नेहरूंनी उभारलेला प्लॅन्ट आज देशाला रोज शेकडो मॅट्रिक टन ऑक्सिजन पुरवत आहे..
गेल्या वर्षभरापासून जगाला छळलेल्या कोरोनाने आपल्या दुसऱ्या लाटेत आक्राळविक्राळ रूप धारण केलंय. कोरोनासाठीचे रेमडीसीव्हीर इंजेक्शन, कोरोना लस, व्हेंटिलेटर इतकंच काय तर हॉस्पिटलमध्ये बेडसाठी देखील रांगा लागलेल्या आहेत.
सगळ्यात दुर्दैव म्हणजे दररोज हजारो जणांचा मृत्यू फक्त ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे होतोय. गेले वर्षभर ही महामारी असूनही सरकारी पातळीवर या संकटाशी सामना कसा करायचा याचा अंदाज लागत नाही आहे. सर्व साहसकीय यंत्रणा उघड्या पडल्या आहेत.
खाजगी कंपन्यांपासून ते सरकारी कंपन्यांना आपले इतर काम बंद करून तातडीने मेडिकल ऑक्सिजन निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या ऑक्सिजन निर्मिती मध्ये सगळ्यात आघाडीवर आहे ती म्हणजे नेहरूंनी उभा केलेले भिलाई स्टील प्लॅन्ट.
इंग्रज येण्यापूर्वी भारताला सोने की चिडीया म्हणून ओळखलं जायचं. इथं तयार होणारी उत्पादने जगभरात निर्यात व्हायची. भारतीय कारागिरांच्या कौशल्याला जगभरात तोड नव्हती. समृद्ध भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली.
शेवटच आक्रमण व्यापारी बनून आलेल्या इंग्रजांनी केले आणि भारतीय उद्योग बंद पाडले. असंख्य कारागीर देशोधडीला लागले. ब्रिटिशांची १५० वर्षांची गुलामी हे भारताच्या विनाशाचे प्रमुख कारण ठरले. भारतातून कमी किंमतीत कच्चा माल उचलायचा आणि त्या पासून बनलेल्या वस्तू भारतात भरमसाठ किंमतीमध्ये निर्यात करायच्या हे ब्रिटिशांचे धोरण होते.
१५ ऑगस्ट १९४७ साली इंग्रज जेव्हा परत गेले तेव्हा भारत एक दरिद्री देश उरला होता.
बहुतांश गोष्टी आपल्याला युरोपमधून आयात कराव्या लागत होत्या. इंग्रजांनी रेल्वेसारखा काही मोजका विकास केला होता मात्र तोही स्वतःच्या फायद्यासाठी. जे काही उद्योग त्यांच्या काळात उभे राहिले होते ते फक्त श्रीमंतांसाठी.
भारताच्या नवनिर्मात्यांनी जिद्द केली होती,
“छोट्याशा सुई पासून ते अंतराळयाना पर्यंत प्रत्येक गोष्ट भारतात बनवायची, पुढच्या पिढ्यांना कोणापुढे हात पसरायला लागू नये.”
पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी अनेक सरकारी कंपन्याची स्थापन केल्या. यातच होती,
सेल म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया.
भारतात नव्याने उभ्या राहत असलेल्या असंख्य उद्योगसमुहासाठी लागणारे स्टील देशातच उत्पादित करावे या मताचे नेहरू होते. त्यासाठी त्यांनी १९५४ साली हिंदुस्थान स्टील लिमिटेड या कंपनीची सुरवात केली होती. मात्र देशाच्या स्टीलची भूक मोठी होती आणि यासाठी लागणारे स्टील प्लॅंट उभे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व तितक्याच मोठ्या भांडवलाची आवश्यकता होती. आपण अजून विकसनशील देश होतो व अशा स्टील प्लॅन्टच्या निर्मितीसाठी एखाद्या मोठ्या देशाची मदत लागणार होती.
तो काळ अमेरिका-रशिया शीत युद्धाचा होता. दुसऱ्या महायुद्धात जगाची झालेली वाताहत पाहता नेहरूंनी कोणत्याही महासत्तेची बाजू न घेता अलिप्ततावादाचा पुरस्कार केला होता. त्यामुळे भारत देश दोन्ही देशांपासून समान अंतरावर होता.
७ जून ते २२ जून १९५५ दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान या नात्याने आपल्या पहिल्या रशियन दौऱ्यावर गेले. या दौऱ्याबद्दल संपूर्ण जगभरातून मोठी उत्सुकता होती. त्यांची ही भेट अयशस्वी व्हावी म्हणून अमेरिकेने देव पाण्यात घालून ठेवले होते. भारत आता सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट धोरणांच्या आहारी जाणार अशी काही जणांना भीती वाटत होती.
मात्र नेहरूंनी हे सर्व खोटं ठरवलं. त्यांनी आपली अलिप्ततावादामागची भूमिका रशियन राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूशचेव्ह यांना पटवून दिलं.
