विल्यम्सनच्या आधीपासून न्यूझीलंडकडे एक शांततेचा पुतळा होता… रॉस टेलर!

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आणि फॉर्मातल्या इंग्लंडला हरवलेल्या भारताकडून विजयाच्या भरपूर अपेक्षा होत्या. लय दिवसांचा विजेतेपदाचा दुष्काळ आता संपणार असं वाटत होतं. पण चिवट आणि संयमी न्यूझीलंडनं भारताच्या घशातला घास हिरावून घेतलाच. एवढ्या मोठ्या स्पर्धेत पार फायनल मॅचमध्ये भारतानं माती खाल्ली, पण एकही चाहता असा पेटून उठला नाय.

रस्त्यावर राडे झाले नाहीत, ट्विटरवर हॅशटॅग चालले नाहीत, लोकं अशी पेटून बिटूनही उठली नाहीत. आता आपण पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया किंवा बांगलादेशकडून हरलो असतो, तर पार पुतळे जळाले असते. पण त्यादिवशी तसं काहीच झालं नाही.

पहिल्यांदाच भारत हरल्याच्या दुःखापेक्षा समोरची टीम जिंकल्याचा आनंद जास्त होता, कारण ती टीम होती न्यूझीलंड.

जावेद मियाँदादनं चेतन शर्माला मारलेला छकडा ही आपल्यासाठी जखम आहे, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला हरवणारा शॉट मारणारा रॉस टेलर, आपल्याला मनापासून आवडतो.

तशी आवडत्या किवी खेळाडूंची यादी बरीच मोठी असली, तरी रॉस टेलर हे त्यातलं लय भारी नाव.

 आपल्यातल्या कित्येकांना क्रिकेट समजायला लागलं, तसा रॉस टेलर आपल्याला खेळताना दिसतोय. पण एवढ्या वर्षात काही कुठला मोठा वाद नाही, मैदानावर साधी शिवीगाळही नाही… आहेत तर फक्त आदर आणि त्याच्या बॅटिंगच्या सुंदर आठवणी. 

२००६ मध्ये टेलरनं वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला त्याची बॅटिंग बघून अनेक क्रिकेट पंडितांचं मत होतं, की हा फक्त अंधाधुंदी बॅट घुमवतो. पण टेलरनं आपल्या तिसऱ्याच वनडे मॅचमध्ये कडकडीत शंभर लावला आणि सगळ्या टीकाकारांची तोंडं शिवली.

पुढं वर्षाच्या आता गडी टेस्ट टीममध्ये आला. तो काळ असा होता की, न्यूझीलंडमध्ये सनासना बॅट्समन येत होते. त्यामुळं टीममधलं स्थान टिकवायला एकच मार्ग होता, रन्स करत राहणं. पहिलाच दौरा साऊथ आफ्रिकेला होता आणि बाऊन्स होणाऱ्या बॉलवर टेलरचा बाजार उठत राहिला. हे अपयश इतकं वाईट होतं, की किरकोळ बांगलादेश विरुद्धच्या सिरीजमध्ये त्याला बाहेर बसावं लागलं. पण इंग्लंड विरुद्ध कमबॅक करत भावानं त्यांच्याच होम ग्राऊंडवर धुवाधुवी केली.

आता प्रत्येक दौऱ्याबद्दल सांगत बसत नाय, पण एका भारी इनिंगबद्दल सांगितलं पाहिजेच की.

२०१५, न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा. फास्ट बॉलर्सचं नंदनवन समजलं जाणाऱ्या पर्थच्या पिचवर, ऑस्ट्रेलियानं किवी बॉलिंग खाल्ली होती. ५५९ रन्सचं बॅकिंग असलेली ऑस्ट्रेलिया तुटून पडणार हे शेंबड्या पोरानं पण सांगितलं असतं. झालंही तसंच, पहिल्या दोन विकेट्स पटकन गेल्या. विल्यम्सननं नेहमीप्रमाणं शांतीत क्रांती करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूनं उभा राहिला रॉस टेलर.

