मुंबईच्या हनुमान थिएटरमधून आमदार- खासदारांना उचलून बाहेर काढावं लागायचं

मुंबईच्या गिरणी कामगारांनी लगबगलेला भाग म्हणजे गिरणगाव. या गावाचा दिवस गिरणीच्या भोंग्यावर चालायचा. गावाकडं कुटूंब सोडून पोटापाण्यासाठी जीवाची मुंबई करायला आलेले अनेकजण येथे राहायचे. दिवसभर राबल्यावर संध्याकाळी त्यांचे पाय आपसूक वळायचे ते लालबागच्या हनुमान थिएटरकडे.

ढोलकीवर कडाडलेली थाप गिरणीच्या भोंग्या पेक्षा जास्त उत्साह आणायची. हनुमान थिएटरची लावणी म्हणजे श्रमाचा उतारा असायचा.

हे थिएटर सुरू केलं पुण्याच्या जुन्नरवरून आलेल्या नेराळे यांनी.

स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट. लालबाग अजून थोडंफार जंगल होतं. पांडुरंग नेराळे यांचा भाजीपाल्याचा बिझनेस होता. भायखळ्याहुन भाजी आणायची आणि ती दिवसभर लालबागच्या रस्त्यावर बसून विकायची. यावर म्हणावं तेवढा फायदा त्याकाळी नव्हता.

या नेराळे यांचा एक मित्र राघू माळी गिरणीत होता. दोघे एकदा तमाशा पाहायला गेले होते. माळी तमाशा बघून एवढे भारावून गेले की त्यांनी नेराळे यांना आपणही थिएटर सुरू करू म्हणून गळ घातली.

त्या दोघांनी ठरवलं की आपला दिवसभराचा व्यवसाय, धंदा सांभाळून रात्री हा उद्योग सुरू करायचा.

नेराळे यांनी गावाकडे खूपदा लावणी तमाशे पाहिले होते. फक्त एवढ्याच अनुभवावर या दोन्ही मित्रांनी धाडस करायचं ठरवलं.

यातूनच सुरु झालं न्यू हनुमान थिएटर.

जागा नव्हती, पैसे नव्हते. फक्त या कलेविषयी ओरम होत. त्यातून सुरवातीला कापडाचा तंबू उभारून हनुमान थिएटरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

गावोगावीच्या जत्रांमध्ये फिरून नेराळे यांनी अस्सल तमाशा पार्टी गाठली, त्यांना सुपारी देऊन मुंबईला बोलावून घेतले.

नेराळे यांच्यामुळेच मुंबईकराना विठाबाई नगरकर यांच्या पासून ते काळूबाळू यांच्या पर्यंत अनेकांचे फड, महाराष्ट्राच्या मातीतली खरी लावणी अनुभवता आली.

अगदी काही दिवसातच हनुमान थिएटर लालबाग ते गिरणगाव सगळीकडे फेमस झालं. तरीही पक्क विटांचं आणि बंदिस्त थिएटर उभारायला १९५२-५३ साल उजाडलं.

सगळं अगदी व्यवस्थित सुरू होत आणि अचानक पांडुरंग नेराळे यांचे निधन झाले. राघू माळी यांनी व्यवसायातून अंग काढून घेतले. काही वर्षे थिएटर बंदच पडले. नेराळे यांच्या नातेवाईकांनी थिएटर काढून घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या मध्यस्तीतुन पांडुरंग नेराळे यांचे सुपुत्र मधुकर नेराळे यांच्याकडे हे थिएटर आले.

वयाच्या अठराव्या वर्षी मधुकरशेठ यांनी ही जबाबदारी व हा वारसा पुढे नेला.

फक्त तमाशा बारीच नाही तर ढोलकीच्या बारी देखील रात्रभर रंगायच्या. दिवाळी आणि होळी या मुंबईतील तमाशा सीझन काळात राज्यातील सर्वच नामांकित ढोलकी फडांचा मुक्काम सलग आठ-दहा दिवस मुंबईत असायचा. दौलतजादा व्हायचा.

