मसाबाचं लग्न झालं, पण खरी चर्चा तिच्या जन्माचीच झाली होती

सोशल मीडियावर मसाबा गुप्ताच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतायत, तुम्हाला वाटल एखाद्या सेलिब्रेटीनं लग्न केलं त त्यात काय एवढं. अशी ढीग लग्न होत असतात की. तर भावांनो आणि बहिणींनो यात विशेष गोष्ट आहे.

मसाबाच्या लग्नाचा हा फोटो बघा…

viiv

पिवळा शर्ट घालून तिच्या खांदयावर हात ठेवलेला माणूस आहे, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि पुढ्यात बसलीये नीना गुप्ता. कधीकाळी सगळ्या भारतात गाजलेलं कपल आणि मसाबाचे आई-वडील.

आत्ता यातलं विशेष काय ते सांगण्यासाठी आपल्याला जावं लागतं १९८० च्या दशकात

वेस्ट इंडीजचा सुपरस्टार, डॉन ब्रॅडमन नंतर जगाने पाहिलेला सर्वोत्तम फलंदाज म्हणजे सर व्हिव्ह रिचर्डस. सहा फुट तगडा व्हिव्ह जेव्हा च्युईंगम चघळत चघळत फलंदाजीला उतरायचा तेव्हा त्याच्या एंट्रीनंतर होणारा दंगा बघूनच बॉलरची फाटायची. चेहऱ्यावर अतिशय थंड एक्सप्रेशन ठेऊन विव्हचा हातोडा चालायचा तेव्हा कॉमेंटेटर स्टेडियममधल्या फॅन्सप्रमाणे जोरजोरात ओरडून तो नजारा एन्जॉय करायचे.

विव्ह रिचर्डसच फॅन फॉलोईंग फक्त वेस्ट इंडीजपर्यंत मर्यादित नव्हत. जगभरातल्या पोरी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. त्याचं तसं ऑलरेडी लग्न झालेलं होत पण कॅरीबिअन कल्चरप्रमाणे स्वच्छंद जगण्याची त्याला सवय होती. त्याला दोन मुलं होती पण तो आणि त्याची बायको सेपरेट झाले होते.

१९८७ च्या नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजची टीम भारत दौर्यावर आली.

विव्ह रिचर्डस त्यांचा स्टार कॅप्टन होता. दिल्लीला झालेल्या पहिल्याच कसोटीमध्ये वनडे प्रमाणे स्फोटक बॅटींग करत भारतीय गोलंदाजाना त्याने ठोकून काढले. त्याच्या शतकाच्या जीवावर वेस्टइंडीजने तो सामना खिशात  टाकला. पुढचा सामना मुंबईमध्ये होता.

मुंबईच्या मॅचेस म्हणजे परदेशी खेळाडूंसाठी सुद्धा जीवाची मुंबई असायची. तिथे आल्या आल्या जोरदार पार्ट्या व्हायच्या. बॉलीवूडचे सेलिब्रेटी त्यात सहभागी व्हायचे. दारू पाण्यासारख्या व्हायची. आधीच  आपल्या रंगीत लाइफस्टाइलसाठी फेमस असणारे वेस्ट इंडीजचे खेळाडू या पार्ट्यामध्ये डान्सफ्लोअर वर नाचताना मस्त झालेले दिसायचे.

त्या सामन्यात विव्ह रिचर्डस नेहमीच्या स्वॅगमध्ये दिसला नाही.

भारताने तो सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. पुढची कोलकत्त्यामधली मॅचसुद्धा अनिर्णीत राहिली. त्यानंतरच्या मॅचमध्ये तर भारताने तब्बल २५५ धावांनी विजय मिळवला. व्हिव्ह रिचर्डसने दोन्ही मॅचमध्ये हाफ सेन्चुरी काढली होती पण नेहमीचा स्फोटक व्हिव्ह रिचर्डस दिसला नाही. 

काही दिवस गेले. भारतातील एका मासिकाने बातमी फोडली की हिंदी फिल्मइंडस्ट्रीची हिरोईन नीना गुप्ता प्रेग्नंट आहे. त्याकाळच्या संस्कारी लोकांना धक्का बसला कारण नीना गुप्ताचं लग्न झालं नव्हत.

कोणीतरी शोधपत्रकारिता लढवून बातमी आणली की नीना गुप्ता काही महिन्यापूर्वी कलकत्त्याच्या एका पबमध्ये वेस्ट इंडियन क्रिकेटर विव्ह रिचर्डस बरोबर दिसली होती. तिथे त्या दोघांना प्रोपर शूज नव्हते म्हणून बाहेर काढण्यात आलं होत.

खरं तर नीना गुप्ता तोपर्यंत बऱ्याच जणांना माहित देखील नव्हती. एनएसडी सारख्या प्रतिष्ठीत संस्थेतून तिने अभिनयाचे शिक्षण घेतले होते पण म्हणावी तशी संधी कधी मिळाली नव्हती. नाही म्हणायला गांधी सिनेमामध्ये एका छोट्या रोल मध्ये ती दिसली. साथ साथ, मंडी, उत्सव, जाने भी दो यारो अशा ऑफबीट फिल्ममध्ये साईड रोल नीना गुप्ता ला मिळायचे. बरेचसे रोल थोड्याशा निगेटिव्ह शेडचे मॉडर्न स्ट्रॉंग वूमनचे होते. पण लक्षात राहील इतपत काही भारी अभिनय तिचा नव्हता.

