास माहित झालं. जून्या भांडणानी आपणाला आनंद तर दिलाच पण या जोड्यांनी आपणाला व्यक्त होण्याचं साधन देखील दिलं.
त्यातील पहिली जोडी म्हणजे ट्रम्प तात्या आणि किम आण्णा. माणसांनी त्यांना तात्या आणि आण्णांच्या पातळ्यांवर आणुन ठेवण्याचं महत्वाच कारण म्हणजे, त्यांची भांडणाची स्टाईल. माझ्या शेतात मोटार आहे च्या धर्तीवर किम आण्णा सांगायचे माझ्याकडे अणुबॉम्बच बटण आहे. अगदी सहज. ट्रम्प तात्य दोन दिवसात दाखवतो म्हणून वातावरण तापवायचे.
पण झालं काय, तर काहीच नाही. माणसांना पण माहित होतं. यांच काहीच होणार नाही पण एकमेकांना दम देण्याची त्यांची स्टाईल माणसांना आवडायची.
देशपातळीवरील दूसरी जोडी म्हणजे मोदी आणि राहूल बाबा.
मोदिंच्या चूका आणि राहूलबाबांच्या चुका याचे व्हिडीओ सकाळ सकाळी आपल्या वॉटसअपवर आले नाहीत तर तो अख्या दिवसाचा फॉल धरला जातो. मोदी कॉलर ताठ करुन शहजाद्याला खडे बोल सुनवतात तर राहूलबाबा चौकिदारांना त्यांच्या कामांची आठवण करुन देत असतात. मध्येच शहा येतात आणि दोन चार जागांच गणित पलटवतात. याहून वेगळं काय होतं का तर नाही. फक्त एकमेकांशी भांडत राहणं. आणि शब्दांचा मार झेलणं.
पण हि दोन्ही भांडण आपल्या जगण्यासाठी महत्वाची आहेत. कारण या भांडणातून मोठ्ठ अस काही घडतच नाही. जे होतं ते फक्त फेसबुक आणि ट्विटरवर. रात्री जेवताना एखाद्या ग्रुपवर दोघांपैकी एकाची बाजू घ्यायची आणि आपण पण भांडायचं त्यातून एक समाधान मिळतं. कोणी कोणाला पाहून घेतो म्हणलं तरी विशेष अस या चौघांनी एकमेकांना पाहिल देखील नाही.
म्हणजे शक्य झालं तर मोदी राहूल बाबांना आत टाकू शकले असते. आणिबाणी आणणं अवघड नसतं हे आपण पाहिलच आहे. शक्य झालं असत तर मोदींसारखां नेता कॉंग्रेसच्या काळात जन्माला देखील आला नसता. पण ते नेतृत्व देखील सिद्ध झालं कारण आपण लिमिटमध्ये भांडतो. शक्य झालं असत तर अफगाणीस्थान फोडला तसा कोरिया फोडायला वेळ लागला नसता. शक्य झालं असतं तर अणुबॉम्बचं बटण देखील लांब नव्हतं. पण ते झालं नाही कारण ते पण लिमिटमध्ये भांडत होते.
शक्यता खूप होत्या पण यांची भांडण आनंद देतात. ती मिटली तर शांतता नक्कीच नांदेल पण त्याहून अधिक वॉटसअप, फेसबुक, ट्विटरच नुकसान होईल. रस्त्यावर दगड फेकणाऱ्या, बस जाळणाऱ्या, एखाद्या देशाला अन्नाला महाग करणाऱ्या भांडणापेक्षा ही भांडण कधीही चांगलीच असतात. तरिही शांती नांदली तर चांगलच आहे की.
हे ही वाच भिडू.
- राहुल गांधी होणे सोपी गोष्ट नाही.
- वाजपेयी यांच्या एका शब्दानं नरेंद्र मोदींचं अख्खं आयुष्य पालटलं.
- मोदींना वाट्टेल ते बोलणाऱ्या ट्रम्प तात्यांना भारतीय मुलाचे “नादखुळे” पत्र.