या तीन मुख्यमंत्र्यांचे निर्णय पाहिले तर कळेल, कट्टर हिंदूत्ववादात यांनी संघालापण मागे टाकलय
एकेकाळी भाजपाचे कोणते मुख्यमंत्री देशपातळीवर भाजपचं नेतृत्व करणार यावरून स्पर्धा होती. कर्नाटकातुन येडियुरअप्पा, मध्यप्रदेशातून शिवराजसिंग चौहान, छत्तीसगढमधून रमण सिंह, गुजरातमधून नरेंद्र मोदी, राजस्थानमधून वसुंधरा राजे सिंदिया हे सर्व स्पर्धेत सामील होते.
या सगळ्यांना मात देत नरेंद्र मोदी केंद्रात गेले, त्यानंतर मात्र या नेत्यांना त्यांची बरोबरी करता आली नाही. मोदींच्या विकासाच्या मॉडेल बरोबरच त्यांचं हिंदुत्व त्यांना पुढे घेऊन गेलं नव्हतं हे वेगळं सांगायला नको.
आता भाजपात नवीन मुख्यमंत्र्यांची अशीच फळी तयार झाली आहे.
त्यामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे हेमंत बिस्वा शर्मा यांची नावं प्रामुख्यानं घेता येइल. इतर राज्यातही भाजपचे मुख्यमंत्री आहेत पण या तिघांचं हिंदुत्व या नवीन पिढीत सगळ्यात कडवं असल्याचं दिसून येतंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र मानलं जाणाऱ्या पांचजन्य मॅगझिनला ७५ वर्षे झाल्याबद्दल जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात याचीच झलक पाहायला मिळाली.
सुरवात करू उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून.
“उत्तर प्रदेशात रामनवमी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. राज्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. हनुमान जयंतीही शांततेत साजरी करण्यात आली. एवढंच नाही उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच ईद आणि अलविदा जुमाला नमाज (रमजानचा शेवटचा शुक्रवार) रस्त्यावर आयोजित केला गेला नाही.“
असा मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरप्रदेशातील कामाचा पाढा वाचला. त्याचबरोबर सरकारने अवैध कत्तलखाने बंद केले आणि भटक्या गायींसाठी ५,६०० ‘गोशाळा’ बांधल्या, धार्मिक स्थळांवरील १ लाख लाऊडस्पीकर हटवले,५ वर्षात ७०० हून अधिक धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी केली असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
याबरोबरच योगींच्या कार्यकाळात अल्पसंख्यांक समाजाच्या घरावर बुलडोझर चालवल्याचा देखील आरोप झाला आहे.
त्यामुळे त्यांना बुलडोझर बाबा हे नाव समर्थक आणि विरोधक असं दोघांकडून देण्यात आलं होतं.
मदरश्यांमध्ये राष्ट्रगीत कंपलसरी करणं ,शहरांची नावं बदलणं या अशा कामांसाठी योगी आदित्यनाथ चर्चेत असतात.
महत्वाचं म्हणजे त्यांच्या अशा धोरणांना उत्तरप्रदेशच्या जनतेकडून पाठिंबा असल्याचं दिसतंय कारण ते सलग दुसऱ्यांदा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले आहेत. हिंदुत्वाचा पोस्टर बॉय बनण्यामध्ये त्यांना त्यांची भगवी वस्त्रे आणि गोरखनाथ मठाचे मठाधिपती या गोष्टी कामाला येतात हा भाग वेगळा.
त्यानंतर नंबर लागतो तो आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा.
‘मदरसे’ बंद झाले पाहिजेत, मुलांना तेथे प्रवेश देणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.
”कुराण शिकवा, काही हरकत नाही. पण विज्ञान, गणित, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र हे ही शिकवा. मदरसे बंद झाले पाहिजेत, सामान्य शिक्षण असावे. घरी पवित्र ग्रंथ शिकवा, २-३ तास शिकवा, पण शाळेत, सामान्य शिक्षण असू द्या, ज्यामुळे तुमचा मुलगा डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक, वैज्ञानिक बनू शकेल.”
