ओमिक्रॉनचं टेन्शन काय संपेना त्यात आता फ्रान्समध्ये नवीन व्हेरिएंट घावलाय

करोनाची साथ येऊन आता दोन वर्ष होत आलेत. आज जाईल उद्या जाईल अशी वाट आपण बघतोय पण हा भाऊ काई जायचं नाव घेईना. प्रत्येक वेळी एक नवीन अवतार घेऊन भाऊ पुन्हा हजर. आता असाच एक नवीन व्हेरिएंट सापडलाय फ्रान्समध्ये. ओमिक्रॉन व्हेरिएंट आधीच धिंगाणा घालत असताना हा व्हेरिएंट सापडलाय. पण लगेच घाबरून जाऊ नका एकदा नवीन व्हेरिएंट आला का त्याबद्दल तुम्हाला माहित असावं म्हणून त्याची माहिती देणं आमचं काम. पुन्हा त्यावर मग WHO काय म्हणतंय ,हा व्हेरिएंट धोकादायक आहे की नाही हे ही आम्ही सांगूच.

तर कोविडचा नवीन व्हेरिएंट फ्रांसमध्ये सापडलाय. 

एका रुग्णाचे सॅम्पल तापसतना  फ्रेंच शास्त्रज्ञांना कोरोनाचं नवीन प्रकार सापडला आहे. हा व्हेरिएंट मध्य आफ्रिकेतील कॅमेरून देशातून आल्याचं फ्रांसचं म्हणणं आहे. फ्रेंच शास्त्रज्ञां त्याचं तात्पुरतं नाव IHU असं ठेवलं आहे. अभ्यासानुसार, या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण लसीकरण झालेला होता.

हा पहिला रुग्ण कॅमेरूनच्या सहलीवरून फ्रान्सला परतला होता. ट्रीपवरून मजा मारून परतल्यांनंतर भाऊंना तीन दिवसांनी त्यांना श्वसनाचा हलका त्रास होऊ लागला. मग नोव्हेंबरच्या मध्यात त्याचे नमुने घेण्यात आले होते. पण जेव्हा त्याचे नमुने चेक केले जात होते तेव्हा डॉक्टरांना धक्काच बसला. त्यांना दिसून आले की संसर्गास कारणीभूत असलेला हा विषाणू त्या वेळी डेल्टा प्रकाराच्या पॅटर्नशी जुळत नाही. मग त्याचे सॅम्पल ओमिक्रॉन प्रकाराशीही जुळले नाहीत. 

शेवटी डॉक्टरांना त्याला नवीन IHU व्हेरिएंट म्हणावं लागलंय.

शास्त्रज्ञांच्या मते, या प्रकाराने फ्रान्समध्ये १२ लोकांना संसर्ग झाला आहे. या प्रकारात ४६ म्युटेशन्स आणि ३७ डिलिशन्स आढळले आहेत. दक्षिण फ्रान्समधील एकाच ठिकाणी राहणाऱ्या १२ कोरोना रुग्णांचे नमुने म्युटेशन्सच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये एकाच व्हेरिएंटचे पॅटर्न सापडले आहे. फ्रेंच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार व्हेरिएंट भविष्यात कसा वागेल हे आत्ताच सांगता येणार नाही.

आता WHO काय म्हणतंय ते बघू ?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप IHU व्हेरिएंट म्हणजेच B.1.640.2 ला लेबल दिलेले नाही. हा आजार किती प्राणघातक आहे, हे ही अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. 

एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगल-डिंग यांनी म्हटले आहे की नवीन रूपे येत राहतात परंतु याचा अर्थ असा नाही की ते अधिक धोकादायक असतील. 

म्हणजे सध्या तरी अस म्हणता येत की लगेच घाबरून जाण्याची गरज नाहीए.

भारतात सध्या तरी ओमिक्रॉन वेगानं पसरतोय. डेल्टा आणि डेल्टा प्लस पेक्षा हा कमी धोकादायक असल्याचं सांगितलं जात असलं तरी याचा प्रसार मात्र वेगानं होतोय.आरोग्य मंत्रालयाच्या माहिती नुसार सध्या ओमिक्रॉनच्या भारतात १८९२ केसेस झाल्यात. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक ५६८ आणि ३८२ केसेस आहेत. पण त्याचबरोबर ओमिक्रॉनच्या १८९२ रुग्णांपैकी 766 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं कोविड नियमांचं पालन करा मग किती ही व्हॅरिएंट येऊ द्या आपण त्याच्याशी फाईट करूच.

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.