नेपाळच्या राष्ट्रगीतापेक्षा राष्ट्रध्वजाचा इतिहास जास्त भारी आहे

भारत जोडो यात्रेच्या विधिममधील सभेच्या वेळी राष्ट्रगीत घेण्यात येणार होता. सगळे जण राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीत उभे झाले. व्यवस्थापकांनी राष्ट्रगीत लावलं, पण ते भारताचं नव्हतं तर नेपाळचं होतं.

सयौं थुँगा फूलका हामी, एउटै माला नेपाली, सार्वभौम भई फैलिएका, मेची-महाकाली…

नेपाळी राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर सुद्धा राहुल गांधी आणि बाकी नेते तसेच उभे राहिले, काही सेकंदानंतर चूक लक्षात आल्यानंतर नेपाळचं राष्ट्रगीत बंद करून भारताचं राष्ट्रगीत सुरु करण्यात आलं. व्यवस्थापकाकडून झालेल्या या चुकीमुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या प्रसंगामुळे अनेकांना नेपाळचं राष्ट्रगीत माहित झालंय. 

पण भिडूंनो नेपाळच्या राष्ट्रगीताची जशी आज देशात चर्चा होतेय त्यापेक्षा जास्त चर्चा जगभरात नेपाळच्या राष्ट्रध्वजाची होते. 

कारण नेपाळचं राष्ट्रध्वज हे जगातील एकमेव राष्ट्रध्वज आहे ज्याचा आकार आयताकृती नाही. जगभरातील सर्व देशांचे राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम हे वेगवेगळे आहेत परंतु आकाराच्या बाबतीत मात्र जगभरातील राष्ट्रध्वज एकसारखे दिसतात. एकीकडे जगभरातील देशांचे राष्ट्रध्वज आयताकृती असतांना नेपाळच्या ध्वजावरून अनेकांना प्रश्न पडतो. 

Flag of Nepal

नेपाळचा राष्ट्रध्वज पाहिल्यावर असा प्रश्न तुमच्याही मनात पडला असेल की या राष्ट्रध्वजाचा आकार असा का? 

तर यामागे कारण आहे नेपाळच्या राष्ट्रध्वजामागे असलेली भुरगोलिक आणि सांस्कृतिक मान्यता. प्रत्येक देश हा त्याची संस्कृती, मान्यता, परंपरा यांच्या आधारावर स्वतःचा राष्ट्रध्वज तयार करत असतो. कोणत्याही सार्वभौम देशावर राष्ट्रध्वज स्वीकारण्यासाठी कोणाचं बंधन नसतं. स्वातंत्र्यानंतर भारताने सुद्धा स्वतःच्या सार्वभौम अधिकाराने राज्यघटनेच्या तत्वज्ञाला अनुसरून राष्ट्रध्वज स्वीकारला. 

परंतु नेपाळवर जगातील कोणत्याही देशाने राज्य केलेलं नाही त्यामुळे नेपाळचा राष्ट्रध्वज कधीच बदलण्यात आला नाही. 

राजे पृथ्वी नारायण शाह यांनी १७६८ मध्ये हिमालयातील डोंगराळ भागातील सर्व लहानमोठ्या संस्थानांना एकत्र करून गोरखा साम्राज्याची स्थापन केली आणि नेपाळ हा देश अस्तित्वात आला. तेव्हा त्यांनी नेपाळच्या गोरखा साम्राज्याचा नवीन ध्वज तयार केला होता. 

या ध्वजात नेपाळची भौगोलिक परिस्थिती आणि परंपरा यांचा मेळ घालण्यात आला होता. 

नेपाळ हा हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात वसलेला आहे, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा आकार सुद्धा पर्वत आणि त्यांच्या दऱ्यांच्या आकारासारखा आहे. नेपाळच्या राष्ट्रध्वजाकडे लक्ष दिल्यास त्यात दोन पर्वत आणि त्यांच्यात दरी असलेली दिसते. हे या ध्वजाच्या आकारामागे असलेलं भौगोलिक कारण आहे. 

राष्ट्रध्वजाच्या या आकारामागे सांस्कृतिक कारण हे वेगळं आहे. नेपाळमध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक राहतात. दोन्ही धर्मांमध्ये नेपाळच्या कमी हवेमध्ये सुद्धा सहजतेने फडकत अशा पताकांचा वापर केला जातो. त्याच पताकांमुळे राष्ट्रध्वज सुद्धा तसाच आहे असं सांगितलं जातं. 

या राष्ट्रध्वजाचा वापरण्यात आलेल्या लाल रंगामागे सुद्धा भौगोलिक आणि सांस्कृतिक कारण सांगितले जातात. 