विल्यम्सननं शतक हाणलं, पण मॅचची मेन हायलाईट होती, रॉस टेलरची बॅटिंग.

ऑस्ट्रेलियाच्या राक्षसी बॉलिंगसमोर, टेलर ३७४ बॉल खेळत उभा राहिला. चौथ्या नंबरवर आलेला टेलर आऊट झाला, तेव्हा ती न्यूझीलंडची शेवटची विकेट होती. न्यूझीलंडनं रन्स केले ६६४ आणि टेलरचा स्कोअर होता २९०, पण ट्रिपल सेंच्युरी हुकल्याच्या दुःखापेक्षा मॅच ड्रॉ करता आल्याचा आनंद त्याच्यासाठी जास्त मोठा होता. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन बॉलर्सची जिरवूनही टेलरनं शिव्या दिल्या नाहीत, कुणाला खुन्नस दिली नाही. 

सेंच्युरी पूर्ण केल्यावर पोरीची आठवण काढत जीभ बाहेर काढली, हेल्मेट घातलं आणि पुन्हा गार्ड घेऊन बॅटिंग सुरू.

टेलर जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आला, तेव्हा त्याचा नॅचरल गेम थांबायचं आणि मग हाणायचं असा होता. टेस्ट क्रिकेटमध्ये तो कधीच टुकूटुकू प्लेअर नव्हता, एका बाजूनं लाऊन धरायचा आणि दुसऱ्या बाजूनं स्कोअरबोर्ड हलता ठेवायचा. उन्हातान्हात जीव आटवणारे बॉलर्स आणखी हताश व्हायचे आणि किरकोळ चुका करायचे. आयपीएलमध्ये आल्यावर त्यानं आपल्या गेमचा स्पीड वाढवला, टेलरचं हे रुप कित्येकांसाठी अनपेक्षित आणि तरीही लय भारी होतं.

आपल्या कारकीर्दीच्या शेवटी त्यानं कसोटीच्या दृष्टीनं आपल्या खेळात बदल केले, स्टान्स बदलला, बॅकलिफ्ट बदलली, डोळ्यांचं ऑपरेशन झालं, थोड्या काळासाठी मिळालेली कॅप्टन्सी सोडावी लागली, पण एवढं होऊनही रन्सचा ओघ काय थांबला नाही. रनांचे, शतकांचे आणि रेकॉर्ड्सचे आकडे सातत्यानं वाढत राहिले. 

टेलर न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळलेला प्लेअर बनला. पण तरी त्याला कणभरही माज चढला नाही…

टेलर भारी बनला, याचं मूळ त्याच्या बालपणात घावतं.

टेलरचे कोच सांगतात, त्यानं कधीच, कुठलंच प्रॅक्टिस सेशन मिस केलं नाही. कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही. क्रिकेटसाठी जेव्हा शाळा बदलावी लागली, तेव्हा त्या टीममध्येही कष्टानं स्थान मिळवलं. बोर्डिंग स्कुलमधली शिस्त अंगात भिनवली आणि अखेरपर्यंत क्रिकेटवर भरपूर प्रेम केलं.

टेलर ४ एप्रिलला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतली शेवटची मॅच खेळला, त्यात तो १४ रन्स करुन आऊट झाला. न्यूझीलंडचं राष्ट्रगीत सुरू असताना त्याला रडणं थांबवता आलं नाही आणि तो आऊट होऊन पॅव्हेलियनकडे जाताना आपल्याला टाळ्या वाजवणं.

बरं टेलर इतका मोठा प्लेअर पण आपली शेवटची मॅच खेळला नेदरलँड्ससोबत. दुसरे पर्याय सहज उपलब्ध झाले असते, पण टेलर अस्सल न्यूझीलंडवाला निघाला… प्रसिद्धीपासून दूर तरीही प्रत्येक चाहत्याच्या जवळ.

आणि हा सांगायचं राहिलं, एका मुलाखतीत टेलरनं सांगितलं होतं, रिटायरमेंटनंतर त्याला शेती करायचीये… इथंही लाईमलाईटच्या बाहेर… काहीही म्हणा, खरा जंटलमन!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.