नेताजी पालकर ९ वर्षे अफगाणिस्तानच्या या किल्ल्याचे किल्लेदार होते.

इतिहास ज्यांना प्रतिशिवाजी म्हणून गौरव करतो असा योद्धा म्हणजे नेताजी पालकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळात फिरून जे तरुण साथीदार गोळा केले यात नेताजींचा देखील समावेश केला जातो. नेताजी सातारा जिल्ह्यातील खन्डोबा पालीचे होते असं म्हणतात तर काही ठिकाणी ते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातले होते असं सांगितलं जात.

नेताजी प्रचंड पराक्रमी होते. आपल्या तलवारीने त्यांनी कित्येक लढाया गाजवल्या. स्वराज्याची निर्मिती झाली तेव्हा शिवरायांनी शहाजी महाराजांचे सहकारी असणाऱ्या माणकोजी दहातोंडे यांना सरसेनापतिपद दिलं होतं. शहाजी महाराजांसाठी १५ वर्षे तर शिवाजी महाराजांसाठी २० वर्षे त्यांनी सेवा केली.

माणकोजी दहातोंड्याच्या मृत्यूनंतर महाराजांनी नेताजी पालकर यांना सरनोबतीची जागा दिली. नेताजी पालकर पराक्रमी तर होतेच पण त्यांची लोकप्रियता अफाट होती. ठिकठिकाणच्या शिलेदार लोकांवर त्यांचे बरेच वजन होते.

जेव्हा स्वराज्यावर अफजलखानाची स्वारी झाली, खान प्रतापगडावर महाराजांच्या भेटीस आला तेव्हा तो दगाफटका करेल या अंदाजाने नेताजी जावळीच्या जंगलात किल्ल्याच्या पूर्वेला थोड्या अंतरावर झाडींत त्याच्या लोकांसह ठेवले होते. ठरल्याप्रमाणे खुणेचे शिंग होताच नेताजी अफजलखानाच्या लोकांवर तुटून पडले. त्याने त्यांची सरसहा कत्तल केली.

सिद्दी जोहारने पन्हाळगडाला वेढा दिला तेव्हा नेताजी पालकरांनी आसमंतांतील मुलूख उद्ध्वस्त करून वेढा देणार्‍या सैन्याची रसद मारण्याचा पराक्रम केला होता. ते गनिमी काव्यात प्रचंड तरबेज होते. विजापुरकरांच्या आदिलशाही फौजेस मैदानांत कधी तोंड देत नसत, परंतु रात्रीच्या वेळीं तिच्यावर हल्ले करून त्यांना पळवून लावण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडलं.

इ.स. १६६२ च्या पावसाळ्यानंतर नेताजी पालकरांनी औरंगाबादेपर्यंत मोंगलाचा मुलूख लुटून उध्वस्त केला, व खंडणी गोळा केली. त्यांना अडविण्यास कोणीच पुढे आले नाही. त्याप्रमाणेच शाहिस्तेखानाच्या पुण्याच्या मुक्कामातही त्यांनी वारंवार हल्ले करून सतावून सोडले होते.

पुढील पावसाळ्याच्या सुमारास नेताजींनी अहमदनगर व औरंगाबाद यांच्या आसमंतांतील मुलूख लुटून जाळपोळ करण्यास सुरवात केली होती. परंतु मोंगलांच्या एका तुकडीनें त्यांच्यावर अचानक हल्ला करूनमराठी सेनेला मागे हटवले. यावेळी नेताजी पालकर जखमी झाले होते.

नेताजी पालकर मोंगलांच्या मुलुखात यशस्वीपणें लुटालूट करून प्रत्येक पावसाळ्याच्या आरंभी अगदी नियमितपणें परत येत असत. पुढे जेव्हा मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान दक्षिणेत आले, तेव्हां ही बातमी  शिवाजी महाराजांना वेळेवर कळली नाही. सरनोबत म्हणून शत्रूच्या हालचालीवर लक्ष्य ठेवणे हा एक नेताजींच्या कामाचा भाग होता.

पण ते ऐनवेळी दूर कोठेतरी अडकले होते. महाराजांना नेताजींच्या या वर्तनाचा राग आला परंतु त्यांनी या गुस्ताखीची गय केली.

पुढे पन्हाळा मोहिमेवेळी ते वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे “समयास कैसा पावला नाहीस” असे म्हणून बडतर्फ केले असं सांगितलं जातं.

पुढे नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्‍याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.

या प्रसंगीं जयसिंगानें नेताजी पालकरांना लांच दिली असावी असें ग्रँटडफ म्हणतो. तर काही जण म्हणतात कि स्वतः शिवाजी महाराजांनी मुघलांच्या गोटात आपला माणूस असावा म्हणून पालकरांना मिर्झा राजेंकडे पाठवले असावे.

मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी पालकरांना आणि त्यांचे चुलते कोंडाजी याना बीडजवळ अटक केली आणि मुघल बादशाह औरंगजेबाकडे दिल्लीस पाठवले. तिथे त्यांना कैदेत ठेवण्यात आलं. चार दिवस अत्याचार करून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. तेव्हा बादशाहने त्यांना मुर्शिद हा किताब देऊन व त्यांचे नांव महंमद कुली खान असे ठेवले . तो १६६७ सालचा मार्च महिना होता.

नेताजी मोहम्मद कुलीखान झाले पण तरी बादशाहचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्याने नेताजींना महाराष्ट्रापासून दूर म्हणून काबुल कंदाहार मोहिमेवर पाठवले. पण नेताजींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी लाहोर जवळ पुन्हा अटक करण्यात आली.

नेताजी अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे आले. त्यांच्याकडे तिथल्या किल्ल्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये बंड करणाऱ्या पठाणांच्या विरोधात मुघलांच्या बाजूने त्यांनी पराक्रम गाजवला. कंदाहार मध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीवर औरंगजेब खुश झाला. ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळणार नाहीत याची त्याला खात्री झाली.

इकडे महाराष्ट्रात अनेक मुघल सरदार स्वराजावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्याशी नाते असलेले नेताजीच महाराष्ट्राची कामगिरी फत्ते करेल असा विश्वास औरंगजेबाला होता. शिवाजीच्या विरुद्ध प्रतिशिवाजी अशी लढत करता येईल असं स्वप्न पाहत त्याने नेताजींना अफगाणिस्तानातून ९ वर्षांनी परत बोलावलं आणि दख्खनच्या मोहिमेवर पाठवलं.    

नेताजींनी हि संधी साधली. त्यांनी बेसावध मुघल सेनेला झुगारा देऊन छावणीतून पळ काढला आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. आपण द्याल ती शिक्षा मी स्वीकारेन पण मला पदरात घ्या अशी विनवणी नेताजींनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना माफ केलं. नेताजी पालकरांनी प्रायश्चित घेतल. १९जुन १६७६ रोजी महाराजांनी त्याना पुन्हा विधिवंत हिंदु धर्मात घेतले. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.