गोष्ट, वाजपेयी आणि नेहरूंच्या नात्याची !

एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण  त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती.

भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु संसदेचे नेते होते. त्यावेळी संसदेत काँग्रेसकडे प्रचंड बहूमत होतं. विरोधी पक्ष फक्त नावापुरतेच होते. अनेक विरोधी पक्ष नेत्यांमध्ये देखील नेहरूंच्या नेतृत्वाविषयी एक आदरपूर्वक दरारा होता. त्यामुळे विरोधी नेते दचकून असायचे. अशावेळी संसदेत फक्त ४ सदस्य असणाऱ्या पक्षाचा तरुण खासदार पाठीमागच्या बेंचवर वरून नेहरुंवर प्रश्नांची सरबत्ती करायचा.

तो तरुण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.

वाजपेयींचे आंतराष्ट्रीय राजकारणापासून ते दिल्लीतल्या भ्रष्टाचारावर टीका करणारी भाषणे पंतप्रधान नेहरू देखील मन लावून ऐकायचे. ते अटलजींच्या हिंदीचे चाहते होते. त्यामुळेच अटलजींनी विचारलेल्या प्रश्नांना नेहरू कायमच हिंदीतच उत्तर देत असत.

एकदा चर्चेतल्या गरमागरमीमध्ये वाजपेयी नेहरूंना ‘दुभंगलेले व्यक्तिमत्त्व’ म्हणाले. नेहरूंचा त्यावेळचा दबदबा बघता ही नेहरूंवरील  अतिशय कठोर टीका होती. या घटनेच्या आठवणी वाजपेयींनीच एका भाषणात सांगितल्यात.

वाजपेयी  म्हणतात की,  “त्या दिवशीच संध्याकाळी एका क्लबमध्ये माझी पंतप्रधानांशी भेट झाली. अनावधानाने झालेल्या चुकीमुळे मी अपराधीपणेच पंतप्रधानांना सामोरा गेलो. मात्र नेहरूंनी ती टीका खिलाडूवृत्तीने घेतली होती. नेहरू हसत-हसतच म्हणाले की तुमचं आजचं भाषण खूप जोरदार झालं आणि ते निघून गेले.”

नेहरूंवर विरोधी पक्षातील या तरुण नेत्याचा इतका प्रभाव पडला होता की त्यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटिश पंतप्रधानांशी वाजपेयींचा परिचय करून दिला. वाजपेयींची ओळख करून देताना नेहरू म्हणाले की, “हे आहेत विरोधी पक्षाचे उभरते युवा नेते. नेहमीच माझ्यावर टीका करत असतात पण मी मात्र यांच्या भविष्याबद्दल आशावादी आहे”

वाजपेयींच्या राजकीय भविष्याबद्दल नेहरू किती आशावादी होते याचा प्रत्येय आपल्याला यावरून यावा की, अशाच एका विदेशी पाहुण्यांशी अटलजीची ओळख नेहरूंनी  ‘भारताचे भावी पंतप्रधान’ म्हणून करून दिली होती .

ABV21
अटलजींना पंतप्रधान पदाची शपथ देताना तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा

नेहरूंनी अटलजींविषयी केलेली भविष्यवाणी पुढे खरी ठरली आणि अटलजींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ३ वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. नेहरूंच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा वाजपेयींनी जपला.

नेहरूंविषयी अटलजींच्या मनात देखील कायमच आदर होता. केंद्रात सत्ता आल्यानंतर ज्यावेळी आपल्या सहकाऱ्यांनी नेहरूंचा संसदेतला फोटो काढून टाकल्याचं अटलजींच्या लक्षात आलं त्यावेळी तो फोटो परत आहे त्याठिकाणी लावण्यासाठी स्वतः अटलजींनीच पुढाकार घेतला होता.

नेहरूंच्या निधनानंतर वाजपेयींनी राज्यसभेत केलेल्या भाषणात ते म्हणाले “एका स्वप्नाचा चक्काचूर झालाय. एक तेजस्वी ज्योत अनंतात विलीन झालीय. देशाने आपला अत्यंत लाडका राजकुमार गमावलाय. आज शांतता अस्वस्थ आहे, तिनं तिचा रक्षक गमावला आहे.”

वाजपेयींचा बराचसा काळ हा विरोधी पक्षनेता म्हणूनच गेला. नेहरूंच्या काळात तर ते सत्ताकेंद्राच्या आसपास देखील नव्हते अशा काळात नेहरूंनी एका युवा नेत्याच्या केलेला आदर, त्यांच्यावर दाखवलेला विश्वास खरतर भारतीय लोकशाहीचं प्रतिक आहे. वाजपेयी म्हणाले होते, सत्ता का खेल तो चलेगां, सरकारें आएंगी, जाऐंगी, पार्टीयॉं बनेंगी, बिगडेंगी, मगर ये देश रहना चाहिऐं इसका लोकतंत्र अमर रहनां चाहिंए.

नेहरू आणि अटलजींच्या एकमेकांच्या नात्यामुळे नेहरूंची प्रतिमा कमी होत नाही की उंचावत नाही, अटलजींची प्रतिमा उंचावत नाही की कमी होतं नाही पण इतकं नक्की की त्यांच्या इतिहासातील दाखल्यामुळे भारताच्या लोकशाही प्रतिमा नक्कीच उंचावते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.