सगळ्या करमणुकीच्या गोष्टींचं कामगारांचा आयुष्यात मोठं स्थान होतं. दिवसभर साच्यावर काम करून श्रमलेला मजूर श्रमाचे परिहार करण्यासाठी हनुमान थिएटरकडे वळायचा.

घुंगराची नजाकत आणि ढोलकी ऐकावी तर हनुमान थिएटरमध्ये अशीच ख्याती मुंबईमध्ये पसरली होती.

फक्त कामगारच नाही तर दादर सारख्या भागात राहणारा पांढरपेशा समाज देखील रात्रीच्या अंधारात आपला तणावाचा उतारा हलका करण्यासाठी हनुमान थिएटरकडे हमखास यायचा.

याहून गंमतीची गोष्ट म्हणजे मुंबईत विधानभवनात अधिवेशन सुरू झालं की महाराष्ट्राच्याआमदार-मंत्र्यांनाही हा उतारा लागायचा.

त्यामुळे अधिवेशन संपलं की संध्याकाळी यासा‍ऱ्यांचे पाय आपसूक हनुमान थिएटरकडे वळायचे. तेही रात्ररात्रभर जागूनतमाशा-लावण्या बघायचे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेले आमदार मंत्री हनुमान थिएटर गाजवायचे, दौलतजादा करायचे. खास लावणी सुरू झाली की वन्स मोरच्या मागणीने थिएटर निनादून जायचे. अगदी पहाटे पर्यंत रंगलेल्या मैफिली आजही अनेकांना आठवतात.

मधुकरशेठ नेराळे त्यावेळची एका खासदाराची गंमत सांगतात ,

वेळ संपली, संगीतबा‍ऱ्यांनी आटपतं घेतलं तरी हे महाशय काही हलायला तयार नव्हते. त्यांचंआपलं ‘अजून-अजून’ सुरूच होतं. शेवटी मीही त्यांना समजावलं. पण त्यावर ‘मीखासदार आहे’, असा रुबाब ते झाडू लागले. शेवटी सगळं काही सांगण्याच्यापलीकडे गेल्यावर मी अलगद त्यांची गठडी उचलली आणि त्यांना थिएटरच्या बाहेर नेऊन ठेवलं.”

जवळपास चाळीस वर्ष हनुमान थिएटर मुंबईच्या सर्व वर्गातील जनतेचं मनोरंजन करण्याचं काम हनुमान थिएटरने केलं मात्र हे करताना कलाकारांचा आब, प्रतिष्ठा जपली. तमाशा कला-कलावंत विकास मंदिर आणि मराठी लोककला मंच या संस्थांचे कार्यालय याच वास्तूत होते.

१९६९ मध्ये मधुकर नेराळे यांनी जसराज थिएटर ही संस्था स्थापन करुन तिच्या मार्फत ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून किर्तन वरुन तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र’, ‘काजळी’ या सारख्या वगनाटयांचे सादरीकरण केले. मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले.

एक काळ अख्खी मुंबई गाजवणारे तमाशाचे एकमेव थिएटर अखेर १९९४ साली बंद झाले.

मधुकर शेठ यांनी मराठी मातीची लुप्त होत चाललेली कला जपण्याचा जीवापाड प्रयत्न केला. महाराष्ट्रातल्या शाहिरांना संघटित करून तमाशा कलावंताची शिबीरं घेतली. गिरणी कामगारांच्या प्रश्र्नावर सुरू झालेल्या संघर्ष कार्यक्रमात देखील सहभाग नोंदवला.

aurangabad 301117 pg4 s1

२०१७ साली त्यांना राज्यशासनाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

लालबागच्या चिवडा गल्लीत हनुमान थिएटरच्या जागी आता न्यू हनुमान मंगलकार्यालय उभं राहिलं आहे.

एकेकाळी ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या, घुंगराच्या नादावर रसिक मायबापाला वेडं करणाऱ्या या लोककलेच्या माहेरघरात आता लगीनसराईत सनई चौघड्याचे आवाज ऐकायला मिळतात. कामगारापासून ते मंत्र्यापर्यंत प्रत्येकाला रात्र रात्र जागायला लावणारं हनुमान थिएटर आता फक्त जुन्या पिढीच्या आठवणीत उरलंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.