लग्न झालं नाही तरी प्रेग्नंट झालेल्या नीना गुप्तामूळं भारतात वादळ निर्माण झालं.

झालं असं होत की वेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्यावेळी एका पार्टीत तिची आणि विव्ह रिचर्डस ओळख झाली होती. दोघे एकमेकांना आवडले. काही दिवस एकत्र राहिले. वेस्ट इंडीजची टीम परत गेली तेव्हा तिला कळाल की आपण प्रेग्नंट आहे.

खरं तर ते दोघेही या रिलेशन बद्दल सिरीयस नव्हते. विव्ह रिचर्डसला आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं होत. नीनासुद्धा आपला देश सोडून, बॉलीवूडमधल करीयर सोडून त्याच्या सोबत ॲन्टींग्वाला राहायला जाण्यास तयार नव्हती. नीनाने ठरवलं आपण या बाळाला जन्म द्यायचा.

पण खानदान के इज्जत का क्या?

अख्ख्या भारतभर आपल्या पोरीच्या प्रेग्नन्सीची चर्चा सुरु झाल्यामुळे तिच्या आईवडिलांची मान शरमेने खाली गेली. तिची आई स्वातंत्र्यसेनानी होती. गांधीवादी असल्यामुळे आयुष्यभर आपल्या सिद्धांतानुसार ती राहिली होती. त्यांनी नीनाच्या प्रेग्नन्सीला विरोध केला. तिला व्यावहारिकदृष्ट्या हा निर्णय कसा चुकीचा आहे हे समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण नीना आपल्या निर्णयावर ठाम होती. दिल्लीला तिच्या घरात तिला प्रवेशाला बंदी घातली गेली.

कुछ तो लोग कहेंगे.

१९८९ साली नीनाने आपल्या पोरीला मसाबाला जन्म दिला. मिडियाला अजूनही कन्फर्मेशन हवं होत की ते बाळ कोणाच आहे? नीना गुप्ता व्हिव्ह रिचर्डसचं नाव घ्यायला तयार नव्हती. प्रीतीश नंदी नावाचे एक थोर पत्रकार आहेत. त्यांनी मसाबाचा जन्म दाखला हुडकून काढला आणि तो आपल्या इलेस्ट्रटेड विकली या साप्ताहिकात टाकून दिला.

images

मिडियाने काही दिवस ही गोष्ट चघळली आणि नवीन स्कॅन्डल मिळाल्यावर सोडून दिली.

नीनाने मुलीला वाढवण्याचे शिवधनुष्य एकटीने उचलले. मसाबाला आपले आडनाव लावले. लहान बाळाला पाळणाघरात सोडून ती शुटींगला जायची. सिंगल पॅरेंट असूनही खंबीरपणे ती समाजाशी दोन हात करू लागली. मानसिकदृष्ट्या तिच्यासाठी हा काळ कसोटीचा होता. तारुण्याची रग अंगात होती. तिने तो काळ निभावून नेला.

हळूहळू लोकांनी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली. याच दरम्यान नीनाच्या आईचा मृत्यू झाला. त्यांनतर मात्र तिच्या वडिलांनी तिला घरात घेतले. जरी ते तिच्या विचाराचे नव्हते तरी ते नीनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मसाबाला वाढवण्यास तिला एक आधार मिळाला.

तिची पडद्यावरची इमेज मात्र कधी सुधारू शकली नाही. माधुरीसोबतच्या ‘चोली के पीछे क्या है’ वगैरे गाण्यामुळे तिच्यावर बोल्डचा शिक्का बसला होताच. मिळेल ते सिनेमे ती करत राहिली. ‘कमजोर कडी कोण ?’ या रियालिटी शो मुळे तिच्यावर खडूस हा शिक्का सुद्धा मिळाला.

नीना गुप्ताने यांनतर वीस वर्षांनी एका विवेक मेहरा नावाच्या सीए बरोबर तिने लग्न केले. मसाबा आज एक यशस्वी कॉश्च्युम डिझायनर म्हणून बॉलीवूडमध्ये फेमस आहे. विव्ह रिचर्डस त्यांच्या सोबत नाही याच तिला कधी वैषम्य वाटत नाही. त्यालाही आपल्या पोरीचा आणि तिच्या आईचा अभिमान आहे.

नीना आजच्या पिढीच्या सिंगल पॅरेंटच्या समोर एक आदर्श उदाहरण आहे. आपल्या टर्म्सवर आपल्या इच्छेप्रमाणे तिने जगून दाखवले आहे. मध्यंतरी आलेल्या ८३ पिक्चरमध्ये नीना कपिल देवच्या आईच्या रोलमध्ये दिसली आणि पुढे व्हिव रिचर्ड्स हे काही पटलं नव्हतं…!!!

पण आता मसाबाच्या लग्नाच्या निमित्तानं ही जोडी पुन्हा एकत्र दिसलीये आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्यात एवढं नक्क्की…    

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.