इफ्तार पार्टी : नेहरूंनी चालू केली, शास्त्रींनी बंद केली, परत इंदिरांनी चालू केली अन मोदींनी…

रमजान महिना सुरु आहे. इस्लाममध्ये रमजान महिन्याला खूप महत्व आहे. असं मानतात की, रमजान महिन्यात पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्याला महत्व असते,

या काळात रोजा पाळला जातो. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा सोडण्याला ‘इफ्तार’ म्हणतात तर सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी काही रोज्याची सुरुवात करण्याला सहरी म्हणतात.

यातल्या ‘इफ्तार’ला धार्मिक दृष्टिकोनातून जितकं महत्व आहे, तितकंच राजकारणात आहे म्हणलं तर वावगं वाटायला नको…

इफ्तार पार्टीचं अन राजकारणाचं तसं जवळचं नातं आहे. रमजान महिन्यात तुम्हाला अनेक नेते डोक्यावर मुस्लिम समाजाची टोपी घालून इफ्तार पार्टीचा आनंद लुटतांना दिसतात. तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात हे मॅटर नाही करत मात्र मुस्लिम व्होट बँक आकर्षित करण्यासाठी इफ्तार पार्टी हा एक निव्वळ राजकीय डावपेच आहे. 

त्याचं आयोजन हे हिंदू-मुस्लिम भावनिक ऐक्यासाठी कमी अन मुस्लिम मतांसाठी जास्त असतेय हे कुणीच नाकारू शकत नाही…पण हे सुरु कधी झालं ?

राजकारणात इफ्तार पार्टी देण्याची प्रथा नेमकी कुणी सुरु केली ?

याचं उत्तर म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. 

पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यापासून इफ्तार पार्टीची प्रथा सुरु झाली.  त्यांच्या कार्यकाळात ७, जंतरमंतर रोडवर असलेल्या काँग्रेस कार्यालयात नेहरू दरवर्षी इफ्तार पार्ट्या आयोजित करत असायचे. 

त्यानंतर, लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर ही प्रथा बंद पडली. 

१९७४ मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांनी लखनौमधील मुस्लिम व्होट बँक लक्षात घेऊन इफ्तार पार्टीची प्रथा पुन्हा सुरु केली. त्याचा फायदा त्यांना झाला. असं म्हणतात की, बहुगुणा यांच्या यशाला बघून इंदिरा गांधी यांनी देखील त्यांचं अनुकरण केलं आणि दरवर्षी दिल्लीत इफ्तार पार्टी द्यायला सुरुवात केली. 

१९७७ मध्ये जनता पक्ष सत्तेत आला. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही इफ्तार पार्टी आयोजित करण्याची प्रथा सुरू ठेवली परंतु मोरारजी देसाई यांनी हजेरी लावली नाही.

पण त्यानंतरच्या जवळपास सर्वच पंतप्रधानांनी अधिकृत इफ्तार पार्टीचं आयोजन करत आले.

भाजपचं बघायचं तर, 

विरोधी पक्षांनी भाजपला जातीयवादी पक्षाचे प्रमाणपत्र दिल्यामुळे भाजपाला देखील इफ्तार पार्ट्या आयोजित कराव्याच लागल्या. थोडक्यात अटलबिहारी वाजपेयींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्ट्या मुस्लिम व्होटबँकेसाठी नव्हे तर परस्पर सौहार्दाच्या हेतूने दिल्या गेल्याचं म्हणलं जातं.

भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाझ हुसेन हे वाजपेयींच्या इफ्तार पार्टीचे मुख्य होस्ट असायचे.  मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाध्यक्ष म्हणून भाजपची पहिली अधिकृत इफ्तार पार्टी आयोजित केली होती.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्यांच्या निवासस्थानी इफ्तारचे आयोजन करत असत. शिवाय ते नेहमीच राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात सहभागी असायचे.

उत्तर प्रदेशमध्ये खास हेमवती नंदन बहुगुणा यांनी ही प्रथा अधिकृत बाब बनवली आणि मुलायमसिंग यादव, मायावती, राजनाथ सिंह, कल्याण सिंह आणि अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी देखील ही प्रथा सुरूच ठेवली.

मुस्लीम बंधुता आणि धर्मनिरपेक्षता बळकट करण्याचा आमचा हेतू आहे असं सांगत, स्व. राजनारायण आणि  हेमवती नंदन बहुगुणा टोप्या घालून नमाज पढत असत.  मुस्लीम-यादव समीकरण बळकट करण्यासाठी मुलायम सिंह यांच्यासाठी मुस्लिमांबद्दल विशेष आपुलकी दाखवण्यासाठी इफ्तार पार्टी हा महत्त्वाचा  इव्हेंट आहे. अशा प्रसंगी मुलायमसिंग यांची ओळख ‘मुल्ला मुलायमसिंग’ अशी करून दिली जाते. 

मात्र…मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र युपी मधील अनेक दशकांची परंपरा मोडीत काढली. २०१७ मध्ये जसे ते मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आले तसे त्यांनी एकही इफ्तार पार्टी आयोजित केलीच नाही. अन उलट नवरात्रीच्या उपवासाच्या काळात त्यांच्या अधिकृत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फराळाची मेजवानी आयोजित केली होती. 

२०१९ मध्ये जेंव्हा उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी राजभवनात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते मात्र तेंव्हा मुख्यमंत्री योगी त्यात सहभागी झाले नव्हते.

देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनीही इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात होते.

मात्र ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या कार्यकाळात ही प्रथा बंद केली होती. त्या पैशात त्यांनी अनाथाश्रमांसाठी अन्न, कपडे आणि ब्लँकेटवर पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नंतर प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी प्रथा पूर्वरत सुरु केली.

मात्र मोदींनी राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जींच्या इफ्तार पार्टीमध्ये कधीही सहभाग नोंदवला नाही.

अलीकडेच राष्ट्रपतींनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती मात्र काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना विरोधकांच्या टिकेला तोंड दयावे लागले होते, 

यावर जामा मशीदचे शाही इमाम मौलाना अहमद बुखारी असं म्हणतात की, 

“केवळ दिखाव्यासाठी मुस्लिम टोपी घालणे हा इस्लामचा अपमान नाही का ? धार्मिक सौहार्दाच्या नावाखाली मुस्लिम व्होटबँकेसाठी इफ्तारसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून धर्मनिरपेक्षता दाखवणे हा मुस्लिमांचा विश्वासघात आहे. त्यापेक्षा मोदीच चांगले आहेत जे अशा काही गोष्टी दाखवतच नाहीत”. 

हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की, इतर कोणत्या धर्माचे, पंथाचे कार्यक्रम अशा रीतीने आयोजित केले जात नाहीत. इफ्तारच्या भव्य पार्ट्या आयोजित केल्या म्हणजे आम्ही धर्मनिरपेक्ष आणि इतर धर्माच्या पार्ट्या आयोजित करणे म्हणजे जातीयवादी असं समीकरणच होऊन बसलंय.  

त्यामुळे इफ्तार पार्टीला राजकीय समीकरणाचं स्वरूप आलेलं हे आपण आत्तापर्यंतच्या इफ्तार पार्ट्यांच्या इतिहासावरून पाहतोय…

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.