एके-४७, एके-५६ विसरा, कारण आता भारतीय सैन्याच्या ताफ्यात खुंखार एके-२०३ येतीये

केवळ भारतीय सैन्यच नाही, तर जगातल्या कुठल्याही सैन्याकडे आधुनिक शस्त्रसामुग्री असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यात भारताला चीन आणि पाकिस्तानसारखे बेभरवशी शेजारी मिळाले आहेत. त्यामुळं युद्धाचा प्रसंग कधीही ओढवू शकतो. त्यामुळं, भारताला असलेली आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज आणखीनच अधोरेखित होते.

भारतीय सैन्याच्या ताफ्यात सध्या ‘INSAS’ रायफल्स आहेत. इंडियन स्मॉल आर्म सिस्टिम्सच्या अंतर्गत येणाऱ्या या रायफल्स वजनानं काहीशा जड आहेत. त्यामुळं त्यांची जागा घेणाऱ्या नव्या आणि प्रभावी रायफल्स मिळणं अत्यंत गरजेचं होतं. भारत आणि रशियात होणाऱ्या करारानुसार एके-२०३ बंदुका सैन्याच्या ताफ्यात येतील.

या एके-२०३ रायफल्स आहेत तरी काय? त्यांच्यात आणि इन्सास रायफल्समध्ये काय फरक आहे?

एके-२०३ असॉल्ट रायफलही इन्सास रायफलपेक्षा लांबीनं लहान आणि वजनानं हलकी आहे. तुलना करायची झाल्यास मॅगझिन आणि संगीन नसलेल्या इन्सास रायफलचं वजन ४.१५ किलो आहे, तर एके-२०३ चं वजन ३.८ किलो आहे. लांबीच्या बाबतीत सांगायचं झालं, तर इन्सास रायफलची लांबी ९६० मिलीमीटर आहे आहे, तर एके-२०३ ची लांबी फक्त ७०५ मिलीमीटर आहे.

साहजिकच कमी वजन आणि लांबीमुळे, सैनिकांसाठी युद्धाच्या वेळी या रायफलचा जबरदस्त फायदा होईल. कारण एके-२०३ मुळं सैनिकांचा थकवा कमी होईल, सोबतच ही बंदूक मोठ्या कालावधीसाठी सहजपणे जवळ बाळगता येईल.

फायरिंगच्या बाबतीतही एके-२०३ उजवी आहे. इन्सास रायफल सिंगल-शॉट आणि तीन-राउंड बर्स्ट फायर करू शकते, तर एके-२०३ सेमी-ऑटोमॅटिक किंवा ऑटोमॅटिक मोडमध्ये फायर केली जाऊ शकते. इन्सास रायफल एका मिनिटात ६५० गोळ्या मारू शकते, तर एके-२०३ एका मिनिटात फक्त ६०० गोळ्याच मारू शकते. पण अचूकतेच्या बाबतीत एके-२०३ सरस आहे.

इन्सास रायफल्समध्ये २० ते ३० राऊंड्सची मॅगझिन आहे, तर एके-२०३ मध्ये ३० राऊंड्सची बॉक्स मॅगझिन आहे. इन्सासचा वेग ९१५ मीटर प्रति सेकंद आहे, तर एके-२०३ चा वेग ७१५ मीटर प्रति सेकंद आहे. एके-२०३ वर जगातली कितीही शक्तीशाली दुर्बीण बसू शकते.

भारतीय सैन्याला ७.५० लाख एके-२०३ असॉल्ट रायफल्सची गरज आहे. या रायफलसाठी भारत आणि रशियामध्ये झालेल्या डीलनुसार रशियाकडून ७० हजार ते जवळपास एक लाख रायफल्स आयात केल्या जातील. बाकीच्या ६.५० लाख रायफल अमेठीमधल्या कारखान्यात पुढच्या दहा वर्षांत बनवल्या जातील. डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार आहेत, या दौऱ्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये हा करार होणं अपेक्षित आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.