भारतासारख्या विकसनशील देशात इस्रो उभी राहिली याचे श्रेय जाते विक्रम साराभाई यांना

१४ ऑगस्ट १९४७.

मध्यरात्री १२ वाजता घोषणा झाली. गेली दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडात असणारा आपला देश स्वतंत्र झाला. 

तो क्षण फक्त विजयी उन्मादाचा नव्हता तर पूर्ण देशवासीयांवर नव्या जबाबदारीचा देखील होता. गेली कित्येक वर्ष आपल्यावर अन्याय झाला, देशाच्या प्रगतीमध्ये परकीय सत्तांनी अडथळे आणले हे सगळे जरी खरे असले तरी हेच रडगाणे गात राहण्यापेक्षा आत्ता घेतलेल्या निर्णयांचा पुढच्या अनेक पिढ्यांना कसा फायदा होईल याचाच विचार त्याकाळात देशाचे नेते करत होते.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जाणीव होती आपल्याला  राष्ट्रनिर्मितीसाठी शून्यापासून सुरवात करावी लागणार आहे. 

देशाचा बहुतांश भाग अजूनही मध्ययुगात जगत होता. आधुनिक शिक्षणाचा गंधही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला नव्हता. जगभरात कोणत्या प्रकारचे संशोधन चालले आहे, जग कुठे निघाले आहे याचा पत्ताच भारतीयांना इंग्रज सत्तेने लागू दिला नव्हता. आपल्या सोयीला पडेल तेच शिक्षण आणि तेवढाच विकास भारतात करणे हेच त्यांचे धोरण होते. याचमुळे एकेकाळी विद्वानांची भूमी म्हणून ओळखला जाणारा भारत देश कारकुनाची नोकरी मिळवण्यात धन्यता मानत होता.

हे सगळ बदलायचं होतं.

भारतातील बरेच तरुण शिक्षणाच्या निम्मिताने युरोप अमेरिकेत जाऊन तिथल्या रेनिसांसमुळे आलेल्या बदलाचा अनुभव घेत होते. यातूनच घडले मेघनाद सहा, सीव्ही रमण, होमी भाभा यांच्या सारखे वर्ल्ड क्लास संशोधक.

नेहरू सुद्धा केब्रीजला शिकून आले होते. तिथेच विज्ञानवादी दृष्टीकोनाची त्यांची ओळख झाली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या धामधूमीमध्ये देखील जगात घडणाऱ्या दुसऱ्या महायुद्धासारख्या मोठ्या घटनांवर त्यांचे लक्ष होते.

आता येणाऱ्या जगात अणुविज्ञाना पासून ते अंतराळशास्त्राला महत्व येणार हे उघडपणे त्यांना दिसत होतं. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच या गोष्टीची चर्चा कॉंग्रेस अधिवेशनात घडवून आणण्यास सुरवात केली होती. इंग्रज देश सोडून जाणार याची चाहूल लागताच शांती स्वरूप भटनागर आणि नेहरू यांनी जोर लावून सरकारला कौन्सिल ऑफ सायंटीफिक रिसर्चची स्थापना करायला लावली. यातूनच देशभरात विविध रिसर्च लॅब सुरु करण्यात आल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरूंनी हाच विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारला. परदेशामध्ये नोकरी करत असणाऱ्या आपल्या देशबांधवांना राष्ट्र उभारणी साठी परत बोलावण्यात आलं.

अगदी एका छोट्याशा सुई पासून अंतराळात जाणाऱ्या उपग्रहांपर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती भारतात व्हावी हे स्वप्न नेहरूंनी पाहिलं होत. यासाठी जागतिक दर्जाचे संशोधक अभियंते घडावेत म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ,आयआयटी, आयआयएम या संस्थांची निर्मिती करण्यात आली.

११ नोव्हेंबर १९४७ साली अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख होते डॉ. विक्रम साराभाई. याच्या काहीच वर्ष आधी नेहरूंचे जवळचे मित्र आणि टाटाचे नातेवाईक होमी भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली होती. या दोन संस्थाची निर्मिती हा भारतीय वैज्ञानिक प्रगतीचा मैलाचा दगड मानला जातो. याच दोन्ही संस्था अणु व अंतराळ क्षेत्रात संशोधनासाठीचं भारताच पहिलं पाउल होत्या.

