मिडीयातल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तेव्हा हा शेतकरी मदतीला धावून आला…
देशभर लॉकडाऊन सुरू झालं आणि एकेका उद्योगावर संक्रात येवू लागली. एकामागून एक धंदे बंद पडू लागले. अशातच वर्तमानपत्र बंद झाली. महिना दोन महिना प्रिन्टींग बंद म्हणल्यानंतर त्यावर आधारित लोकांचा व्यवसाय बुडू लागला. संपादकांपासून ते शिपायांपर्यन्तच्या नोकऱ्या गेल्याच्या बातम्या येवू लागल्या.
पण वर्तमानपत्र वाटणाऱ्यांच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोललं नाही. मिडीया हाऊसच्या झगमगीत प्रकाशातला हा शेवटचा बिंदू. रोज सकाळी प्रत्येकाच्या घरी जावून पेपर वाटणाऱ्यांना प्रत्येक वर्तमानपत्रामागे टाकणावळ म्हणून पेसै मिळतात. वर्तमानपत्र बंद झाल्याने त्यांच्या रोजगार बुडाला. पोटासाठी तर काम करावं लागतं पण मोक्याच्या क्षणी धंदा गेल्याने आत्ता कस हा प्रश्न उभा राहिला.
तेव्हा त्यांच्या मदतीला आला अमोल गोऱ्हे नावाचा हाडामासांचा शेतकरी. आत्ता या माणसाला शेतकरी म्हणावं हा देखील एक प्रश्न आहे. पण हाच खरा शेतकरी आहे हे तुम्हाला त्याचीच गोष्ट वाचल्यानंतर समजून जाईल.
अमोल गोऱ्हे हा नाशिक जिल्ह्यातल्या वडनेर भैरव या गावचा पोरगा. त्याने ॲग्रीकल्चर डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर ॲग्रीकल्चर संबधित उत्पादने एक्स्पोर्ट करण्यासाठी ऑडिट करण्यात येत अशी माहिती त्याला मिळाली. त्याने त्या संबधित वेगवेगळे कोर्सेस केले.
शेतकऱ्यांना जेव्हा आपला माल बाहेरच्या देशात पाठवायचा असतो तेव्हा वेगवेगळे निकष लावले जातात. उदाहरण घ्यायचं झालं तर द्राक्षांच. समजा युरोपमध्ये द्राक्षे पाठवायचे असतील तर त्या देशांच्या मानकांनुसार द्राक्षांमध्ये किती रासायनीक पदार्थ असावेत. काय प्रतवारी असावी असे निकष लावण्यात येतात. यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येते.
अमोल गोऱ्हे थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून काम करू लागला.
२००२ ते २००८ या सालांपर्यन्त हे काम सुरू राहिलं. या दरम्यान अमोलच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. ती म्हणजे विदेशात माल पाठवणं म्हणजे शेतकऱ्यांना चांगलेच पैसे मिळतील असं नाही. इतके निकष पाळून देखील अनेकदा देशात मिळणाऱ्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत माल पाठवण्यात येत असे.
आपल्या देशात साधा माल उच्च किंमतीला लोकांच्या पदरात पडतो आणि बाहेरच्या देशात कमी किंमतीत उच्च गुणवत्तेचा माल मिळतो हे साधं गणित त्याला या काळात समजून गेलं.
२००८ साली अमोल ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीत असिस्टंट मॅनेंजर म्हणून काम पाहू लागला. या काळात देखील तोच अनुभव. भविष्यातल्या मार्केटचा ताळेबंद बांधता न येणं, मालाचा योग्य रेट शेतकऱ्यांच्या हातात न पडणं, अशा गोष्टींचा सामना तो करू लागला.
हे करता करता शेतकऱ्यांबाबतचं त्याचं अर्थशास्त्र पक्क होत होतं. कुठे मालाला किंमत मिळू शकते त्यासाठी काय करता येवू शकेल. याचं विचारचक्र सुरू झालेलं. आपल्या सर्वांना माहित आहे तेच गणित कसं मोडता येईल याचा विचार सुरू केलेला.
यावर उपाय म्हणून २०१२ साली शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट घराघरात पोहचवण्याच्या हेतूने नाशिक शहरासाठी त्यांनी ग्रीनफिल्ड नावाची कंपनी सुरू केली.