ध्वजामध्ये लाल रंगाचा वापर करण्यात आलाय आणि त्याला निळ्या रंगांची जाड किनार देण्यात आली आहे. ध्वजात लाल रंग वापरण्यामागचं कारण नेपाळमध्ये असणाऱ्या फुलांशी संबंधित आहे. हिमालयामध्ये बुरांश नावाचं लाल रंगाचं फुलझाडं आढळतं. हे फुल नेपाळचं  राष्ट्रीय फुल आहे आणि नेपाळचा राष्ट्रीय रंग लाल आहे. हे यामागचं भौगोलिक कारण आहे. 

तर लाल रंगच हिंदू धर्मात वापर केला जातो. लाल रंगला पवित्र मानलं जातंयामुळे याचा वापर राष्ट्रध्वजाचा करण्यात आला आहे असं सांगितलं जातं. यासोबतच लाल रंग युद्धातील विजयाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे नेपाळच्या पहिल्या राजाने युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून ध्वजात लाल रंगाचा वापर करण्यात आला आहे असं सांगितलं जातं. 

त्यानंतर तिसरा घटक म्हणजे राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला चंद्र तारा दाखवण्यात आलाय तर खालच्या बाजूला सूर्य दाखवण्यात आला आहे. 

कारण नेपाळचे भौगोलिक परिस्थितीनुसार दोन भाग आहेत. त्यात उत्तरेचा भाग हा पूर्णपणे बर्फाळ आणि डोंगराळ आहे तर खालचा भाग हा मैदानी आणि नद्यांचा आहे. उत्तर भागात थंडी असते तर दक्षिणेच्या मैदानात उष्णता असते. त्यामुळे वरच्या पताकेवर शीतलतेचे प्रतीक म्हणून चंद्र दाखवण्यात आला आहे तर खालच्या पताकेवर उष्णतेचे प्रतीक म्हणून सूर्य दाखवण्यात आला आहे असं भौगोलिक कारण सांगितलं जातं. 

तर यामागचं सांस्कृतिक कारण वेगळं आहे. जेव्हा पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळची स्थापना केली चंद्र वंशीय राजपूत आणि सूर्य वंशीय राजपुतांची सत्ता एकत्र जोडली होती. त्यामुळे ध्वजात चंद्र आणि सूर्य दाखवण्यात आले आहेत असं सांगितलं जातं. यासोबतच नेपाळचे साम्राज्य चंद्र, सूर्य अस्तित्वात असेपर्यंत टिकून राहावे असा यामागे उद्देश असावा असंही सांगितलं जातं. 

१९६२ मध्ये नवीन राज्यघटना स्वीकारतांना राष्ट्रध्वजात थोडेसे बदल करण्यात आले होते. त्यातलय चंद्र सूर्यावरचे डोळे आणि नाक काढून टाकण्यात आले होते. बाकी ध्वज तसाच ठेवण्यात आला होता. 

परंतु जेव्हा नेपाळमधून राजेशाही समाप्त करून लोकशाही अस्तित्वात आली तेव्हा सुद्धा हा ध्वज बदलण्यात आला नाही.

जगातील इतर देशांप्रमाणे नेपाळमध्ये सुद्धा राजेशाही हटवून लोकशाही असायला हवी यासाठी नेपाळचे लोक मागणी करत होते. अखेर २००८ मध्ये लागू झालेल्या नवीन कायद्ययावर नेपाळमध्ये लोकशाही अस्तित्वात आली. लोकांचा राजेशाहीला इतका विरोध होता की, राजेशाही समाप्त होण्यापूर्वीच देशाचे राष्ट्रगीत बदलण्यात आलं होतं. 

नेपाळच्या जुन्या राष्ट्रगीताचा नेपाळच्या राज्याला दीर्घ आयुष्य दे अशी देवाला प्रार्थना करण्यात येत आहे आणि नेपाळचे राजे हेच देशाचे सार्वभौम सत्ताधीश आहेत असं ते राष्ट्रगीत होतं, मात्र संसदेने ऑगस्ट २००७ मध्ये राष्ट्रगीत बदलून नवीन राष्ट्रगीत स्वीकारलं ज्यात नेपाळच्या भौगोलिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आलंय. यात नेपाळमधील पर्वत, मैदान, नद्या, फुलं, फळं आणि जाती-धर्मांचा उल्लेख आहे.

पण जेव्हा राष्ट्रध्वज बदलण्याची वेळ आली तेव्हा याला विरोध करण्यात आला होता. 

मे २००८ मध्ये देशातून राजेशाही काढून टाकण्यात आली होती. तेव्हा राजेशाहीचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज सुद्धा बदलण्यात यावा अशी मागणी काही पक्षांनी केली होती. मात्र तेव्हा सत्ताधारी पार्टी आणि लोकांनी राष्ट्रध्वज बदलण्याला विरोध केला होता. 

या ध्वजामागे असेलेले सांस्कृतिक आणि भौगोलिक मान्यतांचा नेपाळी लोकांना अभिमान आहे. म्हणूनच जगातील सर्व देशांमध्ये आगळावेगळा असलेला हा ध्वज अजूनही नेपाळचा राष्ट्रध्वज आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.