जगात कोणाला जमलं नसेल असा डिसिजन न्यूझीलंडने घेतलाय, “सिगरेट बंदी “

सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरस टू हेल्थ असं म्हणतात. असं तुम्ही आम्ही म्हणतोय, जाहिरातला मुकेश म्हणतोय, खुद्द सिगरेट कंपनीवाले म्हणतात. पण सिगरेट वर बंदी कधी कोण आणत नाही. नाही म्हणायला आपल्याकडे पब्लिक प्लेसला सिगरेट ओढण्याला बंदी आहे पण तिचा परिणाम किती होतो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

आपल्याकडे गांजा बंदी आहे. राग आला तर दारूची उभी बाटली उभी केली जाते. गुटखाबंदी आणली जाते. गुजरात सारखं राज्य तर दारू बंदी पाठोपाठ नॉन व्हेज बंदी सारखी पावले उचलतो म्हणतं. पण दारू पेक्षा जास्त घातक असणाऱ्या सिगरेट वर सरसकट बंदी आणायचं कोणी मनात देखील आणत नाही.

एक देश आहे ज्याने हा विषय मनावर घ्यायचं ठरवलं.

न्यूझीलंड

काळ्या कपड्यात क्रिकेट खेळणाऱ्याचा देश.गेल्या काही दिवसात या देशाचे शत्रू आपल्यात खूप वाढलेत. २०१९ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारत हरला तेव्हा समोर न्यूझीलंडचा संघ होता, जगभरातली मैदानं मारून भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली आणि तिथंही न्यूझीलंडनंच आपल्या पराभवाचं पाणी पाजलं. या दोन दुःखातून सावरलो नव्हतो, तेवढ्यात टी२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल गाठण्याचं भारताचं स्वप्नही न्यूझीलंडनंच मोडलं.

सलमानला कॅटरिना ऐश्वर्या संगीता बिजलानी अशा कित्येक गर्लफ्रेंड्सनी मिळून जो दर्द दिला त्याच्या पेक्षाही जास्त दर्द भारताला न्यूझीलंडने दिले.

तस बघायला गेलं तर बेटांवर राहणारे लोक चिल असतात असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाचा शेजारी असल्यामुळे न्यूझीलंड सुद्धा चिलॅक्स लोकांचा देश आहे. ऑस्ट्रेलिया प्रमाणे बुटातून दारू पिण्याऐवढा नाही पण सोवळं ओवळं व्हेज नॉन व्हेज दारू नको असं त्यांचं काही नाही. तरी त्यांनी देशाला नो स्मोइंग झोन बनवायचं का ठरवलंय आधी बघू.

तर विषय असा आहे की न्यूझीलंडची लोकसंख्या आहे इनमीन ५० लाख. त्यातले पण जवळपास दहा टक्के म्हणजे पाच लाख लोक धूम्रपान करतात. एवढंच नाही तर दर वर्षी जवळपास साडे चार हजार जणांचा तिथं सिगरेट स्मोकिंग मुळे मृत्यू होतो. विशेषतः लहान मुलांमध्ये या सिगरेट स्मोकिंगचं प्रमाण वाढताना दिसत होतं. 

न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते तिथं चारपैकी एका व्यक्तीला कर्करोग होत आहे.

अशात काय झालं तर २०१७ साली लेबर पार्टीच्या जॅसिंडा अर्डर्न पंतप्रधान बनल्या. आता नाही म्हणलं तरी बाई माणूस. भावी पिढ्यांच्या धुम्रपानाबद्दल त्यांना काळजी वाटणे साहजिक आहे. गेली चार वर्षे अनेक बोल्ड डिसिजन घेऊन त्यांनी आपली निर्णयक्षमता दाखवून दिली आहेच. यावेळी त्यांनी सिगरेटचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं.

तस बघितलं तर गेल्या दोन वर्षांपासून याची चर्चा सुरु होती. जॅसिंडा यांच्या मदतीला धावून आल्या देशाच्या सह आरोग्यमंत्री डॉ. आयेशा वेरल. त्यांनी टार्गेट ठेवलं २०२५ पर्यंत देशाला धुम्रपान मुक्त करायच.

त्यासाठी २०२२ मध्ये १८ वर्षांहून कमी वयाच्या तरुणांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई करण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आला. 

नंतर असं नव्हतं कि या प्रस्तावाला विरोध झाला नाही. न्यूझीलंडच्या उजव्या विचारसरणीचा पक्ष ACTने म्हटले की, निकोटीन कमी केल्याने सिगारेटच्या विक्रीत वाढ होईल. त्याशिवाय काळाबाजारही होण्याची शक्यता आहे. लहान दुकानदारांना याचे नुकसान सहन करावे लागू शकते.

धु्म्रपानामुळे कर्करोग झाल्याने मृत्यू ओढावलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांनी नंतर या प्रस्तावित बंदीला पाठिंबा दर्शवला होता. बंदी आणि कठोर पावले उचलल्यास तंबाखूचा वापर देशात संपुष्टात येऊ शकतो असेही त्यांनी म्हटले.

अखेर काल हा निर्णय जाहीर करण्यात आला. आता २००८ सालानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थाची खरेदी करता येणार नाही. लवकरच न्यूझीलंडमध्ये याबाबत कायदा लागू होणार आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी धुम्रपानावरील कारवाईबाबत काही नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार तरूणांनी कधीही धूम्रपान करू नये असे मंत्री वेरल यांनी म्हटले आहे.

आमच्या इथं एक भिडू आहे. दररोज म्हणतंय आज सिगरेट सोडणार आहे. पण त्याला सिग्रेट मारल्याशिवाय स्टोरी सुचत नाही म्हणतंय. असे प्रॉब्लेम पूर्वापार चालत आलेत. आमच्या आजोबांना सुद्धा सकाळच्या पारी बिडी शिवाय प्रेशर येत नव्हतं. असे प्रॉब्लेम न्यूझीलंडच्या जनतेला सतावतील त्यांच्या चार स्टोरी कमी होतील पण पुढच्या पिढ्या मात्र हेल्थी जगातील हे नक्की

हे हि वाच भिडू. 

 

English Summary: New Zealand plans to ban young people from ever buying cigarettes in their lifetime in one of the world’s toughest crackdowns on the tobacco industry, arguing that other efforts to extinguish smoking were taking too long.

Webtitle: New Zealand To Ban Cigarette Sales For Future Generations

Leave A Reply

Your email address will not be published.