रक्त दानाएवढंच श्रेष्ठ दान आहे स्तनदा मातांचं दुग्धदान
हिंदीत दूध का कर्ज आणि मराठीत दुधाचे उपकार हा जॉकी श्रॉफचा पिक्चर दूरदर्शनवर तुम्ही पाहिला असेलच. नवऱ्याच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी जॅकी श्रॉफची आई म्हणजे अरुणा इराणी एका सापाला पाळते. आपल्या पोराच्या बरोबरीने त्याला सांभाळते ,त्याला दूध पाजते. मात्र त्यांनतर तिला सापाचा सांभाळ करणं शक्य होत नाही म्हणून ती त्याला सोडून देते. पण हा साप त्याच्यावर असलेले ‘दुधाचे उपकार’ विसरत नाही. आणि मग जॉकी श्रॉफला त्याच्या वडिलांचा बदला घेण्यास मदत करतो. आता स्टोरीवर हसायला येतं पण तेव्हा सापाचे उपकार फेडताणा बघून डोळं पाणावले होते.
आता सापाला माणसाचं दूध कसं चालेल, साप इतक्या दिवस कसा जगला हे तुम्हाला पण प्रश्न पडणारच असणार पण त्यापेक्षाही जास्त दुधाचे किती उपकार आहेत हे सांगायला मी इथं आलोय.
आजही अनेक बालकं अशी आहेत त्यांना या दुधाच्या उपकारांची गरज आहे.
ज्या अर्भकांचा प्रिमॅच्युयर जन्म झालाय, ज्यांची माता त्यांना जन्माच्या वेळीच सोडून केलीय, किंवा मेडिकल प्रॉब्लेम्समुळे ज्या मातांना स्तनपान करणं शक्य होत नाही अशांना या दुग्धरूपी अमृताची नितांत गरज असते. मात्र अशावेळी जर पर्यायी दुधाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या स्तनदा मातेची सोया झाली नाही तर अशा बाळांना वरचं दूध द्यावं लागतंय. हे दूध अनेक बाळांना पचत पण नाही तर अनेकांना आयुष्यभर याचे परिणाम सहन करावे लागतात.
आणि इथंच मदतीला धावून येते मानवी दुग्धबँकेची भन्नाट संकल्पना. तर एकदा बघू तरी ही संकल्पना कशी काम करते.
मानवी दुधाच्या बँकेसाठीचे दाते हे या रुग्णालयातील किंवा रुग्णालयाबाहेरील स्तनदा माता असू शकतात. दूध हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये जमा केलं जातं.
दुग्धदान करणा-या आईला एचआयव्ही.कावीळ बी, सी, व सिफिलिस नसल्याची तपासणी करून खातरजमा केली जाते.
मग या दुधाचं पाश्चरायझेशन केले जातं. त्यानंतर हे दूध ४डिग्री सेल्सियसवर 3 दिवसांपर्यंत व 20 डिग्री सेल्सियसवर 12 तासांसाठी साठवून ठेवले जात. मग जशी गरज पडेल तसे हे दूध गरजू नवजात शिशूंना दिले जाते.
मिल्क बँकेत साठवलेले दूध तीन प्रकारचे असू शकते.
बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चार-पाच दिवसांत आईकडून मिळालेल्या दुधाला ‘कॉलोस्ट्रम’ म्हणतात. सहसा हे दूध डायरिया, कुपोषण, गंभीर जंतुसंसर्ग व भाजलेल्या बाळासाठी राखून ठेवले जाते. यानंतर पुढील 5 ते 10 दिवसांत जमवलेल्या दुधाला ट्रान्झिशनल मिल्क म्हणतात. यात प्रोटीन जास्त असतं. त्यानंतर जमवलेल्या दुधाला ‘मॅच्युअर मिल्क’ म्हणतात.
बदललेल्या लाइफस्टाईलमुळे विशेषत: मानसिक तणावांमुळे मातांना दूध येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आईला दूध कमी येण्याची समस्या शहरी भागात जास्त आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण स्त्रियांमध्ये जास्त दूध येत असल्यामुळे स्तन कडक होणे, दुखणे अशा समस्या दिसून येतात. म्हणून ब-याचदा स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात.
ह्यूमन मिल्क बँकेच्या माध्यमातून हा असमतोल दूर करून दूध कमी येणा-या व दूध जास्त येणा-या दोन्ही मातांना लाभ होऊ शकतो.
आता अशीच मानवी दुग्धपेढी कोल्हापुरात सुरु होत आहे. यामुळं दक्षिण महाराष्ट्रसह कोकणाला याचा फायदा होणार आहे. दोन वर्षांपासून हा प्रकल्प निधीअभावी रखडला होता. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दोन दिवसांपूर्वी शाहू वैद्यकीय कॉलेजला यांनी भेट दिल्यांनतर त्यांनी निधी अभावी चालू नं झालेल्या या मिल्क बँकेचे काम लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळं आता कोल्हापूर सारखीच प्रत्येक जिल्हयात अगदी रक्त पेढीसारखी दुग्ध पेढी असावी असं मत तज्ज्ञांकडून नोंदवलं जातं.
हे ही वाच भिडू :
- गोंडस बाळ असताना देखील माता पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये का जातात ?
- प्रियांकाताई, निक भाऊजी सरोगसीद्वारे पालक झाले पण सरोगसीचे भारतातले काय नियम आहेत?
- आईच्या स्वप्नासाठी जिने ‘मदर्स डे’ सुरु केला, तिनेच तो बंद करण्याची मोहीम सुरु केली होती