भावानों…! जावा आली रे !!!

जावा आपल्या बापाची गाडी. उतारवयात रिटायर व्हायला आलेल्या बापाचा कॉलेजमधला फोटो चुकून बघायला मिळाला तर लक्षात येत आपला बाप हा जावाभक्त असावा. आईपेक्षा कधीकाळी त्याला जावा आवडलेली असेल. एझडी जावा कंपनीचीच गाडी होती.

काही लोकांना वाटत होतं बुलेट सावकार आहे, अशा वेळी बिघडलेल्या सावकराचं पोरगं जावा वापरायचं. दोन सायलेंसरमधून येणारा पेट्रोलचा वास गल्लीतल्या पोरींना बाहेर पडायला मजबूर करायचा. तेव्हा हॉर्न मारायची गरज पडायचीच नाही. गाडीचं फायरिंगच अस होतं की पाहीजे त्या माना अचूक वेळेत मागं वळायच्या.

तर आज दिनांक १५.११.२०१८ रोजी ठिक सकाळी ११ वाजून ३० मिनटांनी पुन्हा त्या धुराचा इतिहास जन्मला आलाय.

१९६० साली कर्नाटकमधील मैसूर येथून या कंपनीची सुरुवात झाली होती आणि १९६८ सालापासून कंपनीने आपल्या मोटोरसायकलची विक्री सुरू केली होती.

मैसूरचे गव्हर्नर जयचमराजा वडियार यांनी कंपनी सुरू करण्यासाठी रुस्तुम आणि फारूक या इराणी बंधूंना प्रोत्साहित केलं होतं.  त्यातूनच मैसूरमधील यादवगिरी औद्योगिक क्षेत्रातील २५ एकर जमिनीत इराणी बंधूंनी ‘आयडियल जावा इंडिया लिमिटेडची’ सुरुवात केली होती. मैसूरच्या महाराजांनी स्वतः या प्लॅन्टचं उद्घाटन केलं होतं. कंपनीत महाराजांनी एकट्याने जवळपास ५१ लाख रुपये गुंतवले होते.

जवळपास २२०० पगारी कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या या कंपनीला वर्षाकाठी ४२००० मोटोसायकलच्या उत्पादनाचा परवाना मिळाला होता. दिवसाला साधारणतः १३० नवीन बाईकच्या उत्पादनाची कंपनीची क्षमता होती. 

‘फॉरेव्हर बाईक, फॉरेव्हर व्हॅल्यू’

या टॅगलाईनखाली बाजारात आलेल्या या बाईकने आपली टॅगलाईन शब्दशः जपली होती. ७०, ८० आणि ९० च्या दशकात भारतातील बाईकर्समध्ये जिकडे तिकडे फक्त येझदीचाच बोलबाला होता. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटाच्या माध्यमातून ही बाईक मोठ्या पडद्यावर देखील पोहोचली होती.

त्यानंतरच्या काळात मात्र भारत सरकारने सुझुकी, होंडा, यामाहा आणि कावासकी यांसारख्या जपानी कंपन्यांना भारतात मोटोरसायकल निर्मितीचे कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली. सहाजिकच बाजारात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली. जापनीज कंपन्यांनी आपल्या बाईकमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळे प्रयोग केले आणि बाजारात आपले पाय पसरवायला सुरुवात केली. याचा परिणाम एझडीच्या व्यवसायावर झाला आणि ८० चं दशक संपता-संपता येझदीची लोकप्रियता देखील कमी व्हायला लागली आणि शेवटी  १९९६ साली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जावा १९९६ सालीच बंद झाली !!! 

जावाला हॅन्डेल लॉक नव्हतं. तिथं कुलूप लावायला लागायचं. तसच कुलूप कंपनीला लागलं. पण प्रत्येक पिढीत एक माणूस असतोच जो आमच्यासारख्याची काळजी घ्यायला जन्माला आलेला असतो. आनंद महिद्रां यांनी जावा ताब्यात घेतली. महिंद्राचा ब्रॅण्ड न लावता त्यांनी जावा प्रमोट केली. आज जावाचे तिन मॉडेल लॉन्च केलेत. ते करताना देखील जुनं ते सोनं जपण्यात आलं.

नविन गाड्या कशा असणार. 

JAWA – जुनाच कलर जुनीच स्टाईल. 1.64 लाख. 300 CC.

JAWA 42 – १.५५ लाख. ऑन रोड. लूक मॉडर्न. 300 CC.

JAWA Perak –  टिपीकल बॉबर स्टाईल हि गाडी पुढच्या महिन्यादोन महिन्यात रस्त्यावर येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.