सिद्धू-अमरिंदर वादात भाजपला पंजाबमध्ये निवडणुकांच्या तोंडावर नवीन पार्टनर मिळणार?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अलीकडेच घोषित केलं कि मी काँग्रेस सोडणार आहे, पण भाजपमध्ये जाणार नाही. याचा सरळ अर्थ म्हणजे कॅप्टन पंजाबच्या राजकारणात एक नवीन पक्ष घेऊन येणार आहेत. पण कॅप्टन यांच्या याच घोषणेमुळे आता भाजपला पंजाबच्या राजकारणात एक नवा भिडू मिळण्याची शक्यता आहे.

कॅप्टन यांचे राजकीय सल्लागार नरिंदर भांबरी यांनी नुकताच ‘कॅप्टन फॉर 2022’ या नव्या घोषवाक्यासह पोस्टर जारी करून हे संकेत दिले आहेत. त्यामुळे या चर्चानी जोर पकडला आहे.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये मोदी सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांना विरोध करत अकाली दलाच्या नेत्या आणि तत्कालीन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी राजीनामा दिला. मात्र तरीही हे विधेयक मागे न घेतल्याने शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परिणामी २२ वर्षांची मैत्री तुटली.

त्यानंतर भाजपला पंजाबच्या राजकारणात पुन्हा उभं राहण्यासाठी एका नवीन साथीदाराची गरज पडणार हे नक्की होते. आणि ती आयती संधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू-कॅप्टन वादाने मिळवून दिली.

सुरुवातीला जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तेव्हा ते भाजपमध्ये जाणार, देशाचे नवे कृषीमंत्री होणार वगैरे अशा चर्चा सुरु झाली. पण अवघ्या काही तासातच अमरिंदर सिंगांनी या चर्चेतील हवा काढून टाकली. त्यांनी जाहीर केलं कि मी काँग्रेस सोडणार आहे, पण भाजपमध्ये जाणार नाही.

पण कॅप्टन यांनी भाजपमध्ये न जाण्याचं आणि स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचं नेमकं कारण काय असू शकतं?

तर भाजपची ७५ वर्षांची मर्यादा. कॅप्टन यांचं वय सध्या ७९ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अकाली दल सोडून गेल्यानंतर भाजपला सध्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर केंद्राच्या ऐवजी पंजाबमध्ये एखाद्या पक्षाची मोठ्या नेत्याची किंवा पक्षाची गरज असल्याचं दिसून येते. आणि कॅप्टन पंजाबमध्ये भाजपच्या बाहेर राहून भाजपला मदत करू शकतात.

याच सगळ्याचा सुवर्णमध्य म्हणून कदाचित भाजपशी चर्चा करून नवीन पक्ष स्थापन करणं आणि काँग्रेसची मत खाणं अशी रणनीती कॅप्टन यांची असू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते या रणनीतीमध्ये फायदा भाजप आणि कॅप्टन या दोघांचा आहे. कारण पंजाबमध्ये कॅप्टन यांची स्वतःची अशी वेगळी वोट बँक आहे. 

CSDS चे संचालक आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांच्या मते, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ताकद बघितली तर ते काँग्रेसच्या ४ ते ५ टक्के मत खाऊ शकतात. ते ६ टक्के मत पंजाबच्या राजकारणात सहज मिळवू शकतात.

आता भाजपची आपण पंजाबमधील ताकद बघितली तर ती देखील तुलनेने कमीच आहे. मागच्या २ निवडणुकांमध्ये म्हणजे २०१७ साली भाजपच्या मतांची टक्केवारी होती ५.४ टक्के आणि २०१२ साली ७.१८ टक्के होती. म्हणजे या दोघांची मत एकत्र आली तर ती १५ टक्क्याच्या आसपास पोहोचू शकते. जो काँग्रेस आणि अकाली दलाला फटका बसू शकतो.

कॅप्टन यांच्या मार्फत भाजप शेतकऱ्यांची नाराजी दूर करू शकतो?

सध्या दिल्लीच्या सीमांवर बसलेले पंजाब-हरियाणामधील शेतकरी भाजपवर बरेच नाराज आहेत. जर सध्यस्थितीमध्ये भाजपचा कोणताही नेता या शेतकऱ्यांकडे प्रस्ताव घेऊन गेला तर त्यावर कुठे तरी मागच्या चर्चेचा परिणाम जाणवणार हे नक्की.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे कि, आमचा फक्त आमच्या मागण्यांशी संबंध आहे. जे कोणी या कृषी कायद्यानं मागे घेण्याचा आणि हमीभाव पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव घेऊन येतील त्यांच्याशीच आम्ही चर्चा करणार आहोत.

त्यामुळेच साहजिकच भाजपचा कोणताही नेता या शेतकऱ्यांजवळ प्रस्ताव घेऊन गेला, तर शेतकरी त्यांच्याशी कितपत व्यवस्थित चर्चा करणार हा प्रश्नच आहे. पण जर स्वतंत्र पद्धतीने एखादा प्रस्ताव घेऊन गेले तर काही तरी तडजोड होऊन बोलणी पुढे सरकू शकते.

पंजाबमध्ये शेतकरी अत्यंत ताकदवान आहेत. तिथं बाजार समित्या या राजकारणाचं केंद्रबिंदू समजल्या जातात. त्यामुळेच कॅप्टन भाजपमध्ये राहून ज्या गोष्टी करू शकत नाहीत त्या गोष्टी ते वेगळे राहून करू शकतात. त्यामुळे देखील कॅप्टन यांच्या वेगळ्या पक्षाचा फायदा होऊ शकतो.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.