नेहरूंच्या जागेवर, आता सावरकर !

प्रतिमांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या राजकारणामधील नवा वाद गोव्यातून समोर येतोय. गोव्यामधील इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू यांचे सर्व फोटो काढून तेथे विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत, अशी माहिती काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे गोवा प्रमुख अहराज मुल्ला यांनी दिली आहे. या मुद्द्यावरून गोव्यातील वातावरण तापतय.

गोव्यातील इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘द राइझ ऑफ नॅशनलिझम इन इंडिया’ हा धडा भारतातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा उदय कसा झाला याविषयी माहिती देणारा आहे. या धड्यामध्ये पूर्वी नेहरूंचे दोन फोटो होते. मात्र आता या संपूर्ण पाठ्यपुस्तकात नेहरूंचा एकही फोटो नसल्याने हा जाणून बुजून नेहरूंचं इतिहासातील योगदान पुसून टाकण्यासाठी रचलेला कट आहे, अशी तक्रार काँग्रेसकडून करण्यात आलीये.

इयत्ता दहावीच्या पुस्तकात याच धड्यामध्ये पूर्वी नेहरू आणि महात्मा गांधी यांचा एकत्रित असा एक आणि नेहरूंचा स्वतंत्र एक असे दोन फोटो होते. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर २०१३ साली इतिसाहाचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. देशाच्या राष्ट्रवादाबाबतची माहिती सांगणाऱ्या धड्यातील नेहरूंचे दोन्ही फोटो वगळून तेथे सावरकरांचा एकच फोटो छापण्यात आला आहे.

२०१३ पासूनच गोवा काँग्रेसने वारंवार हा मुद्दा उपस्थित केला असून २०१६ साली जेव्हा या पुस्तकाची पुन्हा छपाई करण्यात येईल तेव्हा नेहरूंचा फोटो पुन्हा घालण्यात येईल असे आश्वासन गोव्याच्या शैक्षणिक विभागाकडून देण्यात आले होते मात्र, पुन्हा या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांच्याच कार्यकाळात गोव्याला मुक्ती मिळाली. गोवा महाराष्ट्रात विलीन होऊ नये या गोवेकरांच्या निर्णयाला नेहरूंनी जाहीर पाठिंबाही दिला होता, तरीही त्यांना पुस्तकातून वगळण्यामागचे कारण काय…? देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची साधी ओळखही आमच्या विद्यार्थ्यांना करून दिली जात नाही. गोव्याचे शिक्षणमंत्री असणाऱ्या मनोहर पर्रीकरांना राज्यातील सर्वच मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेत भरती करायचे आहे का…? असा सवाल या निमित्ताने गोवा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी उपस्थित केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.