पुणे, कोल्हापूर ते सोलापूर; राज्यातल्या अनेक विमानतळांचा प्रश्न मोठाय…

आज देशाचं आर्थिक बजेट सादर होतंय. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अनेक घटकांसाठी विविध आर्थिक तडजोडी केल्या असल्याचं म्हटलंय. या घटकांमध्ये त्यांनी हवाई प्रवासाला चालना देणार असल्याचंही म्हटलंय.

निर्मला सितारामन म्हणाल्या,

“कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी ५० अतिरिक्त विमानतळं, एरोड्रोम, हेलिपॅड, जलमार्ग बांधले जातील”

आता हे असं असलं तरीही मुळात जी विमानतळं अस्तित्वात आहेत त्यातली  बरीच विमानतळं ही पूर्ण क्षमतेनं काम करत नाहीयेत. त्यामुळे, या बजेटमधून अशा विमानतळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही तरतुदी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नवी मुंबई येथील विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून बऱ्यापैकी अवधी आहे. मात्र त्यापूर्वी विमानतळाला काय नाव द्यावे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहेच ही वस्तुस्थिती आहेच. त्यामुळे मुंबईतील नव्या विमानतळा बाबत सरकारची भूमिका समजण्यासारखी आहे. मात्र, गेली अनेक वर्ष राज्यातील इतर शहरातील विमानतळाकडे सरकारकडून साफ दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते.

मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील विमानतळ वगळता राज्यातील इत्तर शहरातील विमातळ पूर्ण क्षमतेने कधीच सुरु झाले नाहीत. त्यात काही तरी त्रुटी ठेवून तो प्रश्न तसाच भिजत ठेवण्यात धन्यता मानण्यात आली आहे.

राज्यात लहान- मोठी अशी ३० विमानतळे आहेत. त्यातील ६ ते ७ विमानतळावरून रात्रीचे उड्डाण होते. त्यातही फक्त तीन ठिकाणावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण सुरु आहे. 

यावरून लक्षात येते की मुंबईला वेगळा न्याय आणि इतर शहराला वेगळा न्याय देण्यात येत आहे.

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि चिपी विमानतळाचा प्रश्न अजूनपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी विमानतळ तयार आहे मात्र तांत्रिक अडचणी, विस्तारीकारांसाठी लागणारे  भूसंपादन न झाल्याने हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा विमानसेवा सुरु होऊ शकली नाही.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ

सरकारने पुणेकरांना आंतराष्ट्रीय विमानतळ होणार या आशेवर गेल्या २० वर्षापासून झुलवत ठेवले आहे. सध्या पुण्यात एक विमानतळ असून ते हवाई दलाच्या अखत्यारीतीत येते. पुण्यात आंतराष्ट्रीय विमानतळाची घोषणा साधारण २००० साली करण्यात आली होती. हे विमानतळ चाकण भागात होईल असे सांगण्यात आले होते. मात्र भूसंपादनसाठी अडचण येत असल्याने या विमानतळाची जागा बदलण्यात आली.

पुरंदर भागात जागा निश्चित करण्यात आली. यासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण दलाची परवानगी मिळण्यासाठी ५ वर्ष लागले. त्यानंतर ऐकून १७ केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या परवानग्या घेण्यात आल्या.

२०१९ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७० टक्के भूसंपादन झाले. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्याचबरोबर विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचा पराभव झाला. त्यानंतर भूसंपादन रखडले आहे.

अजूनही त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

कोल्हापूर विमातळावर रात्रीचे लँडिंग नाही

कोल्हापूर – सांगली भागातून विमानाने मुंबई, दिल्लीला जायचे असेल तर बेळगावला जावे लागते. १९४० मध्ये राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात कोल्हापूर विमानतळ सुरू झाले. मात्र कधीच सलग सेवा या विमानतळावरून राहिली नाही. कोरोनापूर्वी कोल्हापूर विमानतळावरून मुंबई, बंगलोर, हैद्राबाद आणि तिरुपती येथे सेवा सुरू करण्यात आली आहे.

आता विषय असा आहे की, या विमानतळावर रात्रीच्या वेळेतलं लँडींग किंवा टेकऑफ सुरू नाहीये. सुरू आहे ते फक्त व्हीआयपी लोकांसाठी.

प्रवासी विमानांसाठी ही सेवा अजून सुरू करण्यात आलेली नाही. अशी माहिती कोल्हापुरातल्या भिडूने दिलीये.