२०१२ साली कंपनी सुरू झाली आणि २६ जानेवारी २०१३ साली कंपनी बंद करावी लागली. याच कारण काय तर कन्झुमर अव्हेरनेस. आपण खातो तो भाजीपाला काय प्रतीचा आहे, तो किती दिवसांचा आहे, तो कुठे पिकतो याबद्दल ग्राहकांना काही देणघेणं नव्हतं. त्यामुळेच डम्प माल ग्राहकांच्या माथी उच्च किंमतीत मारला जात होता.
आरोग्याचा AWARENESS तेव्हा लोकांच्या ध्यानीमनी देखील नव्हता. याचा तोटा अमोलला सहन करावा लागला.
२०१३ साली या माणसाने पून्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी मारायचं ठरवलं. त्यासाठी त्याने शेतकऱ्यांचा माल घेवून निर्यातदार कंपन्यांना द्यायचं गणित मांडल. यासाठी शेतकऱ्यांना किमान हमीभाव देण्याची गरज होती.
त्यांनी २५ रुपये हमीभावावर शेतकऱ्यांच्या मिरच्या एक्स्पोर्टरला दिल्या मात्र या काही कारणास्तव मिरच्या बाहेरच्या देशात जावू शकल्या नाहीत. त्याला इथल्याच मार्केटमध्ये मिरच्या विकाव्या लागल्या. देशात किलोला ९ रुपये भाव मिळाला. प्रत्येक किलोमागे १६ रुपयांच नुकसान. एकूण रक्कम ५० लाखांच्या घरात होती.
त्या वेळी अमोल कडे दोन ऑप्शन होते. एकतर इतर कंपन्यासारखं हात वर करुन माझा काही संबंध नाही म्हणून सांगण किंवा थेट नाशिकमधून पळून जाणं. इथं पावलापावलावर मोठमोठ्या कंपन्या शेतकऱ्यांना फसवत असताना आपण वेगळं का वागा? असा विचार देखील तो करु शकत होता.
पण या पठ्याने काय केलं तर आपल्या पदरचे पैसे शेतकऱ्यांना दिले.
५० लाखांची रक्कम फेडता फेडता रस्त्यावर येण्याची वेळ अमोलवर आली. त्याने तिसरा मार्ग निवडला होता. आर्थिक पातळ्यांवर जिथून दहा वर्षांपूर्वी सुरवात केली होती त्याच्याही मागे येण्याची वेळ आली.
पण एक गोष्ट चांगली झाली, आजवर अमोल ज्या भाजीपाल्यांना विश्वासू असल्याचा टॅग देत होता त्याच भाजीपाल्यांनी अमोलला त्याच्या या कृतीमुळे “विश्वासू” टॅग दिला.
अशातच शेतकऱ्यांच्या मालांच मार्केटिंग करणं, कम्झ्युमर अवेरनेस वाढवणं या कामांमध्ये अमोल लक्ष घालू लागला. २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन महामंडळाच्या पुढाकारातून शेतकरी बाजार भरवण्याची संकल्पना पुढे ठाणे क्षेत्रासाठी हे बाजार भरवणं, त्याचं नियोजन करणं याची पूर्ण जबाबदारी अमोल गोऱ्हे यांच्यावर टाकण्यात आली. या काळात ग्राहकांच मानसशास्त्र समजण्यास सुरवात करण्यात आली.
याबद्दल अमोल गोऱ्हे सांगतात,
मुंबईत रेल्वेच्या कडेला जो भाजीपाला विकला जातो तो तुलनेत स्वच्छ आणि ताजा वाटतो, पण आम्ही नाशिकमधून भाजीपाला आणत असताना किमान शेतकरी ते मार्केट एक दिवस खर्च पडतो. अशा वेळी भाजी शिळी वाटू लागते. पण ग्राहक हा विचार करत नाही की जे दिसतय ते कुठे आणि कसं पिकतय.
हेच गणित खूप महत्वाचं होतं. आपण पिकवतो ती कशी विकतो हे समजून घ्यायला हवं. या काळात शेतकरी आठवडी बाजार संकल्पनेतून छोट्यामोठ्या गोष्टी अमोल शिकत गेला. आत्ता आपण हायजिनच्या गोष्टी सांगून लोकांना चांगला, स्वच्छ, आरोग्यासाठी पूरक माल विकू शकतो असा विश्वास त्याला येत होता.