भाभा आणि साराभाई या दोघांचेही व्हिजन नेहरूंच्या स्वप्नाशी मेळ खात होते. त्यांच्या क्षमतेकडे पाहून नेहरूंनी निर्णय घेतला की भारत पूर्णशक्तीनिशी या क्षेत्रातल्या संशोधनात उतरणार. १९५० साली डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीची स्थापना केली गेली. अंतरीक्षविज्ञान सुद्धा याच विभागात वर्ग करण्यात आले. त्यासाठी मोठा निधी देण्यात आला.

नेहरूच्या या निर्णयावर जगभरातून टीकेची झोड उठवण्यात आली. नुकताच स्वतंत्र झालेल्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या या गरीब देशाला कशाला हवा हा पांढरा हत्ती? गांधीजीच्या अहिंसक शिकवणीचा पाईक असलेला देश अणुविज्ञानाच्या संशोधनात का पडतोय? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. खुद्द भारतातले विरोधी पक्ष नेहरूंच्या  निर्णयाच्या विरोधात होते.

नेहरूनी यापैकी कोणत्याच विरोधाला भिक घातली नाही. हिमालयाच्या पायथ्यापासून ते ओस्मानिया विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी वेधशाळा उभारण्यात आल्या. 

अमेरिका रशिया या महासत्तांच्यातल्या शितयुद्धाचा हा काळ. हे शीतयुद्ध अणुउर्जा आणि अंतरीक्षक्षेत्रातही लढले जात होते. स्पेसमध्ये पहिला कोण जाईल, चंद्रावर पहिलं पाउल कोण टाकणार ही चढाओढ सुरु होती.१९५७ साली रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षा तोडून अंतराळात पोहचला. जगभरासाठी ही क्रांतिकारी घटना होती.

 भारतातही याचे पडसाद उमटले. विक्रम साराभाई यांना नेहरूंनी भेटायला बोलावले. भाभा यांच्या नेतृत्वाखाली फक्त अंतरीक्ष संशोधनासाठी एका विशेष संस्थेची निर्मिती करावी का याच्या अभ्यासासाठी एक समिती बसवण्यात आली होती. याचा निर्णय झाला होता.  Indian National Committee for Space Research (INCOSPAR) असे या संस्थेचे नाव असावे आणि साराभाई त्याचे प्रमुख असणार असं ठरलं

नेहरूंनी साफ केलं ,

“भारत या क्षेत्रात उतरतोय ते कोणत्याही चढाओढीत भाग घ्यावा म्हणून नाही तर आधीचं वैज्ञानिक प्रगती मध्ये झालेला बॅकलॉग भरून पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांना फायदा व्हावा यासाठी. “

२३ फेब्रुवारी १९६२ साली इन्कोस्पारची निर्मिती झाली. केरळ मधील तिरुवनंतपुरम जवळच्या थुंबा येथे रॉकेट लॉन्चींग स्टेशन उभारण्यात आलं. 

खुद्द पंतप्रधानाचा माणसपुत्र मानल्या गेलेल्या या संस्थेच्या उभारणीसाठी विक्रम साराभाई यांनी रक्ताचं पाणी केलं. एम, जी के मेनन, सतीश धवन, अब्दुल कलाम यांच्या सारखे अनेक संशोधक घडवले.  भारताच्या स्पेस प्रोग्रॅमची पायाभरणी करण्यात आली. पुढे १९६९ साली या इन्कोस्पारचे नाव बदलून इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो असे करण्यात आले.

अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई

आज इस्रो ही जगातल्या पहिल्या पाच अंतरीक्ष संशोधन संस्थेपैकी एक आहे. मंगळयान, चांद्रयान असे महत्वाकांक्षी प्रकल्प येथे पार पाडले आहेत. 

दूर खेड्यात असणाऱ्या शेतकऱ्यापासून सीमेवर लढणाऱ्या जवानांपर्यंत प्रत्येक भारतीयाच जगणं इस्रोने अंतराळात सोडलेल्या उपग्रहामुळे सोपे झाले आहे. आज आपण इस्रोच्या संशोधकांनी केलेल्या नवनवीन पराक्रमाची बातमी वाचतो तेव्हा  साराभाई, भाभा, नेहरू या महापुरुषांच्या दूरदृष्टीला सलाम करावेसे वाटते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.