ना वाजपेयी, ना मोदीजी ; भाजपचं नशिब खरच कोणी बदललं असल ते यांनीच…

भाजपमध्ये असे काही नेते होते ज्यांची भाषण ऐकण्यासाठी विरोधी पक्षातले नेते देखील गर्दी करायचे. प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी अशी काही त्यातली निवडक नावं. यातलच एक नाव म्हणजे,

कल्याण सिंह..

उत्तरप्रदेशच्या अलिगढ मध्ये जन्मलेले कल्याणसिंह हे जनसंघाच्या काळापासूनचे भाजपचे जुने शिलेदार..

कल्याण सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर अलिगढचा उल्लेख येतोच येतो. १९६२ मध्ये जेव्हा त्यांचं वय अवघे ३० होते तेव्हा त्यांनी जनसंघाच्या तिकिटावर अलिगढ जिल्ह्यातील अत्रौली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण ते जिंकून आले नव्हते.

१९६२-६७ या काळात त्यांनी राजकीय मैदानावर बरीच मेहनत केली. आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणजे १९६७ मध्ये अत्रौली विधानसभा मतदारसंघातून कल्याणसिंग निवडणुकीला उभे राहिले आणि जिंकून आले. 

त्यानंतर राजकारणाची मॅरेथॉन इनिंग खेळतच राहिले आणि जिंकतही राहिले. 

कल्याण सिंह यांनी भाजपला दिलेल्या अमूल्य योगदानावर नजर मारली पाहिजे ज्याचा विसर खुद्द भाजपला पडला असं म्हणतात.

यात टप्पा आला तो म्हणजे, मंडल आयोगाचा.

१९८९-१९९० मध्ये मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापलं होतं. नेमकं तेंव्हा भाजपच्या स्थापनेला १० वर्षे होत आली होती. मंडल तोडण्यासाठी भाजपने कमंडलचे राजकारण सुरू केले आणि मंडलच्या विरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्व होते कल्याणसिंग. 

जनता देखील ‘मंडल’ सोडून ‘कमंडल’ मध्ये सामील झाली. कल्याण-कमंडल या जोडीचा परिणाम म्हणजे १९९१ मध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आणि कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

याच दरम्यानचा टप्पा होता रामजन्मभूमी आंदोलनाचा….

याही आंदोलनाचे हिरो होते कल्याणसिंग…

भाजपच्या राजकारणात बाबरी मशीद विध्वंसाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि हिच बाबरी मशीद पाडण्यामध्ये ज्यांच्या भूमिकेवर कायमच प्रकाश टाकला जातो ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी.

पण या दोन्ही नेत्यांच्या इतकीच कल्याणसिंग यांची भूमिका महत्वाची होती.

बाबरी मशिदीच्या पाडावापुर्वी एक वर्षा आधी अडवाणी यांच्या रथ यात्रेने संपूर्ण देश खळबळून उठला तेव्हा उत्तरप्रदेशमध्ये मुलायमसिंग यांचं सरकार होतं. रथयात्रा रोखण्याची सिंहगर्जना करणाऱ्या मुलायम यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.

मुलायमसिंग यांच्याशी सामना करण्यासाठी भाजपने कल्याणसिंग यांना पुढे केलं. कल्याणसिंग आपल्या तिखट वक्तृत्वासाठी फेमस होते. अटलजींच्या खालोखाल त्यांची भाषणे फेमस होती. त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये मुलायम यांच्या विरुद्ध धुरळा उडवून दिला. 

पुढच्या एका वर्षातच भाजपला युपीमध्ये सत्तेत आणायचं काम कल्याणसिंग यांनीच केलं. 

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे कल्याणसिंग पहिले भाजप मुख्यमंत्री बनले. युपीच्या जनतेची नस त्यांनी बरोबर ओळखली होती. असं म्हणतात कि,

मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राम मंदिर उभारण्याची शपथ घेऊन टाकली होती.

बाबरी मशीद विध्वंसाची घटना घडली. आणि या विध्वंसासाठी कल्याण सिंग यांना जबाबदार धरण्यात आले. 

जेव्हा बाबरी मशिदीची शेवटची वीट पडली तेव्हा त्यांनी आपल्या पीए कडे रायटिंग पॅड मागवला व तिथेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा लिहून दिला. ये सरकार राम मंदिर के नाम पर बनी थी और उसका मकसद पूरा हुआ. ऐसे में सरकार राममंदिर के नाम पर कुर्बान.

पण यानंतर पक्षात अंतर्गत कलहामुळे कल्याण सिंग यांनी पक्षातील अंतर वाढत गेलं…

१९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींसोबतच्या राजकीय मतभेदांमुळे कल्याण सिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ​​’राष्ट्रीय क्रांती पार्टी’ची स्थापना केली. २००२ ची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक त्यांनी राष्ट्रीय क्रांती पक्षाच्या बॅनरखाली स्वबळावर लढवली.

२००४ मध्ये वाजपेयींच्या निमंत्रणावरून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. आणि लागलीच २००४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलंदशहर मधून उभे राहत प्रथमच संसदेत पोहोचले.

यानंतर पुन्हा तेच घडलं…

पक्षांतर्गत ‘उपेक्षेमुळे’ त्यांनी २००९ मध्ये भाजप पक्ष सोडला आणि मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षात गेले. पण ते सपा मध्ये काय फार काळ टिकले नाही २०१३ मध्ये त्यांची पून्हा भाजपमध्ये घर वापसी झाली.   

२०१४ मध्ये भाजप जिंकून केंद्रात सत्ता स्थापन झाली. मोदी सरकार आल्यानंतर त्यांना राजस्थानचे राज्यपाल बनवण्यात आले. २०१५ मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवला होता. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.