नाईट लँडिंग साठी लागणारे अप्रोच लाईट नसल्याने कोल्हापूर विमानतळावरून सकाळी लवकर आणि रात्री विमान उड्डाण होऊ शकत नाही असं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. आता व्हीआयपी लोकांच्या विमानांसाठी रात्रीच्या वेळेतलं लँडींग किंवा टेकऑफ होत असेल तर, सर्व सामान्यांसाठी का नाही असा प्रश्न विचारला जातोय..

तसेच सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी. १३७० मीटर लांबीची आहे. ही धावपट्टी २३०० मीटर पर्यंत वाढवावी लागणार आहे. याठी ६४ एकर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. तसेच रात्रीचे  लॅडिंगसाठी मार्गात येणारे  अडथळे काढण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे ८० वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून विमानतळ स्थापन करण्यार आले. मात्र अपुऱ्या सुविधेमुळे अजूनही पूर्ण क्षमतेने ते वापरत येत नसल्याचे चित्र आहे.

सोलापूर विमानतळाचे भूसंपादन रखडलंय

३५० एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्याला लागूनच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे ५० वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे. भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही.

सोलापूरचे उद्योग देशात प्रसिद्ध आहेत. जर व्यावसायिकांना चांगली विमानाची कने्टिव्हिटी मिळाली त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.

पुणे, सोलापूर बरोबरच अमरावती, अकोला, चंद्रपूर येथील विमानतळाचे काम रखडलेले आहे. केवळ मुंबईच नाही तर इतर शहरही विमान सेवेने जोडणे महत्वाचे आहे. मात्र त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसून येत नाही असं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू 

5 Comments
  1. Yuvraj Zurange says

    पुरंदर येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ साठीचे 70% भूमिपूजन झाले हे कुणी सांगितले तुम्हाला?
    चुकीची माहिती पसरवू नका. मी बोलभिडू चा चाहता आहे पण आता नाही. तुम्ही पुरंदर येथील विमानतळ बाबत चुकीची माहिती देता आहात. माहिती दुरुस्त करा

  2. Yuvraj Zurange says

    पुरंदर विमानतळाचे ७०% भूमी अधिग्रहण झाले म्हणता. हे खोटं आहे. आमची जमीन अधिग्रहण करायला येनारायला ७ फूट जागेत गाडा. शिवतारे चा पराभव करून दाखवला आणि तुमच्या बोळभिडू पोर्टल चा पण करू. जाहीर निषेध

  3. Yuvraj Zurange says

    Comment moderation ला काय ठेवता. हिंमत असेल तर direct view ठेवा ना public ला. वा रे वा म्हणजे तुम्ही जे लिहाल ते सगळ बरोबर आणि आमच्या comment मात्र moderate ला.

    चांगली आहे तुमची policy

  4. राजनीश प्रसादे says

    रत्नागिरी विमानतळ 1973 मध्ये बांधण्यात आले आहे. 1978 ते 1984 या काळात या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु होती. पण लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे सध्या हे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बंदच आहे. सध्या हे विमानतळ भारतीय तटरक्षका दलाच्या ताब्यात आहे. धावपट्टी 1372 मीटरवरन 2000 मीटर वाढविण्यात आली आहे. तटरक्षक दलाची विमाने नियमित या विमानतळावरुन ये जा करीत असतात. परंतु प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी विमान पार्किंगची आवश्यकता आहे. त्यासाठी 50 एकर जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. जमिनीचा मोबदला कमी मिळत असल्यामुळे जमीन देण्यास स्थानिक जमीन धारक तयार होत नाहीत. व आपले सरकारही यासाठी काही प्रयत्न करीत नाही आणि करत असतील तर तसे वर्तमान पत्रातून वाचनात आलेले नाही. मार्च 2019 मध्ये भारतीय विमान प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांच्यात रत्नागिरी विमानतळावर पायाभूत सुविधा करण्याबाबत सामंजस्य करार झाला आहे. पण तो अजून फक्त कागदावरच आहे. त्याचे काय झाले हे अजूनही समजलेले नाही. जोपर्यंत सरकार तळमळीने प्रयत्न करीत नाही तोपर्यंत या विमानतळाचे भवितव्य अधांतरीच आहे.

  5. राजनीश प्रसादे says

    आपले सरकार रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करील अशी आशा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.