न्युझीलंडच्या महिला संघाने विश्वविक्रमी धावसंख्या उभारत इतिहास घडवलाय…!!!

 

शानदार…जबरदस्त..जिंदाबाद…!!!

असंच काहीसं चित्र काल आयर्लंडमधील डब्लीनच्या मैदानावर बघावयास मिळालं. न्युझीलंडच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत क्रिकेटजगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आयर्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने यजमान संघाविरुद्धच्या आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ बाद ४९० धावांचा डोंगर उभारताना इतिहास घडवलाय. या धावसंख्येसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विश्वविक्रम त्यांनी आपल्या नावे केलाय.

काय आहे यापूर्वीचा विश्वविक्रम…?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही पुरुष किंवा महिला संघाने उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा उभारण्याचा विश्वविक्रम देखील किविज महिला संघाच्याच नावे होता. २१ वर्षांपूर्वी १९९७ मध्ये न्यूझीलंडच्या महिला संघाने ख्राईस्टचर्चच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत ५ बाद ४५५ रन्स उभारले होते. किविज संघाने हा आपलाच विश्वविक्रम इतिहासजमा करताना नवीन इतिहास घडवलाय. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडच्या संघाने ऑगस्ट २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नॉटिंगहमच्या मैदानावर ३ गडी गमावून ४४४ रन्स ठोकले होते.

एक नजर कालच्या सामन्यावर

न्यूझीलंडची कॅप्टन सुझी बेट्स हिने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय किती योग्य आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी देखील तिने स्वतःच स्वीकारली आणि आपली ओपनर जोडीदार जे.एम. वॅटकिन सोबत १९ ओव्हर्समध्येच १७२ रन्सची सलामी दिली. वॅटकिन बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मॅडी ग्रीन हीने देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेत चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. तोपर्यंत सुझी बेट्स आपली धमाकेदार इनिंग सकारात होतीच. तिसाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ९४ बॉल्समधील १५१ धावांची सुझी बेट्सची ही इनिंग संपुष्टात येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या स्कोअर बोर्डवर २८८ रन्स लागल्या होत्या.

जेव्हा आफ्रिकन संघाने ४३४ रन्स चेस करून इतिहास घडवला होता …!!!

त्यानंतर आलेली सटर्थवेट स्वस्तात परतली. मात्र ए.सी. केरने  ४५ बॉल्समध्ये ३ सिक्सर्ससह साकारलेली ८१ रन्सची इनिंग आणि मॅडी ग्रीनच्या ७७ बॉल्समधील १२१ धावांच्या झंझावाती शतकाच्या जीवावर न्यूझीलंडचा संघ ५०० रन्सच्या उंबरठ्यावर पोहोचला, मात्र त्यांना हा टप्पा ओलांडता आला नाही. निर्धारित ५० ओव्हर्समध्ये संघाला ४ बाद ४९० पर्यंत पोहोचता आलं. किविज संघाच्या या वादळाचा सर्वात जास्त तडाखा आयर्लंडच्या कॅरा मरे हीला बसला. तिच्या १० ओव्हर्समध्ये किविज संघाने ११९ रन्सची लयलूट केली. हा देखील एक विश्वविक्रम ठरला. पुरुष आणि महिला अशा दोन्ही क्रिकेटमधील १० ओव्हर्समध्ये सर्वाधिक मार खाण्याचा नकोसा विश्वविक्रम तीच्या नावे जमा झालाय. या आधी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १० ओव्हर्समध्ये ११३ रन्स दिले होते.

दरम्यान या डोंगराएवढ्या धावसंख्येचा प्रतिकार करण्यासाठी उतरलेल्या आयरिश संघाने न्यूझीलंडसमोर सपशेल शरणागती पत्कारली आणि त्यांचा संघ ३६ ओव्हर्समध्ये १४४ रन्सवर ऑल आउट झाला. न्युझीलंडच्या संघाने ३४६ रन्सने मोठा विजय मिळवला.

भारतीय क्रिकेटमधील ‘राज कपूर’, ज्याने संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून दिला..!!!

Leave A Reply

Your email address will not be published.