इतिहास कितीही फोटोशाॅप केला तरी नेहरूंच नाव घेतल्याशिवाय देशाचं पान हलत नाही.

के एफ रुस्तमजी नेहरूंचे सुरक्षाअधिकारी होते. नेहमी डायरी लिहायचे. एकदा नेहरूंवर हल्ला झाला होता. नागपूरमध्ये. तेंव्हा त्यांनी लिहीलय.

‘विमानतळावरून आम्ही एका उघड्या गाडीतून प्रवास सुरू केला. पंतप्रधान गाडीत पाठच्या सीटवर मधोमध बसले होते. त्यांच्या उजवीकडे मध्य प्रांताचे राज्यपाल आणि डावीकडे मध्य प्रांताचे मुख्यमंत्री होते. मी पुढल्या सीटवर कडेला बसलो होतो.

अचानक एक रिक्षा समोरच्या बाजूनं आमच्या गाडीच्या पुढ्यात आली.

चालकानं कचकन ब्रेक मारला. त्यासरशी नेहरू गाडीत मागे उभे होते ते पुढे बसलेल्या लष्करी सचिवांच्या आणि माझ्या अंगावर फेकले गेले.

पुढल्याच क्षणी एक माणूस आमच्याकडे धावत आला आणि गाडीच्या फुटबोर्डावर चालकाच्या जवळ चढून उभा राहिला. नेहरूंनी त्याला विचारलं,

“क्या चाहते हो भाई?”

रिक्षा रस्त्यावर मध्येच आडवी आल्याचं पाहताच मी आणि लष्करी सचिव उभे राहिलो. घुसखोर जेव्हा फुटबोर्डावर चढला तेव्हा राजगोपालांनी पाहिलं की त्याच्या हातात चाकू आहे. चाकू पाहून त्यांनी चालकाच्या बाजूने गाडीबाहेर उडी घेतली आणी ते त्याच्याशी झटापट करू लागले.

त्याच क्षणी पोलीस सार्जंट टेरेंस क्वीन मोटर सायकलवरून तिथून चालला होता.

त्यानं मोटरसायकल त्या माणसावर घातली. दुसराही कुणी माणूस कटात सामील असेल आणि आमचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठीच त्यानं पहिला प्रसंग घडवून आणला असेल तर…असं वाटून मी पंतप्रधानाच्या संरक्षणासाठी त्यांच्या अगदी जवळच उभा राहिलो होतो.

आमची गाडी पुढे जाऊ लागली तेव्हा जमाव आरडाओरडा करू लागला.

मग मी पंतप्रधानांच्या गाडीतून खाली उतरलो आणि त्या हल्लेखोराला मागून येणाऱ्या एस्कॉर्ट कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू लागलो,

पण इतका वेळ ढिम्म बसून राहिलेले त्यातले मूर्ख अधिकारी त्या माणसाला आत घ्यायला तयार होईनात.

सरतेशेवटी डि.आय.जी. बी.एम. शुक्ल आणि मी दोघांनी मिळून त्याला एका काळ्या मारियात म्हणजे कैद्यांना न्यायच्या व्हॅनमध्ये टाकलं आणि त्यानंतरच मी पुन्हा सुरक्षाकोंडाळ्यात सामील झालो.

व्हॅनमध्ये नेताना मी त्या हल्लेखोराकडे पाहिलं होतं. हिरवा शर्ट आणि तांबडया रंगाची पँट घातलेला तो एक फाटका इसम होता. त्याचं कपाळ अरुंद होत, खोल गेलेले आणि कावेबाज दिसत होते. त्याच्या वागण्यात उन्माद दिसत होता.

“तुझा हेतू तरी काय होता असं करण्यात?”

असं मी त्याला विचारलं त्का असंबद्धपणे बडबडला,

“सरकार माझ्याविरुद्ध आहे. पोलीस मला सता लोक मला षंढ म्हणतात. रिक्षा चालवण्यामुळे माझी तब्येत खालावली, रसातळाला गेली.”

रुस्तुमजींच्या पुस्तकात असे नेहरूवर झालेल्या अनेक हल्ल्यांचे उल्लेख आहेत.

पण या गोष्टींची फार चर्चा झाली नाही. नागपूर मधला हल्ला झाला त्यानंतर झालेल्या सभेत नेहरू म्हणाले, तो अगदी छोटासा चाकू होता. झटापटीचा प्रयत्न केला असता तर मीच त्या माणसाला भारी पडलो असतो.

एकदा नेहरू अहमदनगरला गेले. तिथे इंग्रजांनी त्यांना ज्या तुरुंगात ठेवलं होतं तिथे भेट दिली. तिथं त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या कोठडीत होतो त्या कोठडीवर भलतच नाव आहे. आणी ज्या कोठडीत आपण नव्हतो त्या कोठडीवर आपलं नाव लिहिलय.

आपला इतिहास आपल्या डोळ्यादेखत बदललेला पाहून नेहरू हैराण झाले.

पुढे नेहरू वारले.

पण इतिहास अजूनही कधी त्यांना मुस्लीम ठरवतो. कधी बहिणीच्या मुलीचे, बहिणीचे फोटो टाकून चारित्र्यहीन ठरवतो. पण इतिहास कितीही फोटोशॉप केला तरी नेहरू यांचं नाव घेतल्याशिवाय देशाचं पान हलत नाही. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असोत. माणसाने एवढ जवाबदार असायला पाहिजे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.