नेहरूंचे तिथं जल्लोषात स्वागत झालं. त्यांच्या पंचशील सूत्रानुसार उभय देशांमध्ये सांस्कृतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याचा करार करण्यात आला. नेहरूंनी आपल्या शिष्टमंडळासह रशिया तील अनेक उद्योगसमूहांना भेट दिली, भारतात यापैकी काय काय उभारता येईल याचे मनाशी आडाखे बांधले.
पुढच्या काही महिन्यातच क्रूशचेव्ह आणि रशियन पंतप्रधान बुल्गानीन भारतात आले. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याच्या भारताच्या हक्काला पाठिंबा जाहीर केला, काश्मीर विषयक भूमिकेला देखील समर्थन दिलं. या राजनैतिक गोष्टी सोडल्या तर नजरेतला खनिज तेलाच्या खाणींच्या संशोधनासाठी आणि जलविद्युत प्रकल्पासाठी आवश्यक ती मदत , यंत्रसामुग्री देण्याचं मान्य केलं.
दोन्ही देशाचे नवे मैत्रीपर्व सुरु झाले. याचे पहिले पाऊल म्हणून छत्तीसगड येथे रशियाच्या सहकार्याने भिलाई मध्ये स्टील प्लॅन्ट उभारण्याची घोषणा करण्यात आली.
नेहरूंचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखलं गेलं. दली राझराच्या लोहखनिजाच्या खाणी, नंदिनी येथील चुनखडी, शिवाय कोळसा, डॉलमाइट यांची जवळच असलेली उपलब्धता. तांदुला धरणाचे पाणी आणि कोरबा थर्मल पॉवर प्लांटवरून विद्युत पुरवठ्याची सोया यामुळे भिलाई हे ठिकाण स्टील प्लॅन्टसाठी निवडण्यात आले होते.
४ फेब्रुवारी १९५९ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पहिल्या ब्लास्ट फर्नेसच उदघाटन करण्यात आलं. या उद्योगाच्या निर्मितीमध्ये स्वतः पंतप्रधानांचे जातीने लक्ष होते. त्यामुळे भिलईचे स्टील प्लॅन्ट देशासाठी किती महत्वाचे आहे याची अधिकाऱ्यांना देखील जाणीव होती.
फक्त भिलाईच नाही तर रशिया प्रमाणेच जर्मनी, अमेरिका अशा देशांशी करार करून भारतात ठिकठिकाणी स्टील उद्योग सुरु करण्यात आला.
नेहरूंच्या भिलाईला वारंवार भेटी व्हायच्या. १९५७ साली बर्माच्या राजाला घेऊन नेहरू पहिल्यांदा भिलाईला आले तेव्हा त्यांचा दहा वर्षांचा नातू राजीव गांधी देखील सोबत होता. २७ ऑक्टोबर १९६० रोजी ते रेल्वे मिल आणि स्ट्रक्चरल मिलच्या उदघाटना साठी भिलाईला आले. मृत्यूपूर्वी १९६३ साली त्यांनी भिलाईला शेवटची भेट दिली.
पुढे सप्टेंबर १९६७ पर्यंत या प्लांटची क्षमता अडीच मिलियन टन पर्यंत वाढवण्यात आली होती. ते १९८८ साली तो ४ मेट्रिक टन इतपत मोठा करण्यात आला.
आजही भिलाईचा स्टील आपल्या देशातल्या उद्योगव्यवसायांची स्टीलची मुख्य भूक भागवतो. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे नेहरूंचे मुख्य पाऊल म्हणून भिलाईला ओळखले जाते.
फक्त भारतच नाही तर जगभरात हा एक आदर्श स्टील प्लॅन्ट म्हणून नावाजला गेलेला आहे. गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटात या स्टील प्लांटने ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी उचलली आणि आज येथून ६० मॅट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन पुरवठा संपूर्ण देशभरात केला जातो.
फक्त भिलाईच नाही तर राऊरकेला, बोकारो, दुर्गापूर या त्याकाळात उभारलेल्या सरकारी स्टील प्लॅन्टनी भारताच्या ऑक्सिजन निर्मितीची सर्वात मोठी जबाबदारी उचलून दिवसाकाठी हजारो मॅट्रिक टन ऑक्सिजन बनवत आहेत.
नेहरूंनी त्या काळात दाखवलेली दूरदृष्टी भारतात औद्योगिक क्रांती करून गेलीच शिवाय साठ वर्षानंतर आजच्या मेडिकल इमर्जन्सी मध्ये सुद्धा आपले देशकार्य करत आहे.
हे ही वाच भिडू.
- पुण्यात औषध निर्मितीचा कारखाना काढून नेहरूंनीच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत उभा केला
- चीनच्या युद्धात वेळेत तेल पुरवठा न झाल्याने नेहरूंनी इंडियन ऑईलचा पाया रचला
- इतिहास कितीही फोटोशाॅप केला तरी नेहरूंच नाव घेतल्याशिवाय देशाचं पान हलत नाही.