फक्त एका टायटलमुळे पेपरचा खप शेकडो पटीने वाढला आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटून उठलं…

उठला मराठी देश… आला मैदानी त्वेष
वैरी करण्या नामशेष!!

डफावरची थाप आणि या ओळी कानावर पडल्या की मराठी माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींनी आजही उर अभिमानानं भरून येतो. महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांनी या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली पण लढा जिंकून दाखवलाच. या लढाईचं नेतृत्व करणाऱ्यांमधलं एक अग्रणी नाव म्हणजे आचार्य अत्रे. अत्र्यांच्या वाणीत आणि लेखणीत हजारोंना एकत्र आणण्याचं आणि दिशा देण्याचं सामर्थ्य होतं.

ते दिवस संघर्षाचे होते. मोरारजी देसाई विरुद्ध संयुक्त महाराष्ट्र चळवळ असा थेट सामना रंगला होता. आचार्य अत्रे त्यावेळी ‘नवयुग’ साप्ताहिकाच्या माध्यमातून आंदोलनाच्या बाजूनं भूमिका मांडत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वाढता पाठिंबा पाहता तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला. आंदोलक पोलिसांमोर नमतं घेत नसल्याचं पाहून मोरारजींनी थेट सैन्याला पाचारण केलं. या धुष्मचक्रीत आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. हे समजताच अत्र्यांनी थेट नवयुगचं कार्यालय गाठलं. त्यावेळी नवयुगाचा खप अडीच हजार होता. गोळीबाराच्या घटनेमुळे संतापलेल्या अत्र्यांनी मथळा लिहिला आणि त्यामुळे नवयुगाचा खप थेट साठ हजारांवर गेला. तो मथळा होता..

‘मोरारजी देसाई यांचे हातपाय महारोगाने गळो’

झुंजणाऱ्या मराठी माणसांना या मथळ्यानं आणखी बळ दिलं. मोरारजी देसाई यांच्याबाबतचा असंतोष शिगेला पोहोचला व मोठ्या संख्येनं मराठी नागरिक आंदोलनात उतरले. यामुळे आंदोलनाला चालना देणाऱ्या दैनिकाची गरज अत्रेंना प्रकर्षानं जाणवली. त्यातूनच जन्म झाला ऐतिहासिक ‘मराठा’ दैनिकाचा!

शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत मराठाच्या मदतीसाठी थाळी फिरवण्यात आली. लोकांनी खारीचा वाटा उचलत ६३ रुपये १० आणे जमवले. मराठा सुरू करण्यासाठी तेवढे पैसे पुरेसे नव्हतेच. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सात हजारांची भरीव मदत केली. ‘धनुर्धारी’च्या बाबुराव साबळ्यांनी आपली दादरमधली जागा कार्यालयासाठी दिली आणि १५ नोव्हेंबर १९५६ रोजी दैनिक मराठा सुरू झालं.

मराठा ओळखलं जायचं जळजळीत अग्रलेख आणि खुमासदार सदरांसाठी. अत्र्यांची भाषा आणि स्पष्ट विचार हाच मराठा वृत्तपत्राचा ‘युएसपी’ होता. मराठाचा खप वाढत गेला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं लोणही पसरत गेलं.

मराठाच्या पहिल्या अंकातही अत्र्यांनी जबरदस्त अग्रलेख लिहिला होता, ज्याचं शीर्षक होतं ‘मराठी जनतेचा आवाज.’ मराठा दैनिकानं १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात मोलाची भूमिका बजावली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समितीला बहुमत मिळवून देण्यातही मराठामध्ये आलेल्या लेखांचा, बातम्यांचा मोठा वाटा होता.

‘शिवसेना’ उभारा

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करण्याआधी वर्षभर आचार्य अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी मराठी तरुणांची स्वयंसेवी संघटना उभारायला हवी असा विचार मांडला होता. त्यांनी १९ जुलै १९५९ च्या दैनिक मराठामध्ये हा विचार मांडत विस्तृत लेख लिहिला होता. त्यादिवशी दैनिक मराठाचा मथळा ‘आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हांक : ‘शिवसेना’ उभारा’ असा होता. पुढे जाऊन बाळासाहेब ठाकरेंनी मराठी तरुणांना केंद्रस्थानी ठेवत ‘शिवसेना’ पक्ष स्थापन केला, त्यामागचा विचार मात्र आचार्य अत्रेंचाच होता.

दैनिक मराठाचा खप एक लाखापर्यंत पोहोचला. केवळ बातम्याच नाही, तर अग्रलेख आणि विविध सदरांमधून मराठी जनतेच्या मनात क्रांतीची मशाल धगधगती ठेवण्यात मराठा कायम अग्रस्थानी राहिला. या मशालीची ठिणगी पेटवण्याचं काम मात्र ‘नवयुग’मधल्या त्या मथळ्यानंच केलं होतं…

‘मोरारजी देसाई यांचे हातपाय महारोगाने गळो’

हे हि वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.