जगात आधीच भीतीचं वातावरण असताना, व्हायरसच्या नव्या नावावरुन वाद सुरु झालाय

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगात कोरोना विषाणूनं थैमान घातलंय. आतापर्यंत जगभरातल्या लाखो लोकांचा या विषाणूने जीव घेतलाय. या विषाणूपासून सुटका करण्यासाठी अनेक देशांच्या शास्त्रज्ञांनी कित्येक दिवस संशोधन करून वेगवगेळ्या लसी विकसित केल्या. पण या दरम्यान कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरियंट समोर आले. ज्यामुळे पहिल्या लाटेनंतर पुन्हा दुसऱ्या लाटेचा सामना जगाला करावा लागला.

दरम्यान, लसीकरणाच्या माध्यमांतून जरा कुठे जग सावरत असताना, सगळी परिस्थिती पूर्व पदावर येत असताना, आता कोरोनाच्या नवीन प्रकाराने डोकंवर काढलंय. ज्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले असून तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. पण एकीकडे भीतीचे वातावरण असताना या व्हेरियंटच्या  नावावरून नवाच वाद सुरु झालाय.

तर झालं असं की, WHO ने दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराला ‘OMICRON’ असे नाव दिले आहे. पण या नावावरून अनेकांनी आक्षेप घेतलाय. असे म्हटले जात आहे की, कोरोनाच्या सर्व प्रकारांना ग्रीक वर्णमालेनुसार नाव देण्यात आले आहे, परंतु ओमिक्रोन हे नाव ठेवण्यासाठी ग्रीक वर्णमालेचा क्रम तोडण्यात आला.

याआधी सापडलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांना अल्फा तसेच डेल्टा अशी ग्रीक वर्णमालेच्या क्रमानुसार नावं देण्यात आली होती. त्यानुसार जर योग्य क्रम पाळला गेला तर, कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव Nu  किंवा नंतर Xi असायला हवे होते, परंतु या दोघांना सोडून WHO ने Omicron हे नाव निवडले. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी यावर आक्षेप घेतलाय.

एवढंच नाही तर वाद असाही आहे कि, WHO ने मुद्दाम या नावाचा वापर केलाय. कारण वर्णक्रमानुसार वगळलेल्या नावांमध्ये Xi चा देखील समावेश आहे. जे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नावासारखे आहे. त्यातच कोरोना महामारीच्या काळात WHO वर चीनबाबत उदारता दाखवल्याचा आरोप करण्यात आला  होता.  

असे मानले जात होते की, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे नाव Nu असेल, परंतु Nu हा शब्द New या शब्दाशी मिळता – जुळत असल्याने त्याचा वापर करण्यात आला नाही असे सांगितले जात आहे.  त्याच वेळी, Nu नंतरचे नाव Xi असायला हवे होते, परंतु चीनच्या अध्यक्षांच्या नावामुळे ते देखील वापरले गेले नाही.

ब्रिटनच्या एका वृत्तपत्रात जागतिक आरोग्य सुरक्षा आणि मोहिमेचे संपादक पॉल नुची यांनी WHO च्या स्त्रोतांचा हवाला देऊन दावा केला आहे की, Nu आणि Xi यांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आली आहेत.  त्यांनी ट्विट केले की, “डब्ल्यूएचओच्या एका स्रोताने पुष्टी केली की Nu आणि Xi ही नावे जाणूनबुजून वगळण्यात आली आहेत.  Nu चा उच्चार New सारखाच आहे, तर Xi चा उच्चार चिनी भाषेच्या विशिष्ट प्रदेशाशी संबंधित असल्यामुळे वापरला गेला नाही.”

त्याचवेळी, यूएस सिनेटर टेड क्रुझ यांनी या संपूर्ण प्रकरणावर WHO वर निशाणा साधला.  ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना चिनी कम्युनिस्ट पक्षाला घाबरते. त्यामुळेच  त्यांनी जाणूनबुजून या नावात बदल केला. 

आता नावाचा गोंधळ काही का असेना, कोरोनाच्या या नवीन प्रकाराने सगळ्याच जगाला पुन्हा एकदा घाबरून सोडले आहे. म्हणजे आता कुठे आपण मोकळेपणाने श्वास घेत होतो, काही देशांनी तर मास्क पासून सुटका देखील केली होती. पण आता पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची वेळ या देशांवर आली आहे.

दरम्यान, भारतात केंद्र सरकार आधीच पावले उचलण्याच्या तयारीत आहे. अनेक देशांनी कोरोनाचा हा व्हेरियंट सापडलेल्या देशांशी विमान वाहतूक  बंद केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते का काय अशी भीती निर्माण झाली आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.