आपलं विमान क्रॅश होणार आहे हे ऐकून पण मंडेला शांतपणे पेपर वाचत बसले

नेल्सन मंडेला संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जो कृष्णवर्णीयांसाठी जो लढा उभारला होता, त्याची प्रेरणा त्यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून घेतली होती.

त्यांच्या संयतपणाची अशीच एक गोष्ट टाइम मॅगजिनचे एडिटर रिचर्ड स्टेंगल यांनी ‘लॉन्ग वॉक टू फ्रीडम’ या पुस्तकात लिहिली आहे.

एकदा रिचर्ड स्टेंगल आणि नेल्सन मंडेला एका कामानिमित्त विमानप्रवास करत होते. हे विमान सहा सीटर होते. साहजिकच स्टेंगल मंडेलांच्या बाजूच्या सीटवर बसले. प्रवास सुरु झाल्यावर नेल्सन मंडेला आपल्याबरोबर आणलेला पेपर वाचू लागले. मंडेलांना पेपर वाचणं अतीव प्रिय होत. ते पेपरमधली छोट्यातली छोटी गोष्ट वाचत.

अशाप्रकारे प्रवास सुरळीत सुरू होता, की मध्येच अचानक मंडेलांच लक्ष विमानाच्या पंखाकडे गेलं. त्यांना दिसलं की विमानाच्या प्रोपेलरमध्ये काहीतरी गडबड झाली आहे.

त्यांनी स्टेंगल यांना ही गोष्ट पायलटच्या कानावर घालायला सांगितली.
हे सांगताना मंडेला अजिबात घाबरले नव्हते. त्यांच्या आवाजाचा टोन नेहमीप्रमाणेच होता. पण स्टेंगल मात्र जाम घाबरले होते. कारण विमानाचा प्रोपेलर जर काम करत नसेल तर साहजिकच विमान क्रॅश होतं. ते उठले आणि पळत जाऊन पायलटला याविषयी सांगितलं.

स्टेंगल परत आपल्या जागेवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की, मंडेला अजूनही पेपरच वाचत आहेत.

त्यांनी स्टेंगल यांना परत आलेलं बघून फक्त एवढंच विचारलं की, तू त्यांना सूचना केलीस का ? यावर स्टेंगल म्हणाले की,
हो पायलट एमरजेन्सी लँडिंगसाठी एखादं जवळच एअरपोर्ट शोधतो आहे.

हे ऐकून मंडेलांनी परत आपलं डोकं पेपरमध्ये खुपसल, आणि ते पेपर वाचण्यात मग्न झाले.

स्टेंगल यांची जीवनमरणाच्या प्रश्नाने पुरती घाबरगुंडी उडाली होती. आणि दुसरीकडे नेल्सन मंडेला होते, जे पेपरच वाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. अशा पद्धतीने जसं काही घडलंच नसावं.

पुढं विमानानं नीट लँडिंग तर केलं. पण मंडेलांच्या या वागण्याचं स्टेंगल यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी आपला सगळा धीर एकवटून मंडेलांना विचारलं,

तुम्हाला या सर्व प्रकारची भीती नाही का वाटली.

यावर मंडेला म्हणाले,

भीती ! मी तर आत मधल्या आत मध्ये पुरता घाबरून गेलो होतो. माझं सर्वांग भीतीनं कापत होतं रिचर्ड. पण मी जर ते तुम्हा सर्वांना दाखवून दिलं असतं तर, तुम्ही जेवढे विमानात होता ते सर्वजण घाबरले असते.

हा प्रसंग तर इथंच संपला. पण रिचर्ड स्टेंगल पुढं लिहितात, की त्यादिवशी मला समजलं की साहस काय गोष्ट असते. आपल्या भीतीला आपल्या चेहऱ्यावर न येऊ देणं म्हणजेच साहस असत. आणि लोक तुम्हाला त्यांचे आदर्श मानत असतील तर तुमच्या प्रत्येक कृतीचं ते अनुकरण करतात.

नेल्सन मंडेला यांच्यात ते गुण जन्मतःच असतील. पण त्यांनी अशा प्रकारे संयमी राहणं हा गुण आपल्या गुरूंकडून म्हणजेच महात्मा गांधींकडून घेतला आहे.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.