ग्रीनफिल्ड या जून्या संकल्पनेनं पून्हा उचल खाल्ली. लोकांना घरपोच अस्सल काळ्या मातीत पिकलेली भाजी देणं हे धोरण ठेवून त्याने योजना आखण्यास सुरवात केली. प्रत्यक्ष कामास सुरवात करेपर्यन्त २०१९-२० ची सुरवात झाली.
काम सुरू झाले तोच कोरोनामुळे संपूर्ण जग थांबल, अमोलला इतके दिवस कन्झ्युमर अवेरनेस बाबत बोलत होता.
एका रोगाच्या साथीमुळे लोकांना ती गोष्ट झटक्यात समजून गेली.
ग्रीनफिल्ड या कंपनीमार्फत घरपोच भाजीपाला देण्याची सिस्टिम सुरू करण्यात आली. नाशिकमधून माल उचलणं आणि दूसऱ्या दिवशी ऑर्डर असणाऱ्या घरांपर्यन्त तो पोहचवण हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
पण या सर्व गोष्टीत महत्वाचा धागा होता तो घरपोच माल पोहचवणारा व्यक्ती.
वर्तमानपत्र बंद असल्याने वर्तमान पत्र विक्रेते आणि घरोघरी वर्तमानपत्र टाकणारी मुलं बेरोजगार झाली होती. अमोलने या मुलांना अचूक हेरलं. त्यांना माल पोहचवण्यासाठी ट्रेनिंग दिलं. आरोग्यविषयक काळजी घेणं, शेतमाल योग्य वेळेत डिलीव्हर करणं, माल पोहचवताना सॅनिटायझेशनचे निकष पाळणं या गोष्टी वृत्तपत्रविक्रेत्यांना शिकवण्यात आल्या. विशेष म्हणजे सॅनिटायझेशेनची भाषा अमोल कोरोना येण्याच्या पूर्वीपासून करत असे.
इकडे ग्रीनफिल्डचं ॲण्ड्राईड ॲप विकसित करण्यात आलं.
६०० हून अधिक प्रकारच्या गोष्टी फोनवर ऑर्डर केल्यानंतर मिळू लागल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यापासून ते किराणा मालापर्यन्तचा माल मिळू लागला. किराणा माल ठेवण्यामागचं कारण सांगताना अमोल सांगतात की लोकांना एकदम वेगवेगल्या खरेदीची सवय असते. वांगी आणायला गेलेला माणूस गरम मसाला देखील घेवू शकतो. अशा वेळी दोन वेगवेगळ्या साईटवरून तो वस्तू घ्यायला प्राधान्य देत नाही. आपलं प्राधान्य हे भाजीपाल्यासंदर्भातच असून सोबत किराणा माल देखील देण्यात आला आहे.
आजपर्यन्त अमोलने जोडलेला प्रत्येक माणूस आज ग्रीनफिल्डमध्ये कार्यरत आहे. मालाची ऑर्डर घेणाऱ्या त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसोबतच माल विकत घेणं, नाशिकमधून ंमुंबईत पोहचवणं, पॅकिंग करण्यापासून ते घरपोच पोहचवणाऱ्या व उच्च गुणवत्तेचा माल काळ्या मातीत पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा अशा अनेकांचा हातभार आज या कामास लागत आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी म्हणून फक्त ओरडणारे अनेकजण असतात पण प्रत्यक्षात झटणारे आणि लावून धरणारे खूप कमी असतात. अमोल २००२ सालापासून शेतकऱ्यांच्या भावाबद्दल काम करत राहिला. ते काम आज यशस्वीपणे पुढं जात आहे याचाच आनंद आहे.
अमोल गोऱ्हे यांचा संपर्क क्रमांक : 9823375980
ग्रीनफिल्ड ॲपची लिंक : ग्रीनफिल्ड
हे ही वाच भिडू
- सोलापूरचा शेतकरी इरेला पेटला अन् द्राक्षातला हापूस सोनाका तयार केला.
- मी महाराष्ट्रातला एक तरुण शेतकरी आहे आणि माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला कारण..
- कृष्णेच्या ऊसपट्ट्यात वसलंय बासमती तांदळाचं गाव : रेठरे बुद्रुक
[…] https://bolbhidu.com/news-paper-vendors-deliver-veggies-about-greenfild/ https://www.youtube.com/watch?v=e-B_ukU3IHE https://www.youtube.com/watch?v=oZVcirOiPmg https://www.youtube.com/watch?v=9DAuIVuJ9SY […]