असं हेमंत शर्मा बिस्वा पांचजन्याच्या कार्यक्रमात म्हणाले. मुख्यमंत्री महोदयांनी याच्या पुढे जाऊन विवादित स्टेटमेंट पण दिलं ते म्हणाले
“”सर्व मुस्लिम बांधव हिंदू होते. या पृथ्वीतलावर असा एकही मुस्लिम आला नाही. भारताच्या पृथ्वीवर प्रत्येकजण फक्त हिंदूच होता. त्यामुळे जर एखादा मुस्लिम मुलगा गुणवान असेल, तर त्याचे श्रेय मी त्याच्या हिंदू भूतकाळाला देईन.”
या आधीही बिस्वा शर्मा यांनी अशी विवादित स्टेटमेंट्स दिली आहेत.
विशेषतः आसाम मधले मियां मुस्लिम त्यांच्या निशाण्यावर राहिले आहेत.
आतापर्यंत ७०० मदरसे बंद केले आहेत आणि लवकरच बाकीचे पण करण्यात येतील असं बिस्वा शर्मा म्हणाले होते. जेव्हा काझीरंगा अभयारण्या भोवतालचा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चर्चेत आला होता तेव्हा हेमंत शर्मा बिस्वा सरकारने तेव्हादेखील मुस्लिमांचं टार्गेट केल्याचे आरोप झाले होते.
CAA प्रोटेस्टच्या दरम्यानही हेमंत शर्मा बिस्वा आसामधील ज्या मुस्लिमांकडे ‘कागद’ नाहीत ते सर्व बांगलादेशी असल्याचं म्हटलं होतं. तसेच राज्यातील मियां मुस्लिम हे धर्मांध असल्याने त्यांच्या मतांची आम्हला गरज नसल्याचंही बिस्वा शर्मा यांनी उघडपणे सांगितलं होतं.
विशेष म्हणजे हेमंत बिस्वा शर्मा हे काँग्रेसमधून आलेले नेते आहेत.
एकेकाळी ते आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई यांचे खास होते. त्यानंतर त्यांनी इतक्या कमी कालावधीत स्वीकारलेली कट्टर हिंदुत्ववादची छबी अनेकांना बुचकळ्यात टाकते. आसामध्ये भाजपा सलग दुसऱ्यांदा निवडून आलं मात्र दुसऱ्यांदा भाजपने सर्बादानन्द सोनोवाल यांना रिप्लेस करून बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे.
या लाइनमध्ये नवीन असूनही येतात ते म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
समान नागरी कायदा लवकरच लागू करणार
भाजपच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढ्याच वाक्यावर निवडणूक लढवली आणि जिंकलीही. विधासभेच्या निवडणुकीला काही महिने बाकी असताना पुष्कर सिंह धामी यांना भाजपाने मुख्यमंत्री केलं होतं. त्यानंतर पार्टी सत्तेत आली मात्र पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला. तरीही बीजीपीने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं.
आमच्या सरकारच्या अजेंडयावर समान नागरी कायदा सगळ्यात पुढं आहे यांनी कायदेतज्ञांची मदत घेऊन तो लवकर लागू केला जाईल असं त्यांनी पांचजन्याच्या कार्यक्रमात म्हटलं.
२१०४ आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यात भाजपकडून समान नागरी कायदा आणण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
पुष्कर सिंह धामी यांच्यामुळं समान नागरी कायदा सारखा चर्चेत मात्र येत राहतो.
त्याचबरोबर शाळांमध्ये भगवद्गीता, वेद, उपनिषद कंपलसरी करणे, हिंदू मंदिराबाहेर बसणाऱ्या अहिंदू व्यापारांच व्हेरिफिकेशन करणे असे निर्णय देखील धामी सरकारने घेतले होते.
त्यामुळं येणाऱ्या काळात भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा या तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात अजूनच कडवा होऊ शकतो असं जाणकार सांगतात.
हे ही वाच भिडू :
- शिवसेना संपली अशा चर्चा होत्या तेव्हा घेतलेल्या “हिंदुत्वाच्या” मुद्यामुळे पक्ष सुसाट सुटला..
- काँग्रेसचा राजीनामा, हार्दिक पटेल हिंदुत्वाच्या वाटेवर कसे चाललेत..?
- ज्ञानवापी मशिदीचं भवितव्य ठरवणार आहे शंकरराव चव्हाण यांनी आणलेला हा कायदा