मराठवाड्याच्या या भागात ठाकरे-फडणवीस-पवार यांच्या पेक्षा KCR पॉप्युलर आहे

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (KCR) हे राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे  KCR आता त्यांचे सर्वात मोठे विरोधक झाले आहेत.

सध्या देशात विरोधी पक्ष मोदी विरोधात एकजूट करत आहेत. त्यात KCR महत्वाची भूमिका बजावतील असे सांगितलं जात आहे. त्याच कारण म्हणजे KCR यांना तेलंगणात मिळणार प्रतिसाद. सलग दोन टर्म KCR यांनी तेलंगणाची एकहाती सत्ता मिळवली आहे. 

तसेच केसीआर यांच्या नेतृत्वाबद्दल  मराठवाड्यातील सीमावर्ती भागात बरच बोललं जात आहेत. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट, देगलूर, धर्माबाद या  तालुक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR पॉप्युलर आहे सांगितलं जात आहे. केसीआर यांची मध्यंतरी नांदेडमध्ये मोठी सभा देखील झाली. त्यामुळे केसीआर ययांच्या लोकप्रियेतीची पुन्हा चर्चा होतेय. 

२५ सप्टेंबर २०२२ ला तेलंगणा टुडे या न्यूज पोर्टलवर ‘मराठवाडा इम्प्रेस्डस बाय किंगमेकर केसीआर’  या हेडिंग खाली बातमी छापून आली होती. त्यात मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील लोक हे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे गुणगान गात असल्याचे म्हटले आहे.

तसेच मोदींना प्रश्न विचारू शकणारे केसीआर हे देशात एकमेव नेते आहेत. त्यांनी मागच्या ८ वर्षात केसीआर कल्याणकारी आणि विकासाच्या योजना राज्यात लागू करत आहेत. त्यामुळे राज्य प्रगतीपथावर जात आहे.  महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात केसीआर मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची मोठ्या प्रमाणात चर्चा होते.

तेलंगणा मध्ये राबविण्यात येणाऱ्या रायतू बंधू, रायतू विमा, आसरा पेन्शन योजना, कल्याणी लक्ष्मी, शादी मुबारक सारख्या योजनेबद्दल लोक उत्साही आहेत. तसेच केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात भाग घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिल्यापासून मराठवाड्यातील लोकांमध्ये तेलंगणा मध्ये अजून कुठल्या योजना राबवल्या जातात याबद्दल माहिती गोळा करण्यात येत आहे. 

समाजातील वंचित घटकांना लाभ मिळवून देणाऱ्या अनेक नवीन योजना राबवणारे केसीआर हे आपले वचन पाळतील असा विश्वास सीमावर्ती भागातील लोकांना वाटत असल्याचे बातमीत छापले आहे. 

धर्माबाद येथील व्यंकटेश सल्लवाड या विद्यार्थ्यांचा बातमीत कोट देत म्हटलं आहे की,

कल्याण लक्ष्मी आणि आसरा पेन्शन योजनेबद्दल आम्हाला माहिती आहेत. केसीआर यांना तेलंगणच्या विकासासाठी लढतांना पाहिले आहे. आता तेच केसीआर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक विरोधी धोरणाविरोधात प्रश्न उपस्थित करत आहेत. आम्ही सीमावर्ती भागातील लोक त्यांच्या विचारांशी सहमत आहोत. 

चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्नांचे फळ तात्काळ मिळणार नाही पण राष्ट्रीय राजकारणात दीर्घकाळ परिणाम होईल. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ते किंगमेकर ठरतील असेही व्यंकटेश म्हणतोय. 

तसेच तेलंगणा टुडेच्या बातमीत असेही म्हटलं आहे की, 

महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात भाजपने मागच्या दारातून सत्ता मिळवल्याने लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. नांदेड सारख्या सीमावर्ती जिल्ह्यातील लोक नरेंद्र मोदी हे तेढ वाढवत असल्याची भावना बोलून दाखवत असल्याचे म्हटले आहे. 

केसीआर यांनी आपण दूरदुष्टी असणारे नेते असल्याचे सिद्ध केले आहे. ते नेहमी बोलतांना देश आणि नागरिक यांना मध्यभागी समजून बोलत असतात. तर पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा मोदी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असल्या प्रमाणे वागतात. दुसरीकडे केसीआर आपल्या कामातून राष्ट्रीय नेते असल्याचे दाखवून देत आहेत. केसीआर यांच्यामध्ये राष्ट्रीय नेत्याचे गुण असल्याचे तिथले लोक बोलत असल्याचे बातमीत म्हटले आहे. 

याबाबत बोल भिडूशी बोलतांना दैनिक देशोन्नतीचे किनवट प्रतिनिधी प्रमोद पोहरकर यांनी सांगितले की, 

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका कधीकाळी आंध्रप्रदेशाचा भाग होता. म्हणजे आताच तेलंगणा. चंद्रशेखर राव यांच्या मार्फत तेलंगणात राबविण्यात येणाऱ्या योजना चांगल्या आहेत. सीमावर्ती भागापासून १० किलोमीटर लांब असणाऱ्या तेलंगणच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळते. मात्र आपल्याला पैसे देऊन सुद्धा वेळेत वीज मिळत नाही. अशी भावना सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांची आहे.

तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्ज मिळविणे खुप सोपं आहे. तसेच मुलीच्या लग्नसाठी, बेरोजगार तरुणांना तेलंगणा सरकार कर्ज उपलब्ध करून देते. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशा कुठल्याच योजनेचा लाभ  नसल्याने इथले शेतकरी, कामगार नाराज आहेत.

या भागात रोटी बेटीचा व्यवहार होत असतो. तिकडे सगळं काही चांगलं मिळतं आपल्याला का नाही अशी भावना या भागात वाढत असल्याचेही पोहकर यांनी सांगितले. आपल्यापेक्षा लहान राज्य असणारे तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना, बेरोजगारांना चांगल्या सुवीधा देत आहेत. त्यामुळे भागात KCR हे पॉप्युलर ठरत असल्याचे पोहरकर यांनी सांगितले.  

स्थानिक पत्रकार साजिद बडगुजर यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की, 

तेलंगणा मध्ये स्वस्त धान्य, वैद्यकीय सुविधा, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना या खूप चांगल्या आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील लोकांना वाटते की, आपल्या बाजूच्या गावातील लोकांना चांगल्या योजना मिळत असतांना आपल्याला वंचित राहावं लागतंय आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये KCR पॉप्युलर ठरत आहेत. 

जर आपण तेलंगणात असतो तर आपल्याला सुद्धा या योजनांचा लाभ मिळाला असता अशी भावना  भावना सीमावर्ती भागातील लोकांमध्ये  मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती बडगुजर यांनी दिली.  

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.