नियम पाळा भिडू लोक, पेट्रोल पाठोपाठ आता ट्रॅफिकचा दंड देखील भडकलाय

आज रविवार, सुट्टी असल म्हणून तुम्ही निवांत बसला असाल. पण आमचं गणित वेगळं असतंय, आम्हाला रविवारी पण ऑफिस गाठावं लागतंय. फक्त टाईम जरा पुढं मागं झाला तर चालतंय. सकाळी उठल्यावर फोन बघितला, ते एक ‘गुलाबी’ मेसेज आला होता. छान गुलाबी थंडी त्यात मेसेज आलाय म्हणल्यावर सकाळ कशी एकदम प्रसन्न झाली.

आता पुण्यात कसं असतंय, रविवारी मिसळ खाल्ली, की तुम्ही पुणेकर ठरता. आता मिसळचे इथं अनेक प्रकार आहेत, पण तो काय सांगायचा मुद्दा नाही. गुलाबी मेसेज जिकडून आला, तिकडंच ‘मिसळ कुठे खायची हे तूच ठरवशील का?’ असा सिम्पल मेसेज टाकून आवरायला घेतलं. भेट होणार हे पक्कं होतं, त्यामुळं मिसळ काय वरणपुरीही खाल्ली असती.

रविवारी तसं टी-शर्ट आणि जीन्स घालून ऑफिसला आलो, तरी चालत असतंय. पण आजचा रविवार गुलाबी मेसेजवाला होता, त्यामुळं एकदम कडक आवरलं. जॅकेट, परफ्युम, शूज सगळं एकदम टापटिप. रोज काय तेल आणि पाणी मिक्स करुन डोक्यावरुन हात फिरवला की होत असतंय, पण आज केसांना हेअरस्प्रे मारलेला, त्यामुळं हेल्मेट-बिल्मेटचे लाड केले नाहीत.

एका शार्प टर्नला गाडी वळवली आणि थोडं रिलॅक्स झालो, तेवढ्यात कानावर आवाज पडला.. ‘ए हिरो गाडी साईडला घे.’ गुलाबी स्वप्नांच्यामध्येच पोलिस मामांची एन्ट्री झाली आणि कळलं आपली लागलीये. मामा वाट सोडायच्या मूडमध्ये नव्हते, त्यामुळं टेन्शन वाढलंच होतं.

मामांनी चावी काढायच्या आत चावी खिशात टाकली. मग पोलिस मामा पडलेल्या थोबाडाकडं बघून गोड हसले. पहिला प्रश्न आला, ‘लायसन्स बघू.’ आता भेटायला जायचं म्हणून नवी कोरी पॅन्ट घातलेली आणि लायसन्स होतं कालच्याच पॅन्टमध्ये. मामा आता दुसऱ्यांदा गोड हसले.

‘जाऊ द्या ना साहेब,’ म्हणल्यावर मामांनी एकदा पार केसापासून पायापर्यंत नजरेचा स्कॅनर मारला. असं वाटलं की जाऊ देतील. पण दुसरा प्रश्न आला, ‘हेल्मेट कुठंय?’ आता फिक्स कळालं की मामा आपल्याला सोडत नसतायत.

मनातल्या मनात ठरवलं की, लायसन्सचे पाचशे आणि हेल्मेटचे पाचशे असे हजार देऊ आणि कल्टी मारू. ‘साहेब किती दंड झाला सांगा, भरतो,’ असं विचारलं. मामा तिसऱ्यांदा हसले आणि म्हणाले ‘सहा हजार.’

आता सहा हजार म्हणल्यावर फ्युजा उडाल्या. ‘साहेब इमानदारीत सांगतो, जुनी एकपण पावती नाय गाडीवर.’ मग त्यांनी सांगितलं, ‘अरे बाबा ही आजचीच पावती आहे. हेल्मेटचे हजार आणि लायसन्स नाही त्याचे पाच हजार.’ आता एवढी डेंजर पावती कशी काय झाली हे विचारल्यावर मामांनी संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं. ते ऐकल्यावर गुमान सहा हजाराची पावती पडू दिली, आणि निघालो.

आता सहा हजार गेलेत, तर म्हणलं मामांनी सांगितलेला संदर्भ आणि स्पष्टीकरण तुम्हालाही सांगावं.

संदर्भ काय आहे?

तर राज्यात मोटार वाहन कायदा २०१९ मध्ये बदल करण्यात आले असून दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. काही ठराविक नियमांचं उल्लंघन केल्यास लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द होणार आहे. या बदलांची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून पूर्ण राज्यात करण्यात आली आहे.

आता स्पष्टीकरण देतो…

या आधी लायसन्स नसताना गाडी चालवताना घावलात की, ५०० रुपयांची पावती होती आता ती झालिये ५००० रुपये फक्त. लायसन्स रद्द झालेलं असताना गाडी चालवली, तर दंड होता ५००, जो आता झालाय डायरेक्ट १० हजार. गाडी चालवताना फोनवर बोलताना दिसलात, तर पाच हजारापर्यंत चंदन लागू शकतं. सीटबेल्ट नसल्यावर आणि ट्रिपलसीट बसल्यावर आधी दोनशे द्यावे लागायचे, तिकडं पाचशेच्या दोन नोटा जाणार. हेल्मेट नसेल किंवा गाडीला उगाच मोठा हॉर्न असेल, तर पाचशेच्या ऐवजी पावती होणार हजार रुपयांची. थोडक्यात काय, तर चुकीत घावलात तर मजबूत दंड बसणार हे फिक्स.

या सगळ्यात गुलाबी मेसेज आणि मिसळ राहिलीच. तर त्याचं असं झालं की, जायला उशिर झाला त्यामुळं गुलाबी मेसेज पाठवणारी व्यक्ती चिडून घरी गेली होती. मग काय, सहा हजार जाणार याच्या दुःखात एकट्यानी मिसळ खावी